कधी काळी सायकलिंग हा अनेकांच्या जनजीवनाचा भाग असला तरी तो एक क्रीडाप्रकार म्हणूनदेखील हळूहळू का होईना विकसित होत होता. आणि विविध स्तरांवर होणाऱ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व फार पूर्वीपासूनच सुरू झाले होते. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे १९३८ साली झालेल्या ब्रिटिश एम्पायर गेम्समध्ये सायकलिंग क्रीडाप्रकारात सहभागी झालेले जानकी दास एकमेव भारतीय खेळाडू होय. पुढे १९४६ साली जानकीदास आणि मुंबईच्या सोहराब भूत यांच्या पुढाकाराने नॅशनल सायकलिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. विशेष म्हणजे या संस्थेला युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेची संलग्नताही लाभली होती. त्याच वर्षी स्वित्झर्लंड येथे पार पडलेल्या जागतिक सायकिलग चॅम्पियनशिप आणि दोन वर्षांनंतर १९४८ साली लंडन येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धामध्येही भारतीय संघ सहभागी झाला होता.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) ही संस्था भारतामध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता असलेली ही एकमेव संस्था आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए), आशियाई सायकलिंग महासंघ (एसीसी) आणि युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) या संस्थांशी संलग्न आहे.
१९५१ साली दिल्ली येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सायकलिंग हा खेळदेखील होता. १९५५ साली नॅशनल सायकलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया ही संस्था आणि भारत सरकार यांच्यामध्ये निर्माण झालेल्या दरीमुळे तब्बल सहा वर्षे भारतीय संघाला कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. पुढे १९६२ साली हे वितुष्ट संपुष्टात आले आणि पुन्हा एकदा सायकल फेडरेशनला भारत सरकारची मान्यता मिळाली. त्यानंतर टोकियो येथे १९६४ साली पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाला; परंतु सरावाअभावी भारतीय संघ या वेळी विशेष कामगिरी करू शकला नाही आणि त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील सहभागांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यानंतर पुन्हा सहा वर्षांनी १९७० साली थायलंडमधील बँकॉक येथे पार पडलेल्या सहाव्या आशियाई खेळांमध्ये नऊ सायकलपटूंचा संघ पाठवण्यात आला आणि त्यानंतर भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील सहभागाचा मार्ग सुकर झाला. १९६६ साली नॅशनल सायकलिस्ट फेडरेशन इंडियाचे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया असे नामांतर करण्यात आले. पूर्वी संस्थेच्या सदस्यत्वासाठी दर तीन वर्षांनी निवडणूक घेतली जात असे, पण १९७९ साली त्यामध्ये बदल करून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनप्रमाणे ही मुदत चार वर्षांची करण्यात आली.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे दरवर्षी मुंबई-पुणे सायकल स्पर्धा, २००९ पासून टूर-दी-इंडिया ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा, उत्तराखंड आणि केरळ येथे माऊंटन बाइक स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, केरळ या राज्यांमध्ये सायकलिंग मॅरेथॉनचेही नियमितपणे आयोजन करण्यात येते.
प्रशांत ननावरे
prashant.nanaware@expressindia.com
Twitter @nprashant