News Flash

बदलत्या जीवनशैलीमुळे यकृतदाह

फॅटी लिव्हर म्हणजे चरबीमुळे जाड झालेले यकृत. स्थूलतेमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

 

– डॉ. रॉय पाटणकर यकृततज्ज्ञ, पोटविकारतज्ज्ञ

दारूचे अतिसेवन हे फॅटी लिव्हर (चरबीयुक्त यकृत) किंवा सिरोसिस होण्याचे प्रमुख कारण. मात्र आता जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे महिलांमध्ये फॅटी लिव्हर व त्यातून सिरोसिस वाढत आहे. तेलातुपाचे वाढलेले प्रमाण व व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना फॅटी लिव्हरची समस्या होते. आहारात व जीवनशैलीत वेळीच योग्य बदल केले तर या आजारापासून दूर राहता येईल.

वर्षांनुवर्षे अर्निबधित प्रमाणात दारू प्यायल्यावर अनेकदा त्याची परिणती रुग्णालयात दाखल होण्यात होत असे. त्यामुळे फॅटी लिव्हर आणि यकृतदाह हा आजार दारूशी व पर्यायाने पुरुषांशी जोडला गेला. दारू व मादक पदार्थाचे अतिसेवन हे यकृतदाहाचे कारण असले तरी आता बदलती जीवनशैली हेदेखील याचे प्रमुख कारण होऊ पाहत आहे. त्यामुळेच पुरुषांशी निगडित असलेल्या या आजाराचे महिलांमधील प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे.

रक्त गोठवणाऱ्या घटकांची (अल्बुमिन) निर्मिती करणे, रक्तामध्ये तयार झालेला अमोनिया पित्तावाटे शरीरातून बाहेर टाकणे, खाल्लेल्या अन्नातून शरीरासाठी आवश्यक ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे-लोह-क्षार यांचा साठा करणे, आतडय़ातून शरीरात प्रवेश करू पाहणारे जंतू नष्ट करणे ही यकृताची प्रमुख कार्ये आहेत. यकृतदाह या आजाराची लागण झाल्यामुळे यकृताला त्याचे कार्य करण्यास अडथळा निर्माण होतो.

फॅटी लिव्हर म्हणजे चरबीमुळे जाड झालेले यकृत. स्थूलतेमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. या अतिरिक्त चरबीचा थर यकृतावर जमा होतो आणि यामुळे यकृताच्या पेशींना नियमित काम करण्यास अडथळा निर्माण होतो. त्याला ‘फॅटी लिव्हर’ असे म्हटले जाते. त्याशिवाय थायरॉइड, स्थूलपणावर केलेल्या शस्त्रक्रिया आणि कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढणे या कारणामुळेही यकृतातील चरबीचे प्रमाण वाढते. ही चरबी चार पातळ्यांवर मोजली जाते. पहिल्या पातळीत यकृतावर चरबीचे प्रमाण कमी असते. त्याचा परिणामही फारसा दिसून येत नाही. मात्र या चरबीचे प्रमाण वाढले तर त्याचा परिणाम दिसतो. ही स्थिती अनेक वर्षे राहिली तर रुग्णाला फायब्रोसिस आणि दुसऱ्या पातळीवर यकृतदाह होतो. स्थूलतेबरोबर हेपिटायटिस ए, ई आणि बी याची बाधा झाल्यामुळेही यकृताला काम करण्यास अडथळा निर्माण होऊन यकृतदाह होतो. हा आजार यकृतदाहपर्यंत न थांबता कालांतराने रुग्णाला यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

यकृत जाड होणे किंवा यकृतदाह होणे याला दारू कारणीभूत आहेच. त्याशिवाय जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव ही जीवनशैलीजन्य कारणेही जबाबदार आहेत. यकृतावर चरबी जमा झाल्यामुळे आम्लपित्त व पित्ताशयात खडे होण्याचे प्रमाणही वाढते.

यकृतदाह होण्यामागे मधुमेह हा जीवनशैलीजन्य आजारही कारणीभूत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवले नाही तर त्यांना ‘फॅटी लिव्हर’ची बाधा होते आणि कालांतराने त्यांना यकृतदाह आजाराची लक्षणे दिसू लागतात.

हेपेटायटीस ई, बी आणि सी या विषाणूंच्या संसर्गामुळेही यकृताचे कार्य मंदावते. हेपेटायटीस विषाणूंचे संक्रमण विविध माध्यमातून होऊ शकते. एखाद्या शस्त्रक्रियेदरम्यान किंवा रुग्णाला रक्तदान करते वेळी प्रतिबंधात्मक काळजी न घेतल्यामुळे, र्निजतुक न केलेल्या सुईचा वापर, असुरक्षित लैंगिक संबंध ही कारणे हेपेटायटिस विषाणूंचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरतात. हे विषाणू गर्भवती आईपासून बाळापर्यंतही संक्रमित होऊ शकतात.

लक्षणे

फॅटी लिव्हरच्या पहिल्या पातळीवर फारशी लक्षणे दिसत नाहीत. मात्र जीवनशैलीत वेळीच बदल केले नाही की त्याचे रुपांतर यकृतदाहमध्ये होऊ शकते. या पातळीवर यकृतातील बहुतांश पेशी खराब होऊन नष्ट झालेल्या असतात व त्याची जागा तंतूंनी घेतलेली असते. यकृत कडक होऊन त्याचा आकारही अगदी लहान झालेला असतो. अनेकदा यकृतदाहामुळे रुग्णाच्या पोटात पाणी जमा होते ज्याला जलोदर म्हटले जाते. पायाला सूज येणे, रक्ताची उलटी होते, अतिसार होणे, भूक मंदावणे, पोटाच्या उजव्या भागातून कळा येणे ही यकृतदाह आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. यकृत घट्ट झाल्यामुळे यकृतातील रक्त प्रवाह कमी होतो व पोटातील अन्नसंस्थेतील नलिकांमध्ये रक्तदाब वाढतो. त्यामुळे रुग्णास अन्ननलिकेतून रक्तस्त्रावही होऊ  शकतो. यकृताच्या प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे रुग्णाच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

काय काळजी घ्यावी?

जीवनशैलीत वेळीच बदल केले तर फॅटी लिव्हरचे प्रमाण कमी करता येते व यकृताचे आजार टाळता येतात. आहारातील तेलकट, तूपकट पदार्थ टाळावे. रोजच्या आहारात पालेभाज्या, फळे यांचा समावेश असावा. मीठाचे प्रमाण कमी करावे. रोजच्या जेवणातून मीठ फार प्रमाणात शरीरात जात नाही. मात्र खारवलेले- साठवलेले पदार्थ, जंकफूड यात भरपूर प्रमाणात मीठ असते. मधुमेही रुग्णांनी आहाराबाबत विशेष  सजग राहावे. व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवावे. दारू  व मादक पदार्थाचे सेवन यकृतासाठी हानीकारक आहे, हे लक्षात असू द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:18 am

Web Title: liver inflammation due to changing lifestyles
Next Stories
1 स्वाइन फ्लू?.. घाबरू नका!
2 बाल आरोग्य : पोटदुखी, खरी की खोटी?
3 पावसाळा अन् आरोग्य
Just Now!
X