‘लोकप्रभा’ २ सप्टेंबर २०१६ च्या अंकात, चर्चा या सदरात प्रसिद्ध झालेल्या ‘राजभवनातल्या बंकरमागची शक्यता’ या गणेश साळुंखे यांच्या लेखासंदर्भातील प्रतिक्रिया व मलबार हिल राजभवनाची अधिक माहिती.

इंग्रजांच्या कारकीर्दीत सुरुवातीच्या काळात मलबार हिलच्या डोंगरावर दाट जंगल होते. या जंगलात कोल्हे, ससे, वानरे इत्यादी प्राण्यांचा संचार असे. इंग्रज हा डोंगर भाडेपट्टय़ाने देत असत. तसेच येथील गवताची विक्रीही करण्यात येई. या डोंगराच्या काही भागांतील गवत सरकारी अधिकाऱ्यांच्या व शहरातील श्रीमंत व्यापाऱ्यांच्या घोडय़ांसाठी राखून ठेवण्यात आले होते. १७३० साली हा डोंगर, सालीना १३० रुपयाने भाडय़ाने देण्यात आल्याचा उल्लेख इंग्रजी साधनांमध्ये आहे. या डोंगरावर लोक भाजीपाला पिकवीत.

kolhapur lok sabha marathi news
कोल्हापूर गादीच्या वारश्यावरून छत्रपती घराण्यातच वादाच्या तलवारी भिडल्या
The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

या डोंगरावरील थंड व आल्हाददायक हवेमुळे मुंबईचे गव्हर्नर विल्यम मेडोज (१७८८ ते १७९०) यांनी प्रथम येथे झोपडीवजा घर बांधले. उन्हाळ्यात त्यांचे वास्तव्य या घरात असे. या घराला ‘मरिन व्हिला’ म्हणत. मेडोज यांच्यानंतर गव्हर्नर सर इव्हॉन नेपियन (१८९२ ते १८१९) यांचंही वास्तव्य या ‘मरिन व्हिला’मध्ये अधूनमधून होत असे. नंतर गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन (१८१९ ते १८२७) यांनी येथे एक लहानशी बंगली बांधली. या बंगलीचा ‘सुंदर निवासस्थान’ म्हणून उल्लेख बिशप हेबर यांनी आपल्या प्रवासवर्णनात केलेला आहे. गव्हर्नर व्हिसकाऊंट फॉकलंड (१८४८-१८५३) यांच्या पत्नी लेडी फॉकलंड यांना मलबार हिलवरील या बंगलीत राहायला आवडत असे. त्या काळात परळ येथे गव्हर्नमेंट हाऊस होतं त्याला ‘परळ हाऊस’ म्हणत. उन्हाळ्यात किंवा इतर वेळी मुंबईचे गव्हर्नर मलबार हिलवर वास्तव्यास येत असत. त्यामुळे एल्फिन्स्टनने बांधलेल्या बंगल्याचे विस्तारीकरण करण्यात आले. १८६८ साली भोजन कक्ष, बिलियर्ड रुम, पोर्च व सभोवतालच्या व्हरांडय़ाचे बांधकाम करण्यात आले. १८७७ मध्ये येथे अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. गव्हर्नर सर जेम्स फर्गसन (१८८० ते १८८५) यांच्या पत्नी लेडी फर्गसन यांचं ‘परळ हाऊस’मध्ये १८८३ मध्ये कॉलऱ्याने निधन झाले. फर्गसन यांच्यानंतर ‘परळ हाऊस’ येथील ‘गव्हर्नमेंट हाऊस’ मलबार हिलवर कायमचे स्थलांतरित करण्यात आले. १८८५ मध्ये या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये गव्हर्नर लॉर्ड रे यांचं वास्तव्य होते. नंतरच्या काळात या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये गरजेनुसार अनेक बदल करण्यात आले. १९०५ मध्ये ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांचा मुक्काम या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये होता. गव्हर्नरांचे अधिकारी, कर्मचारी, मुलकी व लष्करी सचिव यांच्याकरिता गव्हर्नमेंट हाऊसच्या परिसरात निवासस्थाने बांधण्यात आली. येथील प्रवेशद्वाराजवळील इमारतीचं बांधकाम गव्हर्नर सेमूर फिटझगेरॉल यांच्या काळात करण्यात आले. गव्हर्नमेंट हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याचं विस्तारीकरण १८६९ मध्ये करण्यात आले. याच वेळी रस्त्याजवळच्या प्रवेशद्वाराजवळ काही खोल्या बांधण्यात आल्या. गव्हर्नमेंट हाऊसच्या पूर्वेकडे बॅण्ड स्टॅण्ड होता. येथील विस्तीर्ण उद्याने, तज्ज्ञ युरोपियन उद्यान निरीक्षकांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली होती. गव्हर्नरांचा मुक्काम जेव्हा मलबार हिलवर असायचा तेव्हा येथील शंभर फुटी ध्वजस्तंभावर युनियन जॅक फडकत असे. स्वातंत्र्यानंतर गव्हर्नमेंट हाऊसचे नामकरण राजभवन असे करण्यात आले.

