21 March 2019

News Flash

‘आजार-विकृती’पासून सुटका

मी आजवर सर्व क्षेत्रांतील शेकडो नव्हे, तर हजारो समलिंगी व्यक्तींशी बोललेलो आहे.

अ‍ॅलन टय़ुिरग

समलैंगिकता ‘बरी’ करण्यासाठी फ्रॉइडच्या चिकित्सापद्धतीसोबतच अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या भोंदूगिरीच्या पद्धती कुचकामी ठरल्या. अगदी जनुकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आपल्या डीएनएमध्ये ‘गे जीन’ शोधण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. अखेर जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकतेला मानसिक आजाराच्या यादीतून आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय विकृतींमधून काढून टाकलं. समलैंगिकांसाठी हा खूप मोठा विजय होता.

अल्फ्रेड किन्सीचं समलैंगिकतेवरचं संशोधन केवळ मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या शाखांपुरतंच मर्यादित नव्हतं, हे आपण गेल्या लेखात पाहिलंच. किन्सीच्या संशोधन प्रक्रिया आणि त्याच्या संशोधनाच्या एकूण पद्धतींचा वापर आधुनिक जाहिरात व्यवसाय, सामाजिक अभ्यास यांबरोबरच अगदी निवडणुकींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये म्हणजे सेफॉलॉजीमध्येही वापरला गेला. एखादा मोठा समाजगट कशा प्रकारे वर्तन करतो किंवा विचार करतो, तो कशा प्रकारे हिंसक होतो हे जाणण्यासाठी किन्सीचं संशोधन उपयुक्त होतं.

पुढं जगभरात लैंगिक वर्तनांच्या झालेल्या अभ्यासांमध्ये सगळीकडेच, सर्व समाजांमध्ये समलिंगी पुरुषांची टक्केवारी जवळजवळ सारखीच असल्याचं आढळून आलं. विशेष म्हणजे, ज्या समाजांमध्ये समलैंगिकता हे पाप मानलं गेलेलं नाही, उदाहरणार्थ, भारत, समलिंगी व्यक्तींचं प्रमाण तामिळनाडू, राजस्थान किंवा आंध्र प्रदेश यांसारख्या काही विशिष्ट राज्यांत थोडंसंच जास्त आहे, असं काही छोटय़ा संशोधनांमधून दिसून आलं आहे. म्हणजेच आपण भारतीय अमेरिकन किंवा युरोपियन लोकांपेक्षा काही वेगळे नाही. आणि कसे असणार? अखेर आपण या भूतलावर होमोइरेक्ट्स याच माकडांपासून उत्क्रांती होऊन निर्माण झालेलो आहोत ना! पाश्चिमात्य देशांतला माणूस भले आपल्यापेक्षा जरा वेगळा दिसत असेल आणि त्याच्या केसांचा किंवा त्वचेचा रंग वेगळा असेल, पण आपणा सगळ्यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त सारखंच आहे. अफ्रिकेतल्या एखाद्या काळ्या माणसानं दिलेलं रक्त स्वीकारायला भारतीय माणसाला कुठलीच जनुकीय अडचण नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्?’ हा मंत्र खूप व्यापकपणे सर्वत्र लागू होतो. वीस लाख वर्षांपूर्वी जेव्हा माकडांनी झाडं सोडून जमिनीवर राहायला सुरुवात केली, तेव्हा आपल्या साऱ्यांचा जन्म अफ्रिकेतल्याच एका आईच्या पोटी जन्मलेल्या बाळाची उत्क्रांती होऊन झालेला आहे. आपलं हे ‘आदिमानवाचं’ रूप अजूनही फारसं बदललेलं नाही, हे दंगली, युद्ध आणि हो, अगदी लैंगिक संबंधांमधूनसुद्धा दिसत राहतंच.

आज भारत सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी ही परिस्थिती मान्य केली पाहिजे, की समलिंगी स्त्री-पुरुष एक घटक म्हणून आपल्या समाजात अस्तित्वात आहेत. कोणत्याही प्रकारे सरकार किंवा समाज त्यांना नाहीसं करून टाकू शकत नाही. सगळ्या जाती, धर्म, आणि देशांमध्ये लैंगिकतेमधील हा अल्पसंख्याक गट असतोच असतो. वेगवेगळ्या सांस्कृतिक बाबींमुळे त्याचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी कमी-अधिक असेलही, पण हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, सिख, जैन, दलित, बौद्ध आणि अगदी आदिवासींमध्येसुद्धा काही प्रमाणात समलिंगी व्यक्ती आढळतातच.

समलिंगी पुरुष सार्वजनिक रुग्णालयांमधील एचआयव्ही/ एड्ससाठी उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सेवा वापरतात, हे खुद्द शासनाच्याच नोंदीतून दिसून आलेलं आहे. पण खरी गोष्ट सांगायची तर, अशी आरोग्य सुविधा वापरण्याची कित्येकांना खूप भीती वाटत असते. आपण समाजातून बहिष्कृत केले जाऊ, आपल्याला शासन होईल अशी दहशत त्यांच्या मनामध्ये असते. पण समलिंगी व्यक्ती अगदी तुमच्या-आमच्यासारख्याच आजारी पडू शकतात ना? भारतीय समाजातील या सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा उपयोगी पडणाऱ्या घटकाची काळजी घेणं हे तुमचं-आमचं आणि शासनाचं कर्तव्य आहे.

