गणपतीच्या दिवसातील एका शनिवारी न्यूजर्सीतील एखाद्या शाळेच्या प्रांगणात ढोल-ताशांचा आवाज यायला लागतो. त्या आवाजाच्या दिशेने तिथे जमलेले, भारतीय पोशाखातील मुले, मोठी माणसे सगळे जण धावू लागतात. नाचू लागतात. ढोलाच्या तालाची गती वाढते, ‘गणपती बाप्पा’ म्हणून कोणी तरी ओरडतो आणि ‘मोरया’चा प्रतिसाद आकाशात घुमतो. गणपतीच्या जल्लोषात १२०० ते १४०० मंडळी सहभागी होतात. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या नादघोषात वातावरण दुमदुमते. सर्वात पुढे ढोल-ताशा, त्यामागे टाळ मृदंग घेऊन नाचणारे सर्व वयाची मुले-माणसे, नंतर एका सुरेख पालखीत गणपतीची मूर्ती आणि त्यामागे चमकणाऱ्या जरदोसी साडय़ा, पैठण्या किंवा आधुनिक कपडय़ामध्ये नटलेल्या स्त्रिया, रंगीबेरंगी शेरवानी किंवा कुडत्यामधील पुरुष आणि कौतुकाने नऊवारीपासून सर्व भारतीय कपडय़ातील मुले-मुली अशी प्रेक्षणीय मिरवणूक शाळेच्या दरवाजातून आत प्रवेश करते. शाळेच्या मधल्या लांबलचक हॉलमध्ये एखाद्या स्थानिक कलावंताने मेहनतीने केलेली सुरेख कमान स्वागताला तयार असते. हॉलच्या दोन्ही बाजूला जत्रेसारखे लागलेले साडय़ांचे, कपडय़ांचे, हिऱ्याच्या दागिन्याचे व इतर दागिन्यांचे स्टॉल्स ओलांडत मिरवणूक गणपतीच्या ठरीव जागेवर येते. तिथला माहोल वेगळाच असतो. अनेक वर्षांपूर्वी दांडेकर यांनी स्वत: बनवलेले आकर्षक मखर, त्याभोवती दरवर्षी वेगळी अशी सुंदर सजावट, दोन्ही बाजूला भव्य पितळी समया, फुलांचा सुगंध त्यात गणपतीची शास्त्रोक्त पूजा सुरू होते. प्रसन्न मंगलमय वातावरण ..‘सासिन्नले प्रसन्नतेचे मळे’ या ज्ञानेश्वरांच्या ओवीचा साक्षात्कार होतो. टाळ-मृदंगाच्या गजरात दणकेदार आरती होते.
त्यानंतर जेवण! एवढय़ा हजाराच्यावर लोकांच्या जेवणासाठी चार स्टेशन्स मांडलेली असतात. अत्यंत शिस्तबद्धपणे रांगा पुढे सरकत असतात. नव्या कपडय़ांवरून प्लास्टिकचे एप्रन घालून स्वयंसेवक सुग्रास जेवण वाढण्याचे काम करीत असतात. गप्पागोष्टींना ऊत येतो.
पुढचा कार्यक्रम शाळेच्या नाटय़गृहात असतो. ‘मराठी विश्व’च्या कार्यकारिणीचा सूत्रबदल या दिवशी होतो. मंडळाची नवी कार्यकारिणी सूत्र हातात घेते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आजवर अनेक मान्यवर व्यक्तींनी उदा. अमेरिकेतील कौन्सुलेट जनरल वाकणकर, मुळे, इथल्या सिनेटर स्वाती दांडेकर, असेम्ब्लीमन उपेंद्र चिऊकुला आणि न्यूजर्सीचे गव्हर्नर क्रिस क्रिस्टी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या अनेक भारतीय मान्यवर व्यक्ती येऊन गेल्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर आरती होऊन सकाळसारखीच जोरदार विसर्जनाची मिरवणूक निघते.
अशा तऱ्हेने गणपती उत्सवाचे शुद्ध सात्त्विक रूप बघावयाचे असेल तर न्यू जर्सीला या. इथे स्पीकरच्या भिंती, वर्गणीची बळजबरी यातलं काही नाही. ढोल-ताशे आहेत आणि ‘शीला की जवानी’ आणि ‘चमेली’चा धांगडधिंगा नाही. गर्दी आहे, पण गोंधळ नाही. स्थलकालाप्रमाणे काही बदल झाले आहेत. एक म्हणजे हा कार्यक्रम शाळा मिळेल त्या विकेंडला करावा लागतो. दुसरं म्हणजे इथे पाण्यात गणपती विसर्जनाची परवानगी नसल्याने, सुपारीचे विसर्जन करून मूर्ती तशीच ठेवली जाते.
