25 September 2020

News Flash

अन्सारी देशाचे उपराष्ट्रपती होते की एका समाजाचे?

देशातील मुस्लीम व्यक्ती सुरक्षित नाहीत, अशा भावना मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केल्या.

देशातील मुस्लीम व्यक्ती सुरक्षित नाहीत, अशा भावना मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केल्या. त्यांना नक्कीच मतस्वातंत्र्य आहे. खरं तर मुस्लीम सुरक्षित आहेत की नाही याबद्दल मतमतांतरे असू शकतात. पण त्यांनी हे बोलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की ते अजूनही संवैधानिक पदावर होते. ते कोणत्या धर्माचे आहेत यावर बोट ठेवायला नकोच, पण १० वर्षे या पदावर असताना ते नक्की भारताचे उपराष्ट्रपती होते की एका विशिष्ट समाजाचे हा प्रश्नच आहे. विचार करण्यासारखा एक मुद्दा आहे तो म्हणजे जर कार्यकालाच्या शेवटाकडे त्यांच्याकडून या प्रकारचं विधान येत असेल आणि त्या विधानाचा कोणाला आक्षेप नसेल तर आपल्या देशाचं नेतृत्व येत्या काळात एखाद्या ‘स्वामी’ किंवा ‘योगी’कडे गेलं तर त्याला उगीचच ‘बहुसंख्यावाद’ किंवा ‘हिंदुत्ववाद’ असे ठोकताळे लावले जाणार नाहीत ही माफक अपेक्षा.

सिद्धार्थ चपळगावकर, पुणे

 

हे देशभक्त की देशद्रोही?

मुंबईच्या पालिका शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे, ही बातमी वाचून खरे तर असा ठराव करणाऱ्यांची कीव करावीशी वाटली. देश जेव्हा गुलामीत होता तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्ती जागवण्याचे काम ‘वंदे मातरम्’ या गीताने केले आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आज ‘वंदे मातरम्’ गीत म्हणताना प्रत्येक व्यक्तीला पुन्हा गुलामीत जगण्याची भावना निर्माण होईल. स्थल, कालपरत्वे प्रत्येक गोष्टीचे संदर्भ बदलत असतात, याचे भान नसणारे उथळ राजकीय नेतृत्व देशाला अराजकतेत लोटून पुन्हा गुलाम करू पाहत आहेत का, अशी शंका वाटते. वंदे मातरम् हे गीत सर्वसामान्य जनतेसाठी आन, बान व शान आहे, परंतु या गीताच्या आड देशातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्यासाठी शस्त्र म्हणून वापर जर राजकीय नेते करीत असतील तर त्यांना देशभक्त म्हणायचे की देशद्रोही?

जे. डी. पाटील, पुणे

 

वैज्ञानिकांना मोर्चा काढावा लागणे क्लेशकारक

‘विज्ञानाच्या गळचेपीचा वैज्ञानिकांकडून निषेध’ ही बातमी वाचली (१० ऑगस्ट). आणि आपली वाटचाल पुन्हा एकोणिसाव्या शतकाकडे होत असल्याची पुसटशी जाणीव झाली. सध्या गोमाता, भारतमाता, वंदे मातरम् वगैरेंसारख्या बाबींना चांगले दिवस आल्याने मूलभूत विज्ञान आणि संशोधनावरील निधीत कपात करायला सरकारला फारशी अडचण किंवा संकोचही वाटत नसावा.  अशा गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय जगतात आपले हसे तर होतेच, परंतु भावी पिढीसमोर आपण काय वाढून ठेवतो आहोत याचेही भान आपण विसरून जातो. वैज्ञानिकांना मोर्चा काढावा लागणे क्लेशकारक आहे. अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतील भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना भारतासाठी काम करण्याचे आवाहन केले होते. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील निधीत कपात केल्यावर असे तंत्रज्ञ भारतात येण्यासाठी कितपत रस घेतील आणि किती योगदान देऊ  शकतील, याचाही विचार करायला पाहिजे. विक्रम साराभाई, डॉ. होमी भाभा, सतीश धवन यांसारख्या शास्त्रज्ञांच्या पाठीमागे तत्कालीन राजकीय नेतृत्व भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळेच आज भारत अणुविज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात महान कामगिरी करू शकला आहे. म्हणून वैज्ञानिकांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.

