मेष कामाचे नियोजन करून घर आणि नोकरी-धंद्यातील आघाडय़ा सांभाळाव्या लागतील. व्यापार-उद्योगातील पैशाच्या कामांना प्राधान्य द्याल. कामाचे प्रमाण वाढवण्यासाठी सुधारणा कराव्या लागतील. व्यावसायिक जागेचे स्थलांतर किंवा नव्या सुविधा करू शकाल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ सवलती देताना त्यांच्या अटी मान्य कराव्या लागतील. मंगलकार्य आणि पाहुण्यांची खातीरदारी करण्यासाठी वेळ आणि पैसे राखून ठेवावेत. मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करावी लागेल.

वृषभ स्वत: जीवनाचा आस्वाद घ्याल आणि त्यात प्रिय व्यक्तींनाही सामील करून घ्याल. कुटुंबातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. उद्योगधंद्यातील कामाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे फायद्याचे प्रमाण वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी नजरेस पडेल. घरातील दीर्घकाळ लांबलेला मेळावा पार पडेल. त्यानिमित्ताने लांबच्या मित्र आणि आप्तेष्टांचा सहवास घडेल. कलाकार आणि खेळाडू चमकतील.

मिथुन एखाद्या गोष्टीचा लगेचच फायदा मिळणार नसला तरी भविष्याचा विचार करून असे काम करायला तयार व्हाल. व्यवसायामध्ये तुमच्या प्रयत्नात सातत्यता ठेवणे गरजेचे आहे. जी देणी द्यायचे लांबवले होते त्यासाठी तयारी करावी लागेल. त्यासाठी जादा काम करायची तयारी असेल. नोकरीच्या ठिकाणी वेळेवर सुविधा न मिळाल्याने त्रास सहन करावा लागेल. मन:शांतीसाठी विशेष उपाय योजाल.

कर्क ग्रहमान सुधारल्याने तुमच्या आकांक्षा वाढतील. विरोधक आता मित्रत्वाची भाषा करू लागतील. व्यापार-धंद्यातील आर्थिक स्थिती सुधारल्याने हायसे वाटेल. आवश्यक असलेल्या पैशाची गरज कर्जरूपाने किंवा इतर मार्गाने भागू शकेल. योग्य वेळी योग्य व्यक्तींशी गाठभेट होऊन कामात गती येईल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे महत्त्व वाटल्याने वरिष्ठ तुमच्या सुविधा आणि भत्ते वाढवतील. घरात मुलांच्या प्रगतीविषयी चांगली घटना घडेल.

सिंह एखाद्या कामातील यशाचे स्वरूप लक्षात येईल. व्यापार उद्योगात केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. एखादी धाडसी कल्पना साकार करावीशी वाटेल. त्यासाठी लागणारी हितचिंतकांची मदत आणि प्रतिष्ठित व्यक्तीची साथ मिळेल. पण कोणाचीही मदत घेण्यापूर्वी त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. नोकरीत कितीही काम केले तरी वरिष्ठांना ते अपुरेच वाटेल. विरंगुळ्याकरता वेगळ्या वातावरणात रमाल.

कन्या तुमचे इरादे बुलंद असतील. मोठय़ा व्यक्तींच्या सक्रिय सहकार्यामुळे कामांना गती देऊ शकाल. व्यापारी वर्गाला देशात किंवा परदेशात शाखा उघडावीशी वाटेल. नोकरीमध्ये आवडीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. सांसारिक जीवनात शांतता आणि सहजीवनाचा आनंद घ्याल. मुलांच्या प्रगतीचे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांना परदेशी जाता येईल.

तूळ तुम्ही जे प्रयत्न करीत आहात त्यातून लगेचच फायदा मिळणार नाही. ही भविष्याची बेगमी आहे हे ध्यानात ठेवा. तेव्हा कामात सातत्यता असू दे. व्यवसायात जे आहे त्यातून जास्तीतजास्त काय चांगले करता येईल याचा आढावा घ्या. उधारीपेक्षा रोखीवर भर द्या. हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण करा. नोकरीच्या ठिकाणी केलेले काम नीट पडताळून पाहा. घरातील व्यक्तींच्या गरजा वाढतील. शक्यतो गरजेच्या गोष्टींनाच प्राधान्य द्या.

वृश्चिक तुमच्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा योग्य वापर करून प्रगती साधा. उद्योग-धंद्यात मध्यस्थांचा उपयोग होईल. सरकारी कामे गती घेतील. पैशाची तात्पुरती सोय होऊ शकेल. त्यामुळे देणी देऊनही नवीन उपक्रम सुरू कराल. नोकरीत सहकार्याने काम करून वरिष्ठांना खूश कराल. तुमच्यातील नेतृत्वगुणांना वाव देणारी संधी मिळेल. विवाहोत्सुक तरुणांना सुयोग्य कालावधी. कलाकार खेळाडूंना प्रावीण्य दाखवता येईल.

धनू परिस्थितीकडे नेहमी सकारात्मक नजरेने तुम्ही पाहता याचा भरपूर उपयोग होईल. अडचणींवर मात करून प्रगतीचा मार्ग मोकळा करीत जाल. व्यापारात पैशाची तरतूद करण्यासाठी वेळ आणि शक्ती खर्ची पडेल. नोकरीमध्ये नावडते काम वरिष्ठ किंवा सहकारी तुमच्यावर सोपवतील. घरातील प्रत्येक जण त्यांच्या गरजेपुरते तुमच्याकडे विश्वासाने आणि आशेने पाहातील. प्रकृती सांभाळा.

मकर बऱ्याच दिवसांनंतर ग्रहांची तुम्हाला साथ मिळणार आहे. वाळवंटात हिरवळ दिसावी तसे तुमचे होईल. ज्या कामात दिरंगाई झाली होती अशा कामात झपाटय़ाने प्रगती कराल. व्यक्तिगत जीवनात अनपेक्षितरीत्या एखाद्या चांगल्या घटनेमुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. व्यापारातील घडामोडी तुमच्या दृष्टीने अनुकूल ठरतील. पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. नोकरीत जादा भत्ते मिळतील. घरातील व्यक्तीकडून शुभसमाचार कळेल.

कुंभ स्वत:च्या तंत्राने वागण्याचे स्वातंत्र्य घ्याल. पण तुमच्या फायद्याच्या कामात मात्र मेहनत घ्याल. व्यवसायात हाताखालच्या व्यक्तींना कामाला लावाल. त्यांच्यावर देखरेख करणे भूषण समजाल. नोकरीमध्ये आपले असे खास गुण एखाद्या कामातून इतरांच्या नजरेस आणाल. वरिष्ठांनी सोपवलेल्या कामात युक्तीचा वापर करून काम पूर्ण कराल. त्यातून एखादी सवलत मिळवाल. घरामध्ये महत्त्वाची खबरबात कळेल. प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी कराल.

मीन तुमच्या आनंदी आणि हौशी स्वभावाला उधाण आणणारे ग्रहमान लाभत आहे. चांगल्या दर्जाचे काम करून स्वत:मधील वैशिष्टय़ इतरांसमोर आणाल. व्यापार उद्योगातील साशंकता दूर झाल्याने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन करार किंवा नवीन ऑर्डर मिळण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीमधील कामानिमित्ताने देशात किंवा परदेशात फेरफटका करू शकाल. व्यक्तिगत जीवन फुलून उठेल.