आयुष्याच्या उत्तरार्धात, उतरणीवर भूतकाळातल्या अनेक आठवणी हरळीसारख्या उगवायला लागतात. मनाला डोलायला लावतात. कुणीसं म्हटलंय, गतकाळातली भुतं भूतकाळातच राहू द्यावी. वर्तमानात आणली आणि पेटला एखाद वेळी त्याचा वणवा तर उतरणीची ती हरळी जाईल करपून त्या आगीत. म्हणोत बापडे! पण सगळय़ाच आठवणी काही काटेरी, बोचणाऱ्या, भाजणाऱ्या नसतात. काही जुन्या आठवणी कोवळय़ा, रसरशीत दुर्वाप्रमाणे असतात. मनाला थंडावा देतात. त्यात मग रममाण होणं, हरवून जाणं हे खचितच सुखावह असतं. राहिलेला पुढचा प्रवास सुकर होतो मग! त्यातून या सयी जर आपल्या बालपणीच्या सवंगडय़ांसोबत घालविलेल्या काळाच्या असतील तर खरोखरीच त्या आनंदाच्या लहरी घेऊनच येतात. तरंगायला लागतं मन आपलं. तर मंडळी, हे हितगुज आहे ते अशाच गमतीदार आठवणींचं. आमच्या शाळेतल्या एका बालमित्राबद्दल! खरं तर वल्लीच म्हणायला हवं त्याला.
सांगायचा मुद्दा म्हणजे साधारणपणे ५०-५५ वर्षांपूर्वीचा काळ. एका तालुक्यावजा लहान गावातली आमची प्राथमिक मराठी शाळा! त्या शाळेत आमचा एक दोस्त होता. हनुमंत नावाचा. सगळे मात्र त्याला हणम्या म्हणायचे. होताच तो तसा अंगानं आडवा, आडदांड गडी. पण बुद्धी मात्र अशी तल्लख म्हणता, एखादा शब्ददेखील खाली पडू देत नसे. वागता बोलताना त्याची ती गावाकडची खास ढब, जरा रेकून, हेल काढूनच बोलायचा. गावात बहुदा सगळेच तसे, खास स्टाईलवाले. तर असेच काही धम्माल, गमतीदार किस्से ऐकाल तर बहार येईल बघा. ऐकाच तर खास गावाकडच्या स्टाईलमध्ये!
lp55तर ह्ये हणम्या न मी पयल्यापासून घट मैतर. इतके घट का तो अन मी, दोघंबी चौथीला येकाच वर्गात, येकाच बाकडय़ावर. शेजारी-शेजारी चार र्वस काढली. एकदा आपलं दसरा-दिवाळीचे दिवस व्हते. साळेचं गुर्जी (गावात ‘गुरूजी’चा झालेला हा अपभ्रंश) म्हनाले, ‘‘पोरांनो, उद्याचाला काय हाय माहितेय का? उद्या हाय ‘इजयादशमी’ म्हंजी आपला दसरा. तवा उद्या सक्काळच्याला आंघोळी पांगुळी करून, नवीन कापडं घालून साळंला यायचं. नवीन पाटी अन पेनशिल आणायची बरुबर. अन नवीन पाटीवर चांगलं मस्त असं सरसवतीचं चित्र काढून आणा. समदे मिळून तिची पूजा करायची मंग. तेला म्हनतात पाटीपूजन! ध्यानात ठेवा.’’ दुसऱ्या दिवशी झ्याकपाक होऊन, सरस्वती काढलेली पाटी घेऊन आमी समदे साळेत हजर झालो. हणम्या बी संगतीला व्हताच. गुर्जीनी इचारलं, ‘‘हणम्या, दाव बरं तुझी पाटी, बघू जमलीया का सरसवती?’’ पहातो तं काय, हणम्यानं पाटीवर एक भली थोरली समई काढलेले अन त्यात अशा जाड, फरारा पेटलेल्या वाती काडलेल्या! गुर्जी म्हने, ‘‘लेका खुळ्या, अरं काल काय सांगितलं काडायला पाटीवर आँऽ, सरसवती कुटे हाय पाटीवर? ह्ये समईचा दिवा कश्यापाई काडला? आधीच येवडा प्रकाश पाडतुया तू, हा दिवा कश्यापायी?’’- हणम्या म्हने, ‘‘अवो गुर्जी, तुमी सांगितल्या परमानंच तर पाटीवर चितर काडलय. बघ ना, कश्या मस्त, फराफरा वाती पेटल्यात. एकदम सरस काडल्या का नाय वाती. सरस वाती काडायला सांगितलं तुम्ही, मंग मीच खुळा का?’’ गुर्जीनी आपल्या कपाळावर हात मारला. काय बोलनार?