मलबार हिलवर सैन्य असावे हा साळुंखे यांचा तर्क बरोबर आहे. मलबार हिल समुद्रकिनाऱ्याच्या संरक्षणासाठी येथे तटबंदीवजा किल्ला बांधल्याचा उल्लेख ‘द गॅझिटियर ऑफ बॉम्बे सिटी अ‍ॅण्ड आयलण्ड’च्या तिसऱ्या खंडात, पृष्ठ २९२ वर करण्यात आलेला आहे. या गॅझिटियरनुसार येथे मोठा (ँीं५८) तोफखाना होता. या तोफखान्यास ‘ओल्ड मलबार हिल बॅटरी’ असे नाव होते. या तोफखाना दलात सैनिकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असावी. गॅझिटियरनुसार हा तोफखाना नुकताच लष्करी खात्याने मलबार हिलवरून हलविण्यात आला असे नमूद केलेले आहे. हे गॅझिटियर १९०९ सालातील असल्यामुळे मलबार हिलवरील तोफखाना १९०७ ते १९०८ या दरम्यान तेथून हलविण्यात आला असावा. नंतर या तोफखान्याच्या जागी मोठे उद्यान विकसित करण्यात आले. या तोफखान्याच्या जागी मोठे उद्यान विकसित करण्यात आले. या तोफखान्यास आवश्यक असणारा दारूगोळा, शस्त्रे व तोफगोळे व इतर सामग्री ठेवण्याकरिता राजभवनात आढळलेल्या तळघरातील बंकरमध्ये असलेल्या खोल्या निर्माण करण्यात आला असावा. येथील बंकरमधून कुलाबा किंवा मुंबईत लष्करांच्या छावण्यांपर्यंत भुयारे असावीत, असे साळुंखे म्हणतात. मुंबई शहरातील ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये तळघरे व भुयारसदृश मार्ग आढळून आल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. पुरातत्त्व खात्याने तज्ज्ञांकरवी याचा शोध घेणे गरजेचे आहे.

आचार्य बाळकृष्ण व शिंगणे मोरो विनायक या लेखकद्वयींच्या ‘मुंबईचा वृत्तांत’ या १८८९ सालामधील ग्रंथानुसार ‘शिरगुंडीचा पूल’ व या पुलाच्या अवशेषांचा उल्लेख साळुंखे यांनी केला आहे. परंतु तत्कालीन इंग्रजी ऐतिहासिक साधनांमध्ये कुलाबा बेटावरून, मलबार हिलला जोडलेल्या पुलाचा उल्लेख आढळत नाही. कदाचित हा पूल मुंबईच्या सात बेटांच्या जोडण्याच्या प्रक्रियेच्या वेळी पाण्याखाली गेला असण्याची शक्यता आहे. परंतु मुंबईच्या सात बेटांच्या तत्कालीन नकाशात व नंतर ही बेटं जोडल्यानंतरच्या नकाशात मात्र हा पूल आढळत नाही. १८२० साली कुलाबा बेट मुंबईच्या भूभागाशी जोडण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात १८३८ मध्ये ऑर्थर बंदर ते अपोलो बंदर रस्ता (गेट वे ऑफ इंडिया) यांना जोडणारा कुलाबा कॉजवे बांधण्यात आला. त्या काळात छोटा कुलाबा व मोठा कुलाब्याला मुंबई शहराच्या भूभागाशी जोडणारा हा एकमेव पूल होता. हा कॉजवे अरुंद असल्यामुळे १८६२ साली या कॉजवेची पुनर्बाधणी करून तो रुंद व उंच करण्यात आला. ‘मुंबईचा वृत्तांत’ या ग्रंथात उल्लेख केलेल्या पुलाचे अवशेष म्हणजे जुन्या कुलाबा कॉजवेचे अवशेष तर नसतील?

साळुंखे यांनी लेखाद्वारे शिरगुंडी पूल, राजभवनातील बंकर व भुयारांच्या संदर्भात काही तर्क व शक्यता संशोधकांसमोर मांडलेल्या आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांपेक्षा मुंबई शहराचा इतिहास वेगळा आणि मनोरंजक आहे. साळुंखे यांनी उपस्थित केलेल्या तर्काच्या आधारे मुंबईच्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न इतिहास संशोधक, अभ्यासक व पुरातत्त्व खात्याने करण्याची गरज आहे. या मंथनातून कदाचित मुंबई नगरीचा अधिक महत्त्वपूर्ण इतिहास उजेडात येऊ शकेल.
संभाजी भोसले – response.lokprabha@expressindia.com