महिला या आता पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करत आहेत. मात्र असे असूनही त्यांना पुरुषांच्या बरोबरीने उत्पन्न मिळत नसल्याचे एका अहवालातून नुकतेच समोर आले आहे. अनेक कंपन्यांमध्ये महिला वरिष्ठ पदावरही काम करतात. मात्र कंपन्यांच्या संचालकमंडळावर कार्यरत बहुतांश महिलांचे वेतन पुरुष संचालकांच्या तुलनेत कमी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. इतकेच नाही तर संचालक मंडळावरील महिलांचे प्रमाणही पुरुषांच्या तुलनेत कमीच असल्याचे आढळून आले आहे.

‘इकॉनॉमिक टाइम्स’ने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका पडताळणीमध्ये हे वास्तव आढळून आले आहे. एका विशिष्ट क्षेत्रातील तीस कंपन्यांच्या संचालक मंडळावरील महिला संचालकांना पुरुष संचालकांच्या तुलनेत २०१७मध्ये सरासरी ४६ टक्के वेतन कमी मिळाल्याचे आढळून आले आहे.

या कंपन्यांच्या पुरुष संचालकांना सरासरी २.६ कोटी रुपये तर, महिला संचालकांना १.४ कोटी रुपये वार्षिक वेतन आहे. स्वतंत्र संचालकांची संख्या १३३ असून त्यापैकी २५ महिला आहेत. याबरोबरच ज्याप्रमाणे महिलांचे पद वाढत जाते, तशी त्यांच्या वेतनातील तफावत पुरुषांच्या तुलनेत वाढत जात असल्याचेही आढळून आले आहे. कोट्यवधी रुपये मूल्य असणाऱ्या स्टार्टअप आणि मोठ्या कंपन्यांनी २०१७मध्ये स्री-पुरुषांमधील वाढती तफावत कमी करण्याची तयारी दर्शवली होती. या कंपन्यांनी महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी तयारीही सुरू केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. एखादी महिला कर्मचारी कनिष्ठ पातळीवरून वरिष्ठ पातळीवर गेल्यानंतरही तिचे वेतन पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमीच असल्याचे निरीक्षण या कंपन्यांनी नोंदवले आहे.