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेश उत्सव सुरू केला ते लोकसंघटनेचे काम आमच्या गणपतीने केले आहे. ‘मराठी विश्व’चा पहिला गणेशोत्सव ३७ वर्षांपूर्वी, १६ सप्टेंबर १९७८ ला न्यूयॉर्कच्या गीतामंदिरात झाला. तेव्हा फक्त मूठभर लोक होते. त्या दिवशी पूजा आणि भावगीत गायनाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी गणपतीच्या मूर्ती मिळत नसत. १९७९ मध्ये न्यूजर्सीच्या डॉ. रमेश घाणेकर यांच्या आई इथे राहायला आल्या. भारतात अनेक वर्षे त्या गणेशाची मूर्ती स्वत: घरीच करीत असत. घाणेकर आजींचे आगमन हे ‘मराठी विश्व’साठी एक वरदान ठरले. १९७९ मध्ये घाणेकरांच्या घरच्या, आजीने स्वत: हाताने केलेल्या मूर्तीच्या साक्षीने ‘मराठी विश्व’चा गणेशोत्सव एक दिवस त्यांच्याच घरी करायला सुरुवात केली. घाणेकरांकडे पहिल्या वर्षी ५९ लोक होते. दरवर्षी सहस्रवर्तने, आरती, जेवण व नंतर मुलांचे कार्यक्रम, नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असे स्वरूप असायचे. जशी न्यूजर्सीमध्ये भारतीयांची संख्या वाढत गेली आणि घाणेकरांच्या गणपतीची ख्याती पसरत गेली तशी संख्या वाढत गेली. त्या वेळी स्वयंपाकसुद्धा अनेक बायका एकत्र मिळून करीत. २००, ३००, ५००.. दरवर्षी आकडा वाढतच होता. तरीही ‘मराठी विश्व’च्या या पसाऱ्याला डॉ. रमेश व डॉ. गीता घाणेकर सांभाळून घेत होते. रस्त्यावर इतक्या कार्सच्या पार्किंगसाठी खास पोलीस परवानगी घेण्यापासून सगळी व्यवस्था बघत होते. १९९० मध्ये त्यांच्या घरी गणेशोत्सवाला ८०० लोक होते. हा अफाट पसारा लक्षात घेऊन शेवटी १९९१ मध्ये मंडळाने शाळेचा हॉल भाडय़ाने घेऊन तिथे गणपती मांडायचे ठरवले. कार्यक्रमासाठी शाळा ‘मिळवणे’ हा एक मोठा प्रश्न असतो. पण ‘मराठी विश्व’मध्ये काही वजनदार मंडळी आहेत, त्यांच्या आशीर्वादाने ‘मराठी विश्व’ला अजूनही शाळेचा हॉल मिळतो आहे. (डॉ. घाणेकरांचा गणेशोत्सवही अजून सर्वासाठी सुरू आहे. घाणेकर आजी गेल्यापासून डॉ. घाणेकर स्वत: मूर्ती तयार करतात. त्यांच्याकडे सहस्रवर्तने, आरती, कार्यक्रम इ. असतात. त्यामुळे आमच्या सारख्या जुन्या लोकांना दोन उत्सवांची पर्वणी असते. मागच्या वर्षीपासून एडिसन गावात, न्यूजर्सीतल्या व्यापाऱ्यांचा, भारतातून आणलेला, १४ फूट उंचीचा मोठ्ठा गणपती बसतो. तिथे गेलं की आपण भारतात नाही यावर विश्वास बसत नाही.)
‘मराठी विश्व’च्या गणेशोत्सवाला, हजाराच्यावर लोकांची व्यवस्था करायची म्हणजे दोन-तीन महिने तयारीत जातात. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी सात ते रात्री आठ ७०-८० स्वयंसेवक सतत राबत असतात. इथे सर्व कामे स्वत:लाच करावी लागतात. फक्त पूजेच्या दिवशीच नव्हे तर इतर तयारी करण्याच्या निमित्ताने, नाटकांच्या, कार्यक्रमाच्या तालमींच्या निमिताने आम्ही एकत्र येतो, तेव्हा आपल्या संस्कृतीचा वारसा आपण जपतो आहोत याची सुखद जाणीव होते. मुलांना नाटक, नाच किंवा इतर गोष्टी शिकवताना जनरेशन गॅप कुठे तरी मिटते- त्या वेळी आम्ही समेवर येतो. एका पिढीचं दुसऱ्या पिढीशी वेगळंच नातं निर्माण होतं. इतर वेळी मनात येणारी – आपली मुले आपल्यापासून दूर जाताहेत का, ही शंका मिटते आणि आपल्या कलेचा किंवा साधनेचा वारसा नव्या पिढीतील योग्य व्यक्तीच्या हाती देण्याचा वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. लोकमान्य टिळकांनी २६ सप्टेंबर १८९३ च्या ‘केसरी’च्या अंकात लिहिलं होते, ‘गणपती सर्व प्रकारचे हिंदू पूजतात. तेव्हा गणपती पोंहोचविण्याचा समारंभ झाल्यास त्यापासून लोकसमाजात एकदिलाने कामे करण्याची जी प्रवृत्ती आहे तीसही थोडीबहुत मदत होईल.’ आज शंभर वर्षांनी त्याची फळे पाहताना, टिळकांच्या दूरदृष्टीबद्दल अपार आदर वाटतो. जगात मराठी माणूस कुठेही गेला तरी हे लोकदैवत सतत लोकांना आकर्षित करीत आहे.
असा हा गणेशोत्सव – गेली ३७ वर्षे आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. गणपतीच्या दिवशी जेवणानंतर खेळायला बाहेर पडलेली लहान मुले ‘प्रथम नमन करितो वंदना’ गुणगुणत असतात किंवा ‘गणपती बाप्पा मोरया’ असे आपल्याच तालात म्हणत जाताना दिसतात तेव्हा हा सांस्कृतिक वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याची सुखद जाणीव होते. नंतर मधूनच कधी तरी ‘माम, व्हेन इज गणपती’ असे विचारतात तेव्हा सांस्कृतिक प्रवाह पुढे चालू राहील अशी आशा वाटते आणि या आनंदासाठी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असं त्या गणेशाला आळवावसे वाटते.
नीलिमा कुलकर्णी