गेम खेळण्याची आवड असणाऱ्यांसाठी शाओमी कंपनीने भारतीय बाजारात एक खास स्मार्टफोन लाँच केला आहे. ‘ब्लॅक शार्क 2’ हा नवा स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारात आणला असून हा गेमिंग स्मार्टफोन आहे. यामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर दिलेले आहेत. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरशिवाय डायरेक्ट टच मल्टीलेयर लिक्विड कुलिंग फीचर देखील आहे. या फीचरद्वारे मोठे आणि ऑनलाइन गेम्स खेळतानाही फोन गरम होत नाही. ऑनलाइन संकेतस्थळ फ्लिपकार्टवर 12 जून रोजी दुपारी 12 वाजेपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Black Shark 2 च्या बेसिक मॉडेल अर्थात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या व्हेरिअंटची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. तर प्रीमियम मॉडल   (12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज) ची किंमत  49 हजार 999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्रोजन सिल्वर, ग्लोरी ब्ल्यू आणि शॅडो ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेन. या स्मार्टफोनसाठी काही दिवसांपूर्वीच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) कडून प्रमाणपत्र मिळालं होतं, तेव्हाच हा फोन भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचं बोललं जात होतं, अखेर आज दिल्लीत एका इव्हेंटमध्ये कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला. मार्च महिन्यामध्ये हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये गेमिंग आर्टिफिशियल इंटेलीजंसचा वापर करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. गेमर्सच्या सोयीसाठी फोनच्या चारही बाजूंना प्रेशर सेंसिटिव्ह सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.

फीचर्स – Black Shark 2 मध्ये Qualcomm Snapdragon 855 प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी+ (1080×2340) AMOLED डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. 4,000 mAh क्षमतेची आणि फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी यामध्ये आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं असून त्यातील एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे तर दुसरा 12 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी यामध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ब्लॅक शार्क 2 मध्ये स्क्रीनखाली फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.