रेणू दांडेकर – renudandekar@gmail.com

सध्या लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प झालंय. शिक्षणही. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपणही शोधू या रस्ते नवे. शिक्षकांनी समजावं, माझं मूल मला माहीतेय, तर मी पालक होईन. नि पालकांनी समजावं, आता मुलांचं काहीतरी