आमचं गणिताचं दामले मास्तर! लई कडक बोलणं तेंचं अन् तसंच एकदम सुद्द बोलणं. कधीबी बघा, येका हातात गणिताचं पुस्तक अन् दुसऱ्या हातात हिरवागार चिंचेचा फोक. जरा आमचं थोडं हिकडचं तिकडं झालं का फटय़ाऽक, वाजलाच फोक आमच्या चड्डीवर. तर एकदा ते वर्गात म्हणाले, ‘‘मुलांनो, एक गणित घालतो, ते येथेच आता सोडवायचे आणि उत्तर काढले की आपापल्या पाटय़ा उपडय़ा करून खाली टाका. समजले? तर घ्या टिपून गणित पाटीवर- एका हौदाला तीन तोटय़ा आहेत. त्यातली एक गळकी असून दुसरी फुटकी आहे. तीनही तोटय़ा एकदम उघडल्यास तो हौद दोन तासात भरतो. त्यातली एक तोटी बंद केल्यास तो हौद भरावयास तीन तास लागतात. तर दोन तोटय़ा बंद केल्यास तो हौद किती तासात भरेल?’’ मास्तरचं गनित संपतंय न् संपतंय तोच हणम्यानं आपली पाटी फटकन उपडी पाडली. दामलेगुर्जी म्हने, ‘‘अरे हणमंता, काय सांगितले मी? आधी गणित वाच, नीट सोडीव, तपासून पहा आणि उत्तर आले की मग पाटी उपडी पाड हो.’’ हणम्या म्हने, ‘‘गुर्जी, अवो काढलंना उत्तर, तयार हाय माझं, सांगू का?’’ – ‘‘सांगा, सांगा अहो पवनसुता, काय काढले उत्तर?’’- ‘‘गुर्जी एकदम सोप्पं हाय. उद्या साळला येताना संगतीला माझ्या बापाला घेऊन येतो. तो हाय आपल्या गावातला एक नंबरचा प्लंबर. तो करल ना समद्या फुटक्या न् तुटक्या तोटय़ा दुरुस्त एका झटक्यात! मंग कश्यापाई पानी त्यातनं गळंल? त्यो हौदबी भरेल टकोटाक!’’ दामले मास्तर नुस्तं लाल-हिरवं झालेलं, करावं काय, तेनी हणम्याचा कान अन् हात दोनीबी असं पिरगाळलाय म्हंता- ‘‘माझी चेष्टा करतोस आँऽ माझी चेष्टा?’’ फटय़ाऽक् . ‘‘शिंच्या, तुझ्या एवढा आहे कां रे मी?’’ पुन्हा फटय़ाऽक् .
बनकर गुर्जी, आमचं चितरकलेचं, म्हंजी ड्राईंग मास्तर. लई मऊ स्वभावाचं. एकदा आमाला म्हने, ‘‘पोर हो, एक चांगलं निसर्गचित्र काढता का? म्हंजे सीन. काय काय काडाल त्या सीनमधी? काडा, असे हिरवे डोंगर, बाजूला झाडं, कश्याची दावाल झाडं? आपला आंबा, पिंपळ का नारळाची दावता? काडा कंची बी. नाय तर समदीच काडा, त्यातून वहानारी नदी, नदीवर पूल, पुलावरून मानसं जा-ये करत्यात. समदं काडा.’’ झालं, आमी समदे लागलो कामाला. मदीच हणम्या त्याचा चितराचा कागद घेऊन गेला गुर्जीकडं अन् त्यांना दावत म्हंतो, ‘‘गुर्जी, बगा जमलाय का शीन?’’ गुर्जी ते पाहून म्हणे, ‘‘काय काडलं रं हणम्या हे? आँ, नदीवर पूल काय असा उबा ऱ्हातो काय? ह्य़ो तर उबा उंच टावर काडला तू गडय़ा. आता या उभ्या टावरवर मानसं ऱ्हातील का चढवितो माकडास्नी?’’ हणम्या म्हंतो कसा, ‘‘अवो गुर्जी तो उभा टावर पाडा ना आडवा नदीवर, झाला का नाय मंग पूल त्याचा! आता त्यावरून माकडंच काय पन मानसंबी जातील हाय काय न् नाय काय!!’’ असलं इब्लीस कार्ट ह्ये हाणम्या!
याच बिचाऱ्या मास्तरला हणम्यानं आणखी एक टोपी लावली बघा कशी. तेनी आमा पोरांना गवत खानारी गाय काडायला सांगितली. हणम्याचा कागूद कोरा त् कोराच. मास्तर म्हणे, ‘‘ना हितं गाय, ना गवत काडलं, तसाच कोरा कागद कश्यापाई मला दाखवितो?’’ त्यावर याचं बोलणं उरफाटंच. ‘‘त्याचं काय झालं गुर्जी, गायीनं गवत खाऊन संपवलं समदं, मग ती कश्याला रहातीया इथं, गेली निघून रानात चरायला.’’
तुमाला वाटत असल ह्ये आमचा हणम्या असतोय कुटं? काय करतुया काय हल्ली? काइ इचारू नका, ग्रामपंचायत म्हणू नका, जिल्हा परिषद म्हणू नका, हे पार करून इधानसभाबी गाजवीली पठ्ठय़ानं! नुस्त्या टोप्या फिरविल्या, याची त्याला, त्याची याला. आता तर लई मोठा ‘साकरसम्राट’ झालाय. डोइवर पांढरीफेक टोपी कडक कांजीची अन् जिभीवर साकर पेरूनच फिरतुया सफेद, आलीशान ‘आडी’मधून.

– संजय साताळकर