बॉबी फिशर नं जगज्जेतेपद सोडून दिल्यामुळे अनातोली कार्पोवला न खेळताच जगज्जेता बनता आले. त्यामुळे जगात त्याच्याविषयी आधी आदराची भावना नव्हती; पण कार्पोवनं आपण जगज्जेतेपदासाठी किती परिपूर्ण आहोत हे १९७५ ते १९८५ ही दहा वर्षे दाखवून दिले. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना गुंगवून त्याच्यावर चढाई करण्याचे त्याचे तंत्र अद्भूत होते. तो ‘केजीबी’ या गुप्तचर यंत्रणेचा काही काळ हस्तक असल्याची वावडी उठली होती. या तथाकथित गुप्तहेराचे बुद्धिबळ जीवन विलक्षण होते..

करोना महासाथ सुरू होण्याच्या सुमारास एक पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झालं होतं, त्याचं नाव होतं ‘द केजीबी प्लेज चेस’ माजी सोव्हिएत बुद्धिबळ विजेता बोरिस गुल्को, प्रख्यात जागतिक आव्हानवीर व्हिक्टर कोर्चनॉय आणि सोव्हिएत संघराज्याचे माजी केजीबी कर्नल पॉपॉव्ह यांनी लिहिलेल्या या पुस्तकात अनेक सनसनाटी आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा आरोप असा होता की माजी विश्वविजेता अनातोली कार्पोव हा केजीबीचा हस्तक/ हेर होता. त्याचं सांकेतिक नाव होतं- रॉल!

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

हेही वाचा – आदले । आत्ताचे : अधोविश्वाची ऊर्ध्वगामी दास्तान

कार्पोव हा सोव्हिएत आणि नंतर रशियन राज्यकर्त्यांचा आवडता खेळाडू होता यात काही शंका नाही. त्याला सोव्हिएत आणि रशियन लोकसभेचं प्रतिनिधित्व दिलेलं होतं आणि मनानं आणि विचारानं पूर्ण कम्युनिस्ट असणारा कार्पोवही त्यांना तशीच साथ देत असे. एकदा त्याला विचारण्यात आलं होतं की, तुझ्या आयुष्यातील संस्मरणीय घटना कोणती? प्रश्नकर्त्यांची अपेक्षा होती की अनातोली सांगेल की मी पहिल्यांदा जगज्जेता झालो ती किंवा माझं लग्न, मुलाचा जन्म वगैरे वगैरे! पण हा माणूस काय म्हणाला माहिती आहे का? ‘‘मी लिओनिड ब्रेझनेव्ह यांना भेटलो ती.’’ आणि कार्पोव एवढ्यावर थांबला नाही. तो पुढे म्हणाला, ‘‘दुसरी घटना म्हणजे सोव्हिएत संघराज्यानं नवी राज्यघटना १९७३ साली अंगीकारली तो दिवस माझ्या वैयक्तिक आयुष्यातील न विसरण्याजोगा क्षण होता!’’

ते जाऊ दे! आज आपण बघणार आहोत या महान जगज्जेत्याचं बुद्धिबळ जीवन. कार्पोव १९६८ साली सोव्हिएत संघराज्याचा ज्युनिअर विजेता झाला त्या वेळी सोव्हिएत खेळाडू अक्षरश: जग जिंकत होते, पण त्यांना जागतिक ज्युनिअर जगज्जेतेपद सतत हुलकावणी देत होतं. किंबहुना १९५५ साली बोरिस स्पास्की जागतिक ज्युनिअर विजेता झाला होता आणि त्यानंतर एका वर्षांआड होणाऱ्या या अजिंक्यपद स्पर्धेत सोव्हिएत ज्युनिअर खेळाडूंना सतत मार खावा लागत होता. अनातोली कार्पोव हा अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे आणि मिखाईल बोटिवनीकसारख्या माजी जगज्जेत्यानं त्याची पूर्ण तयारी करवून घेतली आहे याची जरी खात्री असली, तरी सोव्हिएत संघराज्याचे बुद्धिबळ पदाधिकारी जराही धोका पत्करण्यास तयार नव्हते. स्पर्धेआधी त्यांनी कार्पोव आणि उपविजेता राफेल वॅगानियन यांना युगोस्लाव्हियात एका ग्रँडमास्टर स्पर्धेत पाठविलं होतं. दोघांनी पहिले दोन क्रमांक मिळवून आपण वरच्या दर्जाचं बुद्धिबळ खेळत असल्याची ग्वाही दिली होती. कार्पोव ऐन वेळी खेळू शकला नाही तर वॅगानियन तयार होताच! त्यांनी कशी पद्धतशीर तयारी करवून घेतली त्याचा नमुना पाहा.

