lp13एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला अस्पर्शित नितांत रमणीय सागरकिनारे यांच्या बेचक्यात वसलेला भू-प्रदेश, अशी कोकणची पूर्वापार ओळख आहे. सुमारे २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत कोकणचं हे चित्र होतं, पण १९९० च्या सुमारास या प्रदेशात रेल्वे गाडीचा पायरव जाणवू लागला आणि त्यानंतर हळूहळू शहरीकरणाचे वारे वाहू लागले. १९९६-९७ पासून कोकणात रेल्वे धावू लागली. त्याचबरोबर काही उद्योगही सुरू झाले. त्यातून कोकणबाहेरच्या प्रदेशातील लोकांची वर्दळ वाढू लागली आणि तेव्हापासून कोकणात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार व घरबांधणी व्यवसायाला तेजी आली. साधारणत: इ.स. २००० ते २०१२-१३ पर्यंत ही तेजी कायम राहिली. दापोली-गुहागर-गणपतीपुळेसारखी पर्यटनासाठी आकर्षण स्थळं असोत किंवा चिपळूण-रत्नागिरीसारखी उद्योग-व्यवसायाच्या वाढीला अनुकूल शहरं, सर्वत्र या तेजीचा प्रभाव जाणवत राहिला. नाशिक, पुणे-मुंबईसारख्या महागडय़ा शहरांपेक्षा कोकणातल्या या शहरांकडे जमीन-घरांसाठी ग्राहकांचा ओढा वाढू लागला. मूळचे कोकणातले पण कामधंद्यानिमित्त अन्यत्र जाऊन राहिलेल्या लोकांचा त्यामध्ये विशेष भरणा होता. त्याचबरोबर नोकरी-व्यवसायानिमित्त आलेले लोक आणि या निसर्गरम्य प्रदेशात अधूनमधून वास्तव्य करण्याच्या हेतूने घर खरेदी करणारे लोकही त्यामध्ये दिसू लागले. स्वाभाविकपणे जमीन आणि पर्यायाने घरांच्याही किमती फुगत गेल्या. कोकणात घर घेण्याची जणू लाटच या काळात सर्वत्र जाणवत राहिली. बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने सुगीचा हा काळ गेल्या दोन वर्षांपासून मात्र झपाटय़ाने ओसरू लागल्याचं चित्र आहे. 

जमिनीच्या अवास्तव प्रमाणात वाढलेल्या किमतींमुळे घराच्या किमतीही वाढल्या. रत्नागिरी शहरात मोक्याच्या ठिकाणी फ्लॅटची किंमत साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिचौरस फुटावर गेली. त्यामुळे घराच्या एकूण किमतीने सुमारे २० लाखांचा टप्पा गाठला. प्रदेश आणि सोयी-सुविधांच्या तुलनेत किमतीचा हा फुगवटा हे या व्यवसायाला ओहोटी लागण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर रेल्वे आली तरी त्या प्रमाणात उद्योग-व्यवसायामध्ये वाढ न झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात नवीन ग्राहक फारसा निर्माण झालेला नाही. रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि केड्राई संघटनेच्या राज्य शाखेचे सहसचिव महेंद्र जैन या संदर्भात बोलताना म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सर्वत्रच मंदीचं वातावरण असल्यामुळे पुण्या-मुंबईसारख्या शहरातील मोठे बांधकाम व्यावसायिक कोकणाकडे वळले. या व्यवसायात भरपूर नफा असतो, अशा गैरसमजापोटी अनेक हौशे-गवशांचीही त्यात भर पडली. त्यामुळे जमिनींचे दर अवाजवी प्रमाणात वाढले. बाजारातील एकूण परिस्थिती पाहून वित्तसंस्थांनी हात आखडता घेतला. त्याचा फटका या व्यवसायाला बसला आहे. रत्नागिरी शहरात सध्या वर्षांला सुमारे दीड-दोन हजार घरं तयार होतात. पण त्या प्रमाणात मागणी नाही. मात्र हे चित्र बदलू शकतं. विशेषत: रत्नागिरी शहराच्या सीमावर्ती भागातील नाचणे, कुवारबाव, मिरजोळे, खेडशी, हातखंबा या संपूर्ण टापूचं उत्तमप्रकारे नियोजन करून विकासाचा आराखडा तयार केला तर चंदिगडसारखं नियोजनबद्ध शहर वसवता येऊ शकतं. कोकणात पाण्याची कमतरता नाही. पण ते अडवून वितरणाची योग्य व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, पर्यटनाला चालना इत्यादी माध्यमातून इथे उद्योग-व्यवसाय मोठय़ा प्रमाणात निर्माण होण्याची गरज आहे. तसं झालं तर स्वाभाविकपणे रोजगारनिर्मिती होईल आणि त्या निमित्ताने इथे येणाऱ्या लोकांकडून घरांसाठी मागणी वाढेल.
रत्नागिरी हे जिल्ह्यचं ठिकाण असलं तरी मुंबई-पुण्यापासून कमी अंतर आणि निसर्गरम्य परिसरामुळे बाहेरगावच्या जमीन किंवा घर खरेदीदारांकडून दापोली-गुहागरला जास्त पसंती असते. लोटे-चिपळूण परिसरात औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहती व अन्य काही औद्योगिक प्रकल्पांमुळे घरांसाठी ग्राहकांचं प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत रत्नागिरी शहरात बाहेरगावचा ग्राहक कमी झाला आहे. स्थानिक ग्राहक अतिशय कमी आहे. अशा परिस्थितीत शहराच्या मध्यवर्ती भागात होणाऱ्या घरबांधणी प्रकल्पांना मागणी कायम आहे. पण सीमावर्ती भागातील प्रकल्पांची घरं ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्सचे दीपक साळवी या संदर्भात बोलताना म्हणाले की, कोकणात एखादं घर (सेकंड होम) असावं, या भावनेतून घर खरेदी करणारा ग्राहक गेल्या दोन-तीन वर्षांत अतिशय मर्यादित झाला आहे. शिवाय असा ग्राहक रत्नागिरीपेक्षा जिल्ह्याच्या अन्य ठिकाणांना जास्त प्राधान्य देतो. जमिनींच्या किमती वाढल्यामुळे घरांच्या किमती वाढल्या, हे खरं आहे. त्याचबरोबर वाळू उपशावरील बंदीमुळे वाळूच्या दरात झालेली अवाजवी वाढ, सिमेंटच्या किमतीमध्ये सतत होणारी वाढ यामुळेही येथील घरं महाग झाली आहेत. व्यवसायातील मंदीमुळे गुंतवणूकदार कमी झाले आहेत. रत्नागिरी शहराची नवीन घरांची गरज खूपच कमी आहे. त्यामुळे बाहेरगावाहून नवीन ग्राहक इथे आल्याशिवाय या व्यवसायाला अपेक्षित तेजी येणार नाही.
देशातील मंदीचं सावट हळूहळू दूर होत आहे. आर्थिक विकासाचा दर धीम्या गतीने का होईना, वाढत आहे. त्यातून उद्योग-व्यवसायाला चालना मिळण्याची आशा कोकणातील बांधकाम व्यावसायिक बाळगून आहेत. कारण जमीन खरेदी किंवा घरबांधणीच्या क्षेत्रात स्थानिक खरेदीदाराचं प्रमाण इथे अतिशय कमी आहे. स्वाभाविकपणे या विकासाच्या गतीवरच कोकणातील बांधकाम व्यवसाय अवलंबून आहे.
सतीश कामत