समलिंगी चळवळीच्या हाती विजय लागण्याआधी अमेरिकेमध्ये मानसशास्त्रज्ञ आणि मनोविकारतज्ज्ञांच्या वर्तुळात वादविवादांच्या मोठय़ा फैरी झडल्या. अखेर अमेरिकन असोसिएशन ऑफ सायकायट्रीनं १९६० च्या उत्तरार्धात तर अमेरिकन असोसिएशन ऑफ सायकॉलॉजीनं १९७०च्या सुरुवातीला समलिंगी वर्तनाला मानसिक आजाराच्या यादीतून काढून टाकलं. यावर अंतिम मोहर उठवली ती जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे डब्ल्यूएचओनं. संयुक्त राष्ट्र संघाच्या आधिपत्याखाली असणारी ही संघटना. जगातील सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी या संघटनेवर असते. १९७२ मध्ये समलैंगिकता हा मानसिक आजार नाही, असं डब्ल्यूएचओनं जाहीर केलं. आजवर भोगलेल्या साऱ्या शिक्षा, मारून टाकलं जाणं, विजेचे झटके देणं, रसायनं टोचून छळ करणं आणि सर्व प्रकारच्या चुकीच्या उपचार पद्धती यावर अखेर समलिंगी व्यक्तींनी विजय मिळवला होता. या प्रकारची लैंगिकता ही कुठलीही विकृती नाही, हे आता सिद्ध झालं होतं. याचं खास उदाहरण द्यायचं झालं तर आधुनिक संगणकाचा जनक, अ‍ॅलन टय़ुिरग याचं नाव घ्यावं लागेल. अ‍ॅलन टय़ुिरग हा शास्त्रज्ञ समलिंगी असल्यामुळे १९४० मध्ये ब्रिटिश सरकारनं त्याला रसायनांची इंजेक्शन्स देऊन त्याचं खच्चीकरण केलेलं होतं. त्यानं अखेर शरमेनं आत्महत्या केली होती. एका चांगल्या माणसाचा अशा प्रकारे खूनच करण्यात आला होता. अखेर या घटनेच्या ७५ वर्षांनंतर राणीने या घटनेबाबत माफी मागितली.

पण विदेशातच नव्हे, तर आपल्या देशातही अनेक पुरुषांनी लज्जा आणि मानसिक खच्चीकरण यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. अर्थात, मी इथं त्यांची नावं घेऊ शकत नाही. कारण किती प्रतिभावान भारतीय लोकांनी  या कारणामुळे मृत्यूला कवटाळलं, हे कळलं तर तुमच्यापैकी अनेकांना शरम वाटेल. पण अशा किती तरी प्रतिकूल गोष्टींना सामोरं जाऊन आम्ही, समलिंगी अभिमानानं, ताठ मानेनं उभे आहोत. आज आम्ही देशाचे आणि या पृथ्वीवरचे सन्माननीय नागरिक म्हणून वावरतो.

‘हमसफर ट्रस्ट’चा अध्यक्ष म्हणून मी आजवर सर्व क्षेत्रांतील शेकडो नव्हे, तर हजारो समलिंगी व्यक्तींशी बोललेलो आहे. समलिंगी व्यक्तींबाबतचा सगळीकडे आढळणारा, समान धागा म्हणजे- त्यांना कायम नाकारलं जाणं, शिक्षा आणि छळ यांना सामोरं जावं लागतं. यापुढच्या लेखांमध्ये मी आता लैंगिक संबंध, लैंगिकता आणि लिंगभाव या साऱ्यांबद्दलची अगदी प्राथमिक माहिती तुम्हाला सांगणार आहे. आतापर्यंत मी तुम्हाला समलिंगी व्यक्तींचा सगळा इतिहासही थोडक्यात सांगितला. ‘असे लोक’ या जगात का अस्तित्वात आहेत, हेही आपण पाहिलं. आता आपण भारतीयांना लैंगिक संबंध, लैंगिकता आणि लिंगभाव या गोष्टी गोंधळात का पाडतात, हे पुढच्या लेखांमधून पाहणारच आहोत.

याआधी पाहिलेल्या गोष्टींचं सार सांगायचं तर, अखेर समलैंगिकता ‘बरी’ करण्यासाठी फ्रॉइडच्या चिकित्सापद्धतीसोबतच अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या भोंदूगिरीच्या पद्धती कुचकामी ठरल्या. अगदी जनुकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आपल्या डीएनएमध्ये ‘गे जीन’ शोधण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. अर्थात अंध माणसानं एखाद्या अंधाऱ्या खोलीत सुई शोधण्यासारखाच हा प्रकार होता म्हणा. सरतेशेवटी या ‘आजार’ प्रकरणावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओनं) १९७२ मध्ये जीनिव्हा इथं सादर केलेल्या एका अभ्यासपूर्ण निबंधानं पडदा पाडला. डब्ल्यूएचओ ही संघटना सर्वासाठी आरोग्याचे निकष ठरवते. या सन्माननीय संघटनेनं समलैंगिकतेला मानसिक आजाराच्या यादीतून आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय विकृतींमधून काढून टाकलं. समलैंगिकांसाठी हा खूप मोठा विजय होता. या दिलासा देणाऱ्या विजयामुळे ते पुढच्या लढय़ासाठी मानसिकदृष्टय़ा तयार झाले.

हे कसं घडलं, ते पाहू पुढच्या लेखात. मात्र तोवर या विषयावरची मतं आणि सूचना कळवा.

अशोक रावकवी arowkavi47@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on February 10, 2018 12:37 am

Web Title: who removed homosexuality from mental illness