स्पर्धा होणार होती स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथं. सोव्हिएत संघराज्यातील अशी जागा निवडण्यात आली की ज्याचं हवामान स्टॉकहोमशी मिळतंजुळतं आहे. कार्पोवला त्याच्या प्रशिक्षकांसोबत तब्बल दोन महिने आधी तिथं पाठवण्यात आलं. स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी कार्पोव आणि त्याचे सहकारी स्टॉकहोममध्ये दाखल झाले. ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते तेथून जवळ असणाऱ्या स्पर्धेच्या ठिकाणी कार्पोवला स्पर्धेच्या वेळेनुसार एक आठवडा रोज पायी नेण्यात येत असे. अत्यंत प्रतिभावान असणारा कार्पोव इतक्या तयारीनंतर न जिंकला तरच नवल! त्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत कार्पोव फक्त एक डाव हरला होता आणि तोही फिलिपाईन्सच्या युजीन टोरे विरुद्ध! पण कार्पोव हा खुनशी स्वभावाचा असल्यामुळे त्यानंतर त्यानं टोरेला कधीही माफ केलं नाही. येनकेनप्रकारे तो टोरेला हरवत असे. अनातोली कार्पोव हा त्या वेळी अतिशय जलद खेळत असे आणि त्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी सतत वेळेअभावी चुका करत असत. एका स्पर्धेत कार्पोव पहिला येणार हे नक्की होतं, पण त्यानं पटावर बरोबरी दिसत असतानाही (आणि दोन ग्रँडमास्टर सहसा बरोबरी घेतील अशा परिस्थितीत) त्यानं अनेक तास खेळून टोरेला पराभूत केलं. तोवर कार्पोव जगज्जेता झाला होता. पत्रकारांनी कार्पोवला विचारलं की, हा ज्युनिअर जगज्जेतेपदाच्या पराभवाचा सूड होता का? त्यावर कार्पोव मानभावीपणे म्हणाला, ‘‘मी जगज्जेता आहे. मला त्याच्याविरुद्ध काहीही सिद्ध करायची गरज नाही.’’

कार्पोवच्या सूडबुद्धीची ही काही एकमेव गोष्ट नाही. आइसलँडचा ग्रँडमास्टर फ्रेडरिक ओलाफसन हा एका जर्मन स्पर्धेत कार्पोवचा प्रतिस्पर्धी होता. त्या काळी दर पाच तासांच्या खेळानंतर डाव स्थगित केला जात असे आणि त्यानंतर उरलेला डाव दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतरही निकाल नाही लागला तर तिसऱ्या दिवशी खेळला जात असे. ओलाफसनविरुद्धचा डाव चक्क ९५ चाली चालून बरोबरीत सुटला; पण तीन दिवस चाललेल्या या डावात रोज ओलाफसन सकाळी कार्पोवविरुद्ध स्थगित झालेला डाव खेळत असे आणि दुपारी दुसऱ्या ग्रँडमास्टरविरुद्ध पुढच्या फेरीचा डाव खेळत असे. त्याव्यतिरिक्त तयारीचा वेळ वेगळाच! या सगळ्याचा ताण पडून ओलाफसन इतरांशी दुपारचे डाव हरला. या सगळ्यामागे कारण काय होते? तर डावाच्या सुरुवातीलाच कार्पोवनं बरोबरीचा प्रस्ताव पुढे केला होता. त्या वेळी ओलाफसनला वाटलं होतं की त्याची परिस्थिती चांगली आहे आणि त्यानं जगज्जेत्याचा बरोबरीचा प्रस्ताव नाकारला होता. झालं! कार्पोवचा अपमान झाला होता आणि त्यानं ओलाफसनला त्याची अद्दल घडवली होती.

