संरक्षण
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com / @vinayakparab

अनेकांना असे वाटते आहे की, जोरदार बहुमताने पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपा सरकारचा हा परिणाम असावा. मात्र प्रसारण मुत्सद्देगिरीचा पहिला यशस्वी प्रयोग काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराच्या नावावर आहे.

सुमारे १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरमध्ये कुणाला तरी प्रसारण मुत्सद्देगिरीची आठवण झाल्याचे चित्र दिसते आहे. अनेकांना असे वाटले की, भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आल्याचा हा परिणाम आहे. मात्र अशाच प्रकारचा यशस्वी प्रयोग काश्मीर खोऱ्यामध्ये २००४च्या सुमारास झाला होता. सध्या चर्चा आहे ती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काश्मीर खोऱ्यामध्ये हाती घेतलेल्या मोहिमेची. जम्मू आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेनजिक असलेल्या गावांमध्ये पाकिस्तानमधून प्रक्षेपित होणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रसारण व्यवस्थित पाहता येते. काश्मीर जनतेने पाकिस्तानी वाहिन्या नव्हे तर भारतीय वाहिन्या पाहाव्यात यासाठी प्रसारण मंत्रालयाने ही मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत काश्मीरच्या २२ जिल्ह्य़ांपैकी सीमावर्ती असलेल्या गावांमध्ये सुमारे ३० हजार डीडी (दूरदर्शन) डिश सेटटॉप बॉक्सेसचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये त्यांना १०० स्थानिक तसेच इतरही निशुल्क वाहिन्या पाहता येणार आहेत. त्यासाठी काश्मिरींना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. दहशतवादाचा प्रभाव असलेल्या पीर पंजाल खोऱ्यातील राजौरी आणि पुंछ या परिसरात खूप मोठय़ा प्रमाणावर पाकिस्तान टीव्ही अर्थात पीटीव्ही पाहिला जातो. अनेक पाकिस्तानी मालिका या परिसरात लोकप्रिय आहेत. पाकिस्तान आणि तेथील संस्कृतीपासून दूर नेऊन या स्थानिकांना भारताशी जोडण्याचा एक प्रयत्न म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. यापूर्वीचा २००४ चा अनुभव जमेस धरता याचा चांगला फायदा भारताला होऊ शकतो. मात्र काहींनी हा भाजपा सरकारचा अनोखा प्रयत्न असे म्हणून या मोहिमेला वळण देण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस हे लक्षात घ्यायला हवे की, असा पहिला प्रयोग २००३-०४ मध्ये लष्कराने  यशस्वीरीत्या राबविला होता. त्याचे श्रेय लष्कराकडेच जायला हवे.

२००३-०४ साली काश्मीरमध्ये नियुक्त असलेल्या ब्रिगेडिअर हसन यांना सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात आली की, त्यावेळेस काश्मीरमध्ये अनेक खेडय़ांमध्ये मायक्रो मिनी हायड्रल प्रोजेक्टच्या माध्यमातून वीज उपलब्ध झाली होती. आणि काश्मीरच्या काही खेडय़ांमध्ये टीव्हीही उपलब्ध होता. मात्र या टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांमध्ये पाकिस्तानी मालिकाच दिसत होत्या. ब्रिगेडिअर हसन यांना प्रश्न पडला की, काश्मिरींनी पाकिस्तानी वाहिन्या का पाहायच्या भारतीय का नाही? त्या वेळेस भारतामध्ये डिश टीव्ही फारसा लोकप्रिय नव्हता. काश्मीरचा भूगोल तेथील अनेक समस्यांच्या मुळाशी आहे. काश्मीरच्या बव्हंशी भूप्रदेशाची निर्मितीच तेथीस नावाचा महासागर गिळंकृत होऊन झालेली आहे. त्यामुळे तेथील पर्वत उंचीने मोठे दिसले (हिमालयदेखील याला अपवाद नाही) तरी ते आतून वाळूचे असल्याने ठिसूळ आहेत. ते सह्य़ाद्रीसारखे कणखर नाहीत. शिवाय काश्मीरमधील अनेक गावे दुर्गम ठिकाणी वसलेली आहेत. तिथे वाहिन्यांसाठी केबल टाकणे अशक्य आहे. अशा ठिकाणी डिश टीव्ही काम करू शकतो कारण ती यंत्रणा उपग्रहामार्फत चालते, हे लक्षात घेऊन भारतात डिश टीव्ही लोकप्रिय होण्याआधी ब्रिगेडिअर हसन यांनी तो काश्मीरच्या खोऱ्यात नेला. त्याचा अतिशय चांगला परिणाम झाला. काश्मिरी जनता एका वेगळ्या पद्धतीने भारताशी जोडली गेली.

काश्मिरींमध्ये तुटलेपणाची भावना आहे. उर्वरीत भारतानेही फारसा कधी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे त्यांना पाकिस्तान व इस्लाम जवळचा वाटायचा. डिश टीव्हीमार्फत दिसू लागलेल्या वाहिन्यांनी समृद्ध भारताचे चित्र काश्मिरींसमोर उभे केले. त्यांना असे लक्षात आले की, पीटीव्हीवर सतत काश्मीर, हिंदूुस्तान- पाकिस्तान अशी चर्चा असायची. हाच जगातील सर्वात मोठा प्रश्न आहे. पण भारताच्या बाबतीत असे नाही. हा वैविध्यपूर्ण समृद्ध देश आहे. काश्मीर हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या देशात या वादाच्या पलीकडे अनंत गोष्टी आहेत. हे समृद्ध भारताचे चित्र काश्मिरी जनतेसमोर गेले आणि त्याचे दोन महत्त्वाचे परिणाम झाले. काश्मीर भारताशी जोडले गेले आणि समृद्ध भारताच्या चित्राने काश्मिरी माणसाची मानसिकता बदलण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम नंतर ‘ऑपरेशन सद्भावना’ला मिळालेल्या यशाच्या रूपाने पाहायला मिळाला. कारण तो समृद्ध भारत आपल्या मुलाला पाहायला मिळेल म्हणून काश्मिरी जनता आपल्या मुलाला शाळेत पाठवू लागली (दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेल्या शाळा सुरू करताना हे महत्त्वाचे ठरले) आणि नंतर पालकांनाही प्रोत्साहित करण्यासाठीच्या योजनांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. ब्रिगेडिअर हसन यांनी सुरू केलेली प्रसारण मुत्सद्देगिरी अशी यशस्वी ठरली.. त्याचा दुसरा टप्पा आता नव्याने सुरू झाला आहे, इतकेच!