 –सचिन वाळीबा धोंगडे, अकोले (अहमदनगर)

 

..तर नमामि गंगे मिशन गुंडाळा!

ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी ‘नमामि गंगे मिशन’च्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची बातमी वाचली (११ ऑगस्ट) आणि पुन्हा एकदा प्रशासनाच्या निद्रिस्त अवस्थेची प्रचीती आली. नोबेलच्या तोडीचा पुरस्कार मिळालेल्या या सन्माननीय व्यक्तीची कुचंबणा होऊ लागल्याने त्यांनी राजीनामा दिला, यातच सर्व काही आले. नर्मदा स्वच्छता अभियानाचे सदस्य असताना मोदींच्या सहकार्याने त्यांनी चांगला उपक्रम राबविला होता. केंद्र सरकारने या कामासाठी प्रचंड निधी आणि स्वतंत्र मंत्री नेमला असतानाही उत्तर प्रदेश सरकार आणि महानगरपालिका यांचे सहकार्य मिळत नसेल तर हे मोदी यांचेच अप्रत्यक्ष अपयश मानावे लागेल. तज्ज्ञांचे म्हणणे व शिफारशी मान्य होणार नसतील तर हे अभियान गुंडाळलेलेच बरे.

  –महेश कृष्णा पगार, कळवण (नाशिक)

 

 ‘बलात्कारया शब्दाची व्याख्याच बदलावी

‘वैवाहिक बलात्कार हा फौजदारी गुन्हा नाही’ याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले स्पष्टीकरण अतिशय योग्य आहे. कारण लग्न करून ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार कसा होऊ शकतो? वृत्तपत्रांमध्ये अनेकदा लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला, असा उल्लेख असतो. खरं तर ते वाक्य लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले असं असायला पाहिजे. यामुळे गुन्हा फसवणुकीचा दाखल झाला पाहिजे, बलात्काराचा कसा? मुळात आमिष दाखवून केलेली कुठलीही गोष्ट हे एक डील असतं, सक्ती नाही. त्यामुळे हे बलात्काराच्या व्याख्येत कसं बसतं याचा पण विचार केला पाहिजे. निदान या प्रकारामुळे तरी बलात्काराची व्याख्याच बदलायला हवी.

 –सहदेव निवळकर, सेलू (परभणी)

 

जडेजाची कामगिरी कौतुकास्पद

आपल्या प्रभावी डावखुऱ्या फिरकीमुळे आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल गोलंदाज ठरलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजीतही चमक दाखवीत अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. नुकत्याच आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत कोलंबो कसोटीतील नाबाद ७० धावा आणि सात विकेटच्या जोरावर बांगला देशच्या शकीब अल हसनला मागे टाकत जडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिले स्थान मिळविले. भारतीय खेळाडूने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिले स्थान मिळविण्याची ही पहिलीच वेळ असून यानिमित्ताने जडेजाने भारताला बऱ्याच दिवसापासून भेडसावणारी अष्टपैलू खेळाडूची समस्या दूर केली आहे.

प्रा. विजय कोष्टी, कवठेमहांकाळ (सांगली)

 

इंग्रजी म्हणीचा तंतोतंत प्रत्यय

सत्याला आणि तर्काला सोडून वागले की काय होते, याचे अचूक वर्णन करणाऱ्या इंग्रजी म्हणीचे तंतोतंत प्रत्यंतर गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्याविरुद्ध भाजपने जो  कुटील डाव टाकला त्यामुळे आले :   You can’t break logic. If you try to break logic, logic breaks your back.

संजय चिटणीस, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 2:33 am

Web Title: loksatta readers letter part 68
Next Stories
1 मराठेशाहीच्या इतिहासाला प्राधान्य हवेच
2 शिक्षणावरील गुंतवणूक ही राष्ट्रीय संपत्तीच
3 मूलतत्त्ववादी शिफारशी!
Just Now!
X