एकदा एक खेकडा आपल्याच नादात रमत गमत वाळूतून चालला होता. त्याच्या पायांमुळे वाळूवर छान नक्षी उमटत होती. तेवढय़ात समुद्राची एक मोठी लाट आली व तिने खेकडय़ाने काढलेली नक्षी क्षणार्धात पुसून टाकली. खेकडय़ाला या गोष्टीचा खूप राग आला. लाटेने खेकडय़ाला खूप समजावयाचा प्रयत्न केला की तो वाळूवर स्वत:च्या हालचालींचे जे चित्र अजाणतेपणे उमटवत आहे त्यामुळेच मासेमारी करणाऱ्या कोळ्याला त्याचा ठावठिकाणा मिळणार आहे व ते त्याच्या जिवावर बेतणार आहे. पण खेकडा ऐकण्याच्या मूडमध्ये होता कुठे? उलट तो लाटेवर रागावून किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागला ! त्यामुळे व्हायचे तेच झाले, त्याच्या पायाची रांगोळी वाळूवर उमटत गेली व तो कोळ्याच्या नजरेत येऊन स्वत:चे प्राण गमावून बसला. कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील अशा घटना घडत असतात. समुद्राच्या लाटा म्हणजे परिस्थितीने वेळोवेळी चुका निस्तरण्याची दिलेली संधी किंवा खेकडय़ाचा हट्ट म्हणजे सुधारण्याची संधी असूनदेखील व्यवस्थापनाने वेळोवेळी केलेल्या त्याच त्याच चुका असे जर समीकरण मांडले तर किंवा खेकडय़ाने काढलेली रांगोळी म्हणजे गतवैभव व ती पुसून टाकणारी लाट म्हणजे बदलाची सुनामी (ज्यात भूतकाळ किती रम्य असला तरी पार नष्ट होऊन जातो) असा विचार केला तर पुढील कथा वाचताना तुम्हाला योग्य तो संदेश मिळेल. सोनी म्युझिक क्षेत्रामधील एक अग्रगण्य कंपनी! वॉकमन उद्योगात तर जवळजवळ मक्तेदारीच होती तिची; पण नवीन डिजिटल तंत्रज्ञान (एमपीथ्री, एव्हीआय वगैरे) आत्मसात करून घेण्याची कास न धरल्याने कंपनी म्युझिक क्षेत्रामध्ये रसातळाला गेली. मायक्रोसॉफ्ट व निन्तेंडो या प्रतिस्पर्धी कंपनींनी बाजारात आणलेल्या व्हिडीयो कन्सोलकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यानेदेखील सोनीचे खूप नुकसान झाले. ‘सीअर्स’ (रीं१२) व के मार्ट या दोन्ही कंपनींनीदेखील वॉल मार्टच्या रणनीतीकडे दुर्लक्ष केले. ‘बिग बॉक्स, लो प्राईस’ या त्यांच्या रणनीतीमुळे ‘सीअर्स’ व के मार्ट या कंपन्यांना बॅकफूटवर जावे लागले. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या क्षेत्रात होणाऱ्या आमूलाग्र बदलांकडे दुर्लक्ष करणे याचा अंतिम परिणाम म्हणजे अत्यंत मेहनतीने वाळूत चितारलेल्या रांगोळीचे (रम्य, गौरवशाली भूतकाळाचे) लाटेच्या एका तडाख्याने (बदलाच्या एका सुनामीने) नामोनिशाण न उरणे हाच असू शकतो. महत्त्वाकांक्षी ‘बोईंग ७८७ ड्रीम लायनर’चे नियोजन, बोईंगच्या डिझायनिंग टीमने पुन:पुन्हा (एकच चूक वारंवार) चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे हे विमान बाजारपेठेमध्ये यायला अक्षम्य उशीर झाला. त्यामुळे बोइंग कंपनीवर कधी काळी कामगार कपात करण्याची व तोटय़ातून बाहेर येण्यासाठी हातपाय मारायची नामुष्की ओढविली होती. खेकडय़ाने जशी वाळूवर चालण्याची चूक पुन:पुन्हा केली तशीच चूक, (चूक न सुधारण्याची चूक) बोईंगच्या व्यवस्थापनाने ड्रीम लायनरचे नियोजन करताना केली. काही वेळा कंपनी व्यवस्थापनाला वाटते की विलिनीकरण किंवा एक्विझिशनमुळेच