उदरभरण नोहे.! : थंडीसाठी खास गोड पदार्थ

डिंकाचे लाडू, हळिवाचे लाडू, मेथीचे लाडू असे विविध प्रकारचे लाडू या दिवसांत घरोघरी होतात.

 

डॉ. संजीवनी राजवाडे

शरीरात ऊर्जा निर्माण करणारे, उष्णता वाढवणारे आणि कोरडय़ा हवेत त्वचा व केसांसह शरीराला आतूनही स्निग्धता देणारे पदार्थ हवे असतात. विविध लाडू, वडय़ा, खिरी असे गोड पदार्थ या व्याख्येत चपखल बसतात. त्यामुळे ज्यांना गोड आवडते आणि प्रकृतीलाही चालते त्यांना अधूनमधून आहारात हे पदार्थ नक्कीच घेता येतील. अशा काही खास थंडीसाठीच्या गोड पदार्थाबद्दल बघूया.

किमान तापमानाचे छापील आकडे सोडता थंडी सुरू झाली हे आपल्या कसे लक्षात येते?.. हवा थंड आणि कोरडी होते. त्वचा आणि ओठही कोरडे पडू लागतात. पायांना भेगा पडतात. वेळोवेळी मॉइश्चरायझर आणि लिपबाम वापरण्याची गरज भासू लागते. याचबरोबर मस्त भूक लागायला लागते. काहीतरी गोड, स्निग्ध खावे, अशी वारंवार इच्छा होते. थंडी आणि लाडू हे एक समीकरणच झाले आहे. दिवाळीत रवा आणि बेसनाच्या लाडूंनी त्याची सुरुवात होते. डिंकाचे लाडू, हळिवाचे लाडू, मेथीचे लाडू असे विविध प्रकारचे लाडू या दिवसांत घरोघरी होतात. केवळ लाडूच नव्हे, तर विविध प्रकारच्या गोड वडय़ा आणि खिरीही थंडीत ऊर्जा आणि स्निग्धता देणाऱ्या असतात.

  • मेथी लाडू, डिंक लाडूंमध्ये सुकामेवा आवर्जून वापरला जातो. हा सुकामेवा भरपूर प्रमाणात ऊर्जा देतो आणि लाडूतील साजुक तूपही शरीराला स्निग्धता व ओलावा देते. गूळपापडीचे लाडू, राघवदास लाडू, तांदळाच्या वा मुगाच्या पिठाचे लाडू अशा इतर लाडवांमध्येही अनेक जण तळून फुलवलेला डिंक व गूळ वापरतात. गुजरातमध्ये उडदाच्या डाळीचा ‘अडदिया पाक’ नावाचा एक गोड पदार्थ मिळतो. तोही साधारणत: लाडूंच्या जवळ जाणारा असतो. उडीद खरे तर पचायला जड. पण या ऋतूत पोटातील अग्नी प्रदीप्त झालेला असतो. शरीरात उष्णता साठवून ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे एरवी पचायला जड असलेले विविध लाडू या दिवसांत तुलनेने सहज पचतात. कधी खजुराचा लाडूही सुकामेवा घालून करता येईल.
  • हिवाळ्यात जंतूसंसर्गाचे प्रमाण कमी असते. हवादेखील मोकळी आणि स्वच्छ असते. शरीर बळकट होण्यासाठी गोड व स्निग्ध पदार्थाचा उपयोग होतो. या दिवसांत अधूनमधून मसाला दूध, काजू-बदामाचा शेकही घेता येईल. कधीतरी गरम दूध व बदामाचे तेल वा दूध आणि साजूक तूपही रात्री घेता येते.
  • मधल्या वेळी सुक्यामेव्याची चिक्की, शेंगदाणा चिक्की उत्तम.
  • दुपारच्या जेवणात रवा, शेवया, तांदूळ अशा वेगवेगळ्या खिरी घेता येतील. जेवणाच्या तो पोटभरीचा पदार्थही ठरतो. खिरीत घातलेले दूध थोडे आटवलेले असल्यामुळे त्यानंतर शरीराची हालचाल होणे गरजेचे. ही हालचाल दुपारच्या जेवणानंतर होते त्यामुळे शक्यतो खिरी दुपारच्या जेवणात चांगल्या. त्यातून ऊर्जा, प्रथिने आणि कार्यशक्तीही मिळते. खिरींना सुंठ, वेलची, जायफळ यांची जोड द्यावी. त्यामुळे पचनव्यवस्थेची हालचाल वाढण्यास मदत होते.
  • आलेपाकाची वडी थंडीत जरूर खावी. आता लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. बऱ्याचदा जड जेवण होते. अशा वेळी जेवणानंतर आलेपाक वडी जरूर घ्यावी. त्याने अपचन टाळण्यास मदत होते.
  • या ऋतूत मोरावळा जरूर खावा. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व असते. त्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्वचेत थंडीमुळे कोरडेपणा येतो त्यामुळे त्वचेची लवचीकता कमी होते. ती पूर्ववत राखण्यासाठी मोरावळ्याचा एक प्रकारे उपयोगच होतो. त्यात साखरेच्या पाकात आवळा व वेलची घालतात. त्याने ऊर्जाही मिळते, शिवाय तेल-तूप नसले तरी स्निग्धताही मिळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Special sweet foods for cold

ताज्या बातम्या