दुचाकीवरून : सायकलिंग आणि प्रथमोपचार

वाहनच आहे आणि सायकलला झालेल्या अपघातामध्ये सायकलस्वारालाही इजा होण्याची शक्यता असते.

अपघात म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मोटारसायकल किंवा चारचाकी वाहनांचे अपघात येतात, पण सायकलसुद्धा एक वाहनच आहे आणि सायकलला झालेल्या अपघातामध्ये सायकलस्वारालाही इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सायकल चालवताना खबरदारी घेणे केव्हाही उत्तम. सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे कोणताच त्रास होत नाही. परंतु हल्ली शहरांतील रस्त्यांची दुरवस्था पाहता पाठीचं किंवा मानेचं दुखणं वर डोकं काढू शकतं. इतर वाहनचालकांच्या चुकीचा फटका सायकलस्वाराला बसू शकतो किंवा लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये अपघाताला सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी छोटी प्रथमोपचार पेटी जवळ असणं केव्हाही उत्तम.
प्रत्येक अपघातात होणारी शारीरिक इजा कमीअधिक प्रमाणात असू शकते. काही अपघात किरकोळ म्हणून प्रथमोपचार करण्यासारखे असतात. पण धोका दिसत असेल तर योग्य तो प्रथमोपचार करून ताबडतोब रुग्णालयात पाठवणे आवश्यक असते. वेळीच मिळालेला प्रथमोपचार लाखमोलाचा ठरू शकतो.

हे लक्षात ठेवा
– लांब पल्ल्याच्या सायकल सफरीला जाताना प्रथमोपचाराची प्राथमिक माहिती प्रत्येक सायकलस्वाराने करून घ्यायला हवी.
– तुमच्या घरगुती डॉक्टरांना तुमच्या सायकल सफरीची कल्पना देऊन हवामान, प्रदेश, आहार आणि उपलब्धतेनुसार औषधं सोबत घेऊनच सफरीला निघा.लांब पल्ल्याच्या सायकल सफरीदरम्यान ओळखपत्र जवळ बाळगा आणि त्यावर तुमच्या डॉक्टरांचा संपर्क क्रमांक नमूद करा.
– सामानामध्ये किंवा सायकलवर प्रथमोपचार पेटी आवश्यकता भासल्यास सहज हाती लागेल अशा ठिकाणी ठेवा.
– तुम्ही ज्या प्रदेशात सायकलिंगसाठी जाणार आहात तेथील वाटेतील रुग्णालयं आणि प्रथमोपचार केंद्रांची माहिती जवळ ठेवा.
– सायकलपेक्षा सायकलस्वाराची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे अपघातानंतर सर्वात आधी सायकलस्वाराकडे लक्ष द्या.
– सायकलस्वाराला मुका मार लागला आहे की गंभीर दुखापत झाली आहे याची खातरजमा करून पुढील उपचाराची दिशा ठरवा.
– जर तुम्हाला गुडघ्याचं दुखणं असेल तर गुडघ्याला बांधायचे क्रेप बॅण्डेज लावूनच सायकलिंग करा.
– कमी किंवा अधिक उंचीवर जाणवणाऱ्या थकव्याकडे किंवा अशक्तपणाकडे दुर्लक्ष करू नका. त्याची माहिती इतर सदस्यांना द्या आणि त्यावर ताबडतोब उपचार करून घ्या.
– सायकलिंग करताना योग्य प्रमाणात पाणी आणि आहार घ्या.

प्रथमोपचार पेटीत काय असावे?
रबराचे हातमोजे, निरनिराळ्या आकाराच्या बॅण्डेज पट्टय़ा, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस, अ‍ॅण्टिसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन), सोफ्रामाइसिन, जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी, चिकटपट्टी, डोकेदुखीवरील आणि सूज आलेल्या ठिकाणी लावता येणारे मलम किंवा स्प्रे, गरम पाण्याची छोटी पिशवी, स्पॉन्ज, कैची, छोटा चिमटा, छोटी टॉर्च, थर्मामीटर, पेट्रोलियम जेली, साबण.
prashant.nanaware@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cycling and first aid