कंपनीला सुगीचे दिवस येतील. एकदा असा निर्णय घेतला गेला की त्या निर्णयाचे काटेकोरपणे ‘स्वोट’ (रहडळ) विश्लेषण न करता त्या वाटेवर व्यवस्थापन चालू लागते. कंपनी व्यवस्थापनाच्या अहंकारामुळे, घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे कळत असूनदेखील पुढे जाऊन तो निर्णय बदलला जात नाही. हे वागणे म्हणजे आपला निर्णय योग्य की अयोग्य याचा विचार न करताच मार्गक्रमणा करणाऱ्या खेकडय़ासारखेच असते. दोन वेगवेगळ्या कंपनीची संस्कृती आपापसात नीट सांगड घालू शकेल की नाही, दोन वेगवेगळ्या प्रकारची सेल्स मॉडेल किफायतशीर ठरतील की नाही याचा विचार न करताच काही वेळा विलीनीकरण व संपादन पुढे रेटण्यात येते. यामुळे नवीन अडचणींना सामोरे जावे लागते. एएमडी कंपनीने ग्राफिक चीप बनविणारी एटीआय कंपनी ताब्यात घेतली. पण एटीआयचे रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर कसे उपयोगात आणायचे हेच न कळल्याने एएमडी तोटय़ाच्या गाळात रुतत गेली. बोस्टन सायंटिफिकने जेव्हा ‘गायडंट’ कंपनीला टेक ओव्हर केले तेव्हा दोन्ही कंपनींची मिळून तयार झालेली क्षमता, कमीत कमी उत्पादन खर्च व जास्तीत जास्त विक्रीसाठी कशी वापरावी याचे काही पूर्वनियोजन केले गेले नसल्याने बोस्टन सायंटिफिकसाठी हे विलिनीकरण आतबट्टय़ाचा व्यवहार ठरला. डेल कंपनीनेदेखील आपण बाजारात नव्याने उतरविलेली उत्पादने सदोष आहेत हे माहीत असूनदेखील त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे त्यांचे हे पाऊल कुऱ्हाडीवर जाऊन पाय ठेवण्यासारखे होते. सदोष उत्पादनांमुळे कंपनीला अनेक कायदेशीर अडचणींनादेखील सामोरे जावे लागले. खेकडय़ाला जसे माहीत नसते की कोणत्या क्षणाला तो कोळ्याच्या नजरेस पडू शकेल तसेच कंपनींचेदेखील असते. कंपनीच्या कारभारासाठी कधी विपरीत परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज व्यवस्थापनाला नसतो. खेकडा असो की कंपनी; दोघांनी वाटचाल करत असताना मधूनमधून धोक्याची चाहूल लागते का ते तपासले पाहिजे व त्यासाठी चालता चालता मध्येच थांबून मागोवा घेतला पाहिजे. पण असे न केल्याने जिवावर बेतू शकते. २००८ मध्ये विमान इंधनाच्या किमती १४० डॉलपर्यंत जातील या धोक्याची कल्पना न आल्याने अनेक विमान कंपन्या डबघाईला गेल्या किंवा मक्याच्या किमती वाढतील याची कल्पना न आल्याने पॅसिफिक एथेनॉल कंपनी तोटय़ात गेली. खरे तर कोणत्याही वस्तूंची किंमत एका रात्रीमध्ये अचानक वाढत नाही. किमती या रोज हळूहळू वाढत असतात, पण या चढत्या किमतीच्या ट्रेण्डकडे दुर्लक्ष केल्याने कंपनीवर अशी पाळी येते. वाळूवर खेकडय़ाने अवश्य चालावे पण धोक्याची चाहूल लागताच त्याने चटकन बिळात शिरावे. तसेच कंपनीनेदेखील वाढत्या महागाईची चाहूल लागताच त्वरेने कॉस्ट कटिंगच्या उपाययोजना आखाव्यात किंवा कंपनी विस्ताराच्या योजना बासनात गुंडाळून ठेवाव्यात. खेकडा, लाटा, नक्षी ही फक्त रूपके आहेत. त्यातून व्यवस्थापनाचे काय धडे आपण शिकायचे ते सर्वस्वी आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. प्रशांत दांडेकर - response.lokprabha@expressindia.com