06 August 2020

News Flash

फळभाज्या, शेंगभाज्या (भाग ४)

‘आमचे वाढते वजन कमी करा. आम्ही काही खात-पीत नसूनही वजन कसे वाढते, कळत नाही. किती औषधे घेतली तरी शरीर हटत नाही,’ अशा एक ना अनेक

| November 18, 2012 04:14 am

दुधी भोपळा
‘आमचे वाढते वजन कमी करा. आम्ही काही खात-पीत नसूनही वजन कसे वाढते, कळत नाही. किती औषधे घेतली तरी शरीर हटत नाही,’ अशा एक ना अनेक गोष्टी मी दिवसांतून पाच-दहा रुग्णांच्या तोंडून तरी एकतो.
वजन घटवायचे ठरवले तर त्याकरिता उपाय आहे. सोपा उपाय आहे. पण तो नेटाने केला पाहिजे. दुधी भोपळा सर्वाच्या परिचयाचा आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांत तरी मुबलक, सदासर्वदा व स्वस्तात, ताजा मिळतो. दुध्याची भाजी पथ्यकर आहे. दुधी हलवा उत्तम बनतो. शरीर ज्या वेळी क्षीण होते, शरीरातील रसधातू क्षीण होतो, त्यावेळेस दुध्याच्या रस, भाजी, खीर व हलवा यासारखे टॉनिक नाही. रसक्षय झाल्यामुळे शब्द सहन होत नाही. राग लवकर येतो. झोप अशांत लागते. हातापायाला भेगा पडतात. मानसिक ताण वाढतो. अशा वेळेस दुधी भोपळ्याला चांगल्या तुपात परतून घेऊन, उत्तम दर्जाच्या दुधात खीर करून खावी.
मात्र, ज्यांना दमा, सर्दी, पातळ परसाकडे होणे या तक्रारी आहेत, त्यांनी दुधी भोपळा रस, खीर किंवा हलवा खाऊ नये. माफक प्रमाणाने भाजी खावी. शरीरात फाजील कफ असणाऱ्या कृश व्यक्तींनी दुधी भोपळ्याबरोबर आले, लसूण, जिरे, मिरी अशी वाजवी तोंडीलावणी तारतम्याने वापरावी. मधुमेह विकारांत दुधीभोपळा आवर्जून खावा. गोड पदार्थ खाल्ल्याचे समाधान लाभते. रक्तातील साखर वाढत नाही. या भाजीचा कंटाळा येत नाही.
अतिस्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्याकरिता पुढील पद्धतीने दुधी भोपळा खावा. नेहमीच्या जेवणाअगोदर पाव किलो दुधी भोपळ्याच्या फोडी उकडाव्या, त्याला मीठ, साखर काहीच लावू नये. नुसत्या फोडी प्रथम खाव्या. नंतर इतर जेवण जेवावे. अशा पद्धतीने दोन वेळा दुधीभोपळा खावा. त्यामुळे लघवी, परसाकडे साफ होते. पोटात आग पडत नाही. दुधी भोपळ्यात काबरेहायड्रेट, चरबी, प्रोटीन, स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ नाहीत. दुधी भोपळा भरपूर खाऊन पोट भरते. महिन्याभरात पाच किलो वजन नक्कीच घटते. तोंडावर ताबा ठेवला तर या पद्धतीने थकवा न येता वजन घटते.
ज्या लहान मुलांना शौचाला साफ होत नाही, कृश आहेत अशांना पाव ते अर्धा कप दुध्या भोपळ्याचा रस चवीपुरता साखर मिसळून द्यावा. किरकिरी, हातपाय रूक्ष असणारी कडांगी किंवा कडकी असणाऱ्या लहान मुलांना वजन वाढविण्याकरिता दुध्याची खीर द्यावी.
दोडका
दोडका शिराळे, कोशातकी या विविध नावांनी ओळखला जातो. फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कफ, आम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारांत या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.
आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यांतही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका  पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारांत दोडका दुध्या भोपळ्याप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारांत दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे. अरुची, खोकला, कफ, कृमी व ताप या विकारांत दोडका पथ्यकर पालेभाजी आहे. कृश व्यक्तींना  वजन वाढविण्याकरिता दोडका उपयुक्त आहे. दोडक्याच्या मुळांचा उपयोग मूतखडा पडून जाण्याकरिता होतो.
आमांश, जुलाब, मंदाग्नी, पोटदुखी या विकाराच्या रुग्णांनी दोडका टाळावा. दोडक्याच्या शिरांची किसून तीळ मिसळून फोडणी देऊन चटणी करावी. दोन घास अन्न जास्त जाते.
नवलकोल
कोबी व फ्लॉवरपेक्षा कोवळा नवलकोल उत्तम भाजी होय. गुणाने शीत असून पित्तशामक व पथ्यकर आहे.
पडवळ
प्राचीन काळापासून पडवळ, कडू पडवळ अनुक्रमे भाजी व औषधी उपयोगाकरिता वापरांत आहे. पडवळ फळ, पाने, तसेच सर्व पंचांग औषधी उपयुक्ततेचे आहे. पडवळ गुणाने थंड असूनही वातवर्धक किंवा कफवर्धक आहे. पडवळ तीनही दोषांच्या विकारांत उपयुक्त आहे. जास्त उपयोग कफव पित्तविकारांत आहे.
कफाचे विकार विशेषत: तृप्ती, अन्न नकोसे वाटणे, भूक मंद असणे, रुची नसणे, खूप तहान लागणे, स्थौल्य, मधुमेह या विकारांत पडवळाची भाजी उत्तम काम देते. पडवळ नुसते उकडावे. चवीपुरते जिरे, मिरी, धने, सुंठ अशी चूर्णे सोबत तोंडी लावणे म्हणून वापरावे. पोटाची भरपाई होते. अजीर्ण, अपचन होत नाही. शरीराचे वाजवी पोषण होते. सम्यक मल तयार होतो. खूपच कफ होत असल्यास पडवळाचे तुकडे वाफारून त्यांचा रस कपभर घ्यावा. चवीपुरते जिरे व हिंग मिसळावे. ज्यांना खूप उष्णतेशी काम आहे, तीव्र ताप, चक्कर, भ्रम या लक्षणांचा वारंवार त्रास आहे त्यांनी पडवळाची भाजी किंवा रस नियमित घ्यावा. गुळवेलीच्या गुणधर्माशी सादृश्य असलेले पडवळाचे कार्य आहे. पडवळाच्या पानांचा उलटय़ा करवणे किंवा विरेचक म्हणून उपयोग आहे. थोडय़ा मोठय़ा मात्रेने हा रस घ्यावा लागतो. लहान बालकांना तुलनेने लहान मात्रेत हा रस दिला तर त्यांच्या छातीतील साठलेला कफ पडून जातो. छाती मोकळी होते, दमा, खोकला याला उतार पडतो. चाई पडली असता केस गेलेल्या जागी पडवळाच्या पानांचा वाटून चोथा बांधावा.
पडवळ खाण्याकरता कोवळेच पाहिजे. बिया जून झालेले पडवळ निरुपयोगी आहे. पथ्यकर पालेभाजी म्हणून आजारांतून उठलेल्या, अशक्तांकरता पडवळ चांगले काम देते. साध्या सोप्या किरकोळ स्वरूपाच्या ज्वरांत पडवळाच्या पंचगाचा काढा उपयुक्त आहे. अनुलोमनाचे कार्य करून तीनही दोष समास्थितीत आणण्याचे पडवळाचे कार्य गुळवेलीसारखे आहे. कडू पडवळाचे बी तीव्र रेचक व भेदनाचे कार्य करते. कडू पडवळाच्या बियांचे चूर्ण उदरविकार, कावीळ, शोथ या विकारांत उपयुक्त आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2012 4:14 am

Web Title: swasthya ani aurved
Next Stories
1 निर्मळ, प्रांजळ पण पसरट आत्मचरित्र
2 विक्राळ लेखकाची पहिली कादंबरी
3 इतिहास जपणारा कादंबरीकार
Just Now!
X