तापावर सर्वसाधारणपणे घेतल्या जाणाऱ्या अ‍ॅस्परिन या औषधामुळे शरीरातील गाठींची वाढ कमी होऊन पचनसंस्थेत पुन्हा होऊ पाहणाऱ्या कर्करोगाला प्रतिबंध बसू शकतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. या संशोधनामुळे कर्करोगावरील भविष्यातील उपचारांना नवी दिशा मिळू शकते. अमेरिकेतील सिटी ऑफ होप या खासगी सेवाभावी वैद्यकीय संशोधन केंद्रात हा अभ्यास करण्यात आला आहे.

तेथील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या वेदनेतून उद्भवणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्याची क्षमता अ‍ॅस्परिन या औषधात आहे. कर्करोग, अल्झायमर्स, पार्किन्सन्स आणि संधिवात या रोगांचा यात समावेश होतो. या अभ्यासाचे सहलेखक अजय गोयल यांनी सांगितले की, ‘‘कोणतेही वेदनाशामक औषध अत्यधिक प्रमाणात घेतल्यास त्यामुळे जठराच्या अंतर्गत आवरणाची हानी होते. यातून जठर आणि आतडय़ात अनेक समस्या उद्भवू शकतात. याच कारणामुळे सध्या कर्करोग आदी रोगांच्या प्रतिबंधासाठी अ‍ॅस्परिनचा वापर केला जात नाही.’’

ते पुढे म्हणाले की, अ‍ॅस्परिनचा पोटात कोणताही दुष्परिणाम होणार नाही इतपत त्याची मात्रा निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर मोठय़ा आतडय़ात कर्करोग होऊ नये यासाठी या औषधाचा वापर करता येईल. औषधाच्या सुयोग्य मात्रेमुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची, त्यामुळे पोटात व्रण होण्याची शक्यता उरणार नाही. संशोधकांकडून सध्या याबाबत उंदरांवर प्रयोग सुरू आहेत. त्याचवेळी अ‍ॅस्परिनच्या मात्रेबद्दल अमेरिका आणि युरोपमधील रुग्णांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत.