माणसाच्या अत्यावश्यक गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा यांसोबत आता स्मार्टफोनचीही भर पडली आहे. रोजच्या दैनंदिन कामाच्या गोष्टींचे रिमाइंडर लावण्यापासून ते बिलं भरणं, खरेदी करायच्या वस्तूंच्या याद्या करणं ते अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची आठवण करण्यासाठीही स्मार्टफोन हाताशी असतो. स्मार्टफोन आणि त्यातली अ‍ॅप्स हे जसे वेळ घालवायला, मित्र-मैत्रिणी जोडून त्यांच्याशी संवाद साधायचा पर्याय म्हणून स्वीकारले जाताहेत, तशीच आरोग्याची काळजी घेण्यासाठीही या अ‍ॅप्सना पसंती दिली जाते.

– भक्ती बिसुरे

स्मार्टफोनचं प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर जरा चाळून त्यातल्या हेल्थ मेनूला भेट दिलीत तर अक्षरश: असंख्य प्रकारचे अ‍ॅप्स सेवेसाठी हजर असलेले दिसतील. हेल्थ अ‍ॅप वापरल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक अनुभवही नोंदवले जातात. अ‍ॅप ही काही जादू नाही, त्यामुळे एकदा अ‍ॅप सुरू केले की आरोग्याच्या समस्या सुटत नाहीत. त्याचप्रमाणे व्यायाम, योगा, ध्यानधारणा (मेडिटेशन) यासाठीचीही काही अ‍ॅप्स वापरताना त्याचे दुष्परिणाम काय असू शकतील, त्याचा विचार करावा़  त्यासाठी काही वेळा अ‍ॅप्समधील परीक्षण वाचूनही मदत मिळू शकते. फिटनेसतज्ज्ञ मिहीर तेरणीकर म्हणाले, काही वेळा पाणी, आहाराचा मागोवा ठेवणाऱ्या अ‍ॅप्समध्ये आपल्याला माहिती अपडेट करावी लागते. सुरुवातीच्या चार दिवसांच्या उत्साहानंतर आपण कंटाळा करतो आणि मग अ‍ॅप उपयोगी नसल्याचे वाटते; पण अ‍ॅप हे केवळ मदतीचे साधन आहे, त्यामुळे ते वापरताना योग्य खबरदारी घ्यावी, असे तेरणीकर यांनी स्पष्ट केले.

झोपेविषयी माहिती

रात्री झोप छान झाली तर दिवसभर काम करण्यासाठी उत्साह येतो. थकवा, ताणतणाव यामुळे झोपेकडे आपलं लक्ष जात नाही; पण ही गोष्ट बदलण्यातही स्मार्टफोन अ‍ॅप तुमच्या मदतीला आहेतच. रात्री झोपताना अलार्म सुरू केला तर पुरेशी झोप होताच अ‍ॅप अलार्म वाजवून तुम्हाला उठवते. अ‍ॅप वापरण्यास सुरुवात करताच तुमची झोपायची वेळ झाल्यावर त्याची आठवणही हे अ‍ॅप तुम्हाला करेल. या अ‍ॅपचा वापर झोपेची नोंद ठेवण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे वापरकर्त्यांकडून सांगितलं जातं.

* ‘स्लीप ट्रॅकर’, ‘स्लीप टाइम’, ‘स्लीप सायकल’ असे काही अ‍ॅप्स तुम्हाला तुमच्या झोपेची नोंद ठेवायला मदत करू शकतात.

झोपेविषयी माहिती

रात्री झोप छान झाली तर दिवसभर काम करण्यासाठी उत्साह येतो. थकवा, ताणतणाव यामुळे झोपेकडे आपलं लक्ष जात नाही; पण ही गोष्ट बदलण्यातही स्मार्टफोन अ‍ॅप तुमच्या मदतीला आहेतच. रात्री झोपताना अलार्म सुरू केला तर पुरेशी झोप होताच अ‍ॅप अलार्म वाजवून तुम्हाला उठवते. अ‍ॅप वापरण्यास सुरुवात करताच तुमची झोपायची वेळ झाल्यावर त्याची आठवणही हे अ‍ॅप तुम्हाला करेल. या अ‍ॅपचा वापर झोपेची नोंद ठेवण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे वापरकर्त्यांकडून सांगितलं जातं.

* ‘स्लीप ट्रॅकर’, ‘स्लीप टाइम’, ‘स्लीप सायकल’ असे काही अ‍ॅप्स तुम्हाला तुमच्या झोपेची नोंद ठेवायला मदत करू शकतात.

योगासने-मेडिटेशन

योगासने ही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात, पण प्रत्येकालाच योगासनांच्या वर्गाला जाणे शक्य नसते. योगासनांची प्रात्यक्षिकांची चित्रफीत, आकृत्या दाखवणारी अ‍ॅप आता स्मार्टफोनवर आहेत. कोणते आसन कसे करावे, ते करताना काय खबरदारी घ्यावी, त्याचे फायदे काय होतात याची माहिती यावर उपलब्ध आहे. यातील काही अ‍ॅप पूर्ण मोफत, तर काही अ‍ॅप्ससाठी शुल्क आकारलं जातं. प्रथमच योगासने करणाऱ्यांसाठी, मानसिक शांततेसाठी, चांगली झोप मिळण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी करता येतील अशी आसने यात देण्यात आली आहेत.

* ‘योगा फॉर बिगिनर्स’, ‘डेली योगा’, ‘योगा गो’, ‘बेटर मी- योगा’ ही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

‘मासिक पाळी’विषयी माहिती

मासिक पाळी हा महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग. मासिक पाळीचे चक्र नोंद करून ठेवणारी कॅलेंडर अ‍ॅप स्वरूपात स्मार्टफोनमध्ये काम करतात. मासिक पाळी जवळ आल्याची आठवण ते करून देतात. पाळीच्या दरम्यान दिसणाऱ्या लक्षणांची नोंद ठेवण्याची सोय त्यामध्ये असते. रोजच्या रोज तुम्ही घेत असलेली औषधं, त्यांच्या वेळा यांचे रिमाइंडर लावले तर औषधं घ्यायची वेळ झाली की, हे अ‍ॅप तुम्हाला आठवण करून देतं. या अ‍ॅपचा वापर उपयोगाचा ठरत असल्याचं मत अनेक महिला नोंदवतात.

* ‘क्लू- पीरियड ट्रॅकर’, ‘पीरियड डायरी’ ही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

किती पाणी प्यावे?

‘पाणी हे जीवन’ असं आपण शाळेत शिकलोय. थकवा आला आणि पाणी प्यायले की थकवा लगेच गायब होतो; पण अनेकदा आपण पाणी प्यायला विसरतो किंवा तहान लागली आहे हे आपल्याला कळत नाही. काळजी करू नका. तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करणारी अनेक अ‍ॅप्स स्मार्टफोनमध्ये आहेत. दिवसभरात तुम्ही किती पाणी प्यायलात याची नोंद हे अ‍ॅप ठेवेल आणि तुम्हाला पाणी पिऊन बराच वेळ झालाय याची आठवणही करून देईल! याचा वापर करायला लागताच शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे येणारा थकवा किंवा डिहायड्रेशनमुळे होणारा त्रास कमी झाल्याचा प्रतिसाद नोंदवण्यात आला आहे. मात्र तुम्ही पाणी प्यायलात की नाही आणि किती प्यायलात याची नोंद तुम्हालाच अ‍ॅपवर करावी लागते.

* ‘ड्रिंक वॉटर रिमाइंडर’, ‘वॉटर ट्रॅकर’, ‘हॅव अ ग्लास ऑफ वॉटर’ अशा नावांची अ‍ॅप्स प्ले स्टोअरमध्ये मिळू शकतात.

फिटनेस’ राखण्यासाठी..

कामाच्या वेळा, कामासाठी करावा लागणारा प्रवास, आरोग्याच्या तक्रारी, खाण्यापिण्याकडे होणारं दुर्लक्ष या बाबी बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्याचा भाग झाल्या आहेत. आपल्या फिटनेसची माहिती देणारी अनेक अ‍ॅप्स स्मार्टफोनमध्ये मिळतात. सकाळी उठल्यापासून तुमच्या शरीराची किती हालचाल झाली, त्यातून किती ऊर्जा खर्च झाली अशा अनेक गोष्टींचा लेखाजोखा ठेवून एकत्रित उपलब्ध करून द्यायचं काम काही अ‍ॅप्स करतात. दिवसभर तुम्ही किती किलोमीटर चाललात, किती मिनिटं चाललात, या चालण्यात तुमचे किती उष्मांक खर्च झाले त्याची नोंदही अ‍ॅप्स ठेवतात. त्यामुळे व्यायाम आणि फिटनेसविषयी जागरूक असलेल्यांसाठी ही अ‍ॅप्स उपयोगी पडतात. मात्र त्यांच्या अचूकतेबद्दल संपूर्ण खात्री देता येत नाही. अ‍ॅप वापरणाऱ्यांशी त्याबद्दल बोललं असता खेळाडू किंवा अ‍ॅथलीट जे दिवसभर फिटनेससाठी व्यायाम, खेळ अशा अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतात, त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष व्यायाम आणि खर्च झालेल्या उष्मांकाचे (कॅलरी) गणित प्रत्येक अ‍ॅपवर वेगवेगळे दिसून येते. काही वेळा खूप जास्त, तर काही ठिकाणी कमी उष्मांकांची नोंद होते.

* ‘३० डे फिटनेस’, ‘फिटनेस’, ‘जिम वर्क आऊट’, ‘स्टेप्स ट्रॅकर’ अशा नावांनी ही अ‍ॅप्स तुमच्या अ‍ॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.