एक खेळाडू म्हणून अनातोली कार्पोव महान होता यात शंकाच नाही. माजी विश्वविजेत्या मिखाई लतालनं काय लिहिले आहे ते बघा. गोष्ट आहे १९७२ सालच्या ऑलिम्पियाडची. सोव्हिएत संघराज्याच्या संघानं नेहमीप्रमाणे सुवर्ण जिंकलं होतं. ताल लिहितो, ‘‘रोज रात्री आम्ही एकत्र भेटायचो त्या वेळी आम्ही आमचे डाव दाखवत असू; पण आम्हालाच कळत असे की आमच्या डावांमध्ये काही खास चमक नाही. याउलट तरुण अनातोलीचे डाव कल्पनारम्य असत. त्यामध्ये वेगळीच चमक असे.’’ साक्षात तालकडून एवढी स्तुती नक्कीच अनातोली कार्पोवची प्रतिभा त्या वेळी अनुभवी खेळाडूंनासुद्धा भावली होती.

अनातोली कार्पोवच्या आधीचे दोन्ही जगज्जेते बोरिस स्पास्की आणि बॉबी फिशर हे त्यांच्या सहजसुंदर शैलीसाठी प्रसिद्ध होते. छोटासा वरचष्मा मिळवायचा आणि त्याचा फायदा घेऊन राजावर हल्ला चढवून डाव जिंकायचा असा सरळसरळ हिशेब असायचा. जर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही, तर डावात वजिरा-वजिरी करून डावाच्या अंतिम अवस्थेत डाव जिंकण्यासाठी त्यांचं अप्रतिम कौशल्य कामी येत असे; परंतु कार्पोवचं तंत्रच वेगळं होतं. गूढ पद्धतीच्या खेळ्यांनी प्रतिस्पर्ध्यांना गोंधळवून टाकायचं आणि अचानक मोठा वरचष्मा मिळवायचा असा कार्पोवचा खाक्या असे.

खोलवरच्या योजना आणि प्रतिस्पर्ध्याला नकळत त्याच्या मोहऱ्यांची कोंडी करणं हे कार्पोवच्या शैलीचं वैशिष्ट्य होतं. रसिकांनी त्याचे दोन डाव जरूर पाहावेत. एक आहे १९७१ सालच्या आलेखाईन स्मृती स्पर्धेतील त्याचा ग्रँडमास्टर हॉर्टवरचा विजय आणि दुसरा आहे १९७४ च्या ऑलिम्पियाडमध्ये कार्पोवनं केलेला ग्रँडमास्टर उंझीकरचा पराभव. हॉर्टविरुद्ध आपला एकच हत्ती वारंवार हलवून कार्पोवनं हॉर्टची परिस्थिती खिळखिळी केली, तर दुसऱ्या डावात आपल्या उंटाची पाचर मारून त्यानं उंझीकरच्या वजिराची बाजू अडकवून टाकली आणि दुसऱ्या बाजूला काळ्या राजाचा बचाव करणारा महत्त्वाचा उंट मारामारी करून ताबडतोब डाव जिंकला.

