21 March 2019

News Flash

पिंपळपान : खरबूज

खरबूज हे फळ शीतल, ग्राही, मूत्रजनन व मोठय़ा प्रमाणावर घेतल्यास खळखळून जुलाब होण्यास उपयोगी पडते

खरबूज

उन्हाळ्यामध्ये आपल्या मंडी बाजारात आंब्यासकट खूप खूप फळांची रेलचेल असते. त्यातील खरबूज या फळाचा गोडवा काही अनोखाच असतो. खर्बुजा (संस्कृत,  हिंदी) गिध्रो (सिंधी), केक्करिके (कन्नड) चिबूड किंवा खरबूज (मराठी) या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या फळाची दिवसेंदिवस वाढती लागवड आहे.

खरबूज हे फळ शीतल, ग्राही, मूत्रजनन व मोठय़ा प्रमाणावर घेतल्यास खळखळून जुलाब होण्यास उपयोगी पडते. फळाच्या बियांमध्ये तेल खूप असते. परंतु त्या बिया लवकर खवट होतात. बिया शीतल, मूत्रजनन आणि बल्य गुणाच्या असतात. लघवी कष्टाने होत असल्यास या बियांचे चूर्ण घ्यावे. इसब, गजकर्ण अशा त्वचाविकारांत खरबूज ताजे ताजे खाल्ल्याने फायदा होतो, असे औषधसंग्रहीकर्ते डॉ. वा. ग. देसाई यांचे मत आहे.

उन्हाळ्यात घरोघरी फ्रुटसॅलडचा आस्वाद घेतला जातो. त्यात खरबुजाचा समावेश असतो हे सांगावयास नकोच. उन्हाळय़ात हे फळ अत्यंत उपयोगी आहे.

खुळखुळा

‘शणपुष्पी रसे तिक्तां वमनो कफपित्तजित्।

कषाया कष्ठहृद्रोग मुखरोगविनाशिनी।।’   (ध. नि.)

शणपुष्पी (संस्कृत), घागरी (मराठी) किंवा खुळखुळा, गिजिगिळि (तामिळ, मल्याळम), तिरत अशा नावांनी ओळखले जाणारे क्षुप; एकेकाळी रेताड आणि ओसाड जमिनीत मोठय़ा प्रमाणावर आढळत असे. याच्या फायद्या चौकोनी आकाराच्या गुळगुळीत आणि त्यांच्या टोकांना इंचभर लांबीच्या शेंगा असतात. वाळलेल्या सुक्या शेंगा हलवल्यावर खुळखुळ असा आवाज येतो म्हणून या वनस्पतीला खुळखुळा असे सार्थ नाव आहे. औषधात फक्त पाने वापरतात. पानांचा रस चवीने कडू असतो. पाने अंडाकृती आणि देठाकडे चिंचोळी असतात. फुले फिक्कट निळय़ा वर्णाची असतात.

खुळखुळय़ाची पाने वाटून त्यांचा लेप त्वचाविकारात लावल्यास थंडावा येतो आणि त्वचाविकारावर मात होते. पानांची क्रिया एकाच वेळेला त्वचेतील फाजील कफ आणि पित्त कमी करण्यासाठी वापरली जातात. तोंडात लाळ सुटत असल्यास खुळखुळ्याची पाने चावून खावीत, लाळ वाहणे कमी होते.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on April 10, 2018 1:50 am

Web Title: surprising health benefits and uses of muskmelon