बॉबी फिशरनं जगज्जेतेपद सोडून दिल्यामुळे कार्पोवला न खेळताच जगज्जेता बनता आले. त्यामुळे जगात कार्पोवविषयी जास्त आदराची भावना नव्हती; पण कार्पोवनं सातत्यानं आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून आपण जगज्जेतेपदाला पूर्णपणे लायक आहोत हे सिद्ध केलं होतं. १९७५ ते १९८५ या काळात अनातोली कार्पोव बुद्धिबळाचा अनभिषिक्त सम्राट होता. आपल्या कारकिर्दीत त्यानं १६० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. गॅरी कास्पारोव्हच्या धडाडीच्या खेळापुढे आणि जय्यत तयारीमुळे अनातोली कार्पोव हळूहळू मागे पडला होता; पण ज्या वेळी कास्पारोव्हनं आपली वेगळी चूल मांडली त्या वेळी कार्पोव पुन्हा एकदा जगज्जेता झाला. १९९४ साली स्पेनमध्ये झालेली लीनारेस येथील स्पर्धा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम समजली जाते. गॅरी कास्पारोव्ह, विश्वनाथन आनंद, व्लादिमिर क्रॅमनिक आणि वॅसेलीन टोपालोव्ह हे चार आजी/ भावी जगज्जेते असतानाही कार्पोवनं त्याच्या शैलीच्या विरुद्ध असा आक्रमक खेळ केला आणि १४ जणांच्या या स्पर्धेत एकही डाव न गमावता तब्बल ९ विजय नोंदवले आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील एका देदीप्यमान विजयाची नोंद केली. दर वेळी स्पर्धा जिंकणारा गॅरी कास्पारोव्ह अडीच गुण मागे होता. अनातोली कार्पोव आपल्या सगळ्या खेळ्या अर्ध्या तासात करत असे; पण त्याच्या काकदृष्टीतून प्रतिस्पर्ध्याची एकही चूक निसटत नसे. कॅपाब्लांकानंतर इतक्या जलद गतीनं, पण अचूक खेळणारा जगज्जेता जगानं पाहिला नव्हता.

हेही वाचा – प्रगती म्हणजे व्यक्तीची जागा व्यवस्थेनं घेणं!

रशियन राज्यकर्त्यांचा एके काळचा लाडका कार्पोव साम्यवादाच्या पिछाडीप्रमाणे राज्यकर्त्यांच्या मनातून उतरला. १९८० च्या दशकात वारंवार ब्रेझनेव्ह, अँड्रोपॉव्ह यांना भेटणाऱ्या आणि रशियन ड्युमासचा (त्यांची लोकसभा) सदस्य असणाऱ्या कार्पोवला आता पुतीन विचारतपण नाहीत हे त्याच्या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवामुळे स्पष्ट झालं होतं. गॅरी कास्पारोव्ह आणि मॅग्नस कार्लसन यांच्या पाठिंब्यानंतरही कार्पोवचा ५५-९५ असा दारुण पराभव झाला; परंतु अजूनही कार्पोव रशियन सरकारच्या पर्यावरण समितीचा अध्यक्ष आहे आणि संरक्षण समितीचा एक सभासद आहे. पुतीन यांचा खंदा समर्थक असलेल्या कार्पोवला जागतिक संघटनेनं युक्रेन लढाईनंतर जागतिक संघटनेच्या सन्माननीय राजदूत या पदावरून निलंबित केलं आहे, तर युरोपिअन देशांनी त्याला बहिष्कृत केलं आहे.

आता हा माजी जगज्जेता ७३ वर्षांचा आहे आणि त्याला कोणीही मित्र नाहीत; परंतु एक खेळाडू म्हणून सर्वाच्या मनात त्याच्याविषयी नितांत आदर आहे. स्वत:च्या खेळाविषयी कार्पोव काय म्हणतो ते बघा. ‘‘एखाद्या परिस्थितीत जिंकण्याचे दोन मार्ग असतील आणि त्यातील एक म्हणजे प्रतिस्पर्धी चूक करेल या आशेनं अंदाधुंद हल्ला करण्याचा धोका पत्करणे किंवा दुसरा मार्ग म्हणजे छोटासा वरचष्मा मिळवून, मोहरा-मोहरी करून डावाच्या अंतिम भागात जाऊन हळूहळू पण तर्कशुद्ध विजय मिळवणे. त्या वेळी मी दुसरा मार्ग निवडतो.’’

मागे २०१० साली बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई युवक स्पर्धेसाठी अनातोली कार्पोव प्रमुख पाहुणा म्हणून हजर होता. तरुणपणी चेहऱ्यावर जराही हास्य न दाखवणाऱ्या कार्पोवचं सर्वाशी मिळून मिसळून आणि हसून खेळून वागणं विलोभनीय होतं. पटावर खेळताना कठोर भासणारा केजीबीचा तथाकथित‘रॉल’ आता निवळला आहे हेच खरं. नुकत्याच मॉस्कोमध्ये जीवघेण्या हल्ल्यातून वाचलेल्या या जगज्जेत्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करू या!

gokhale.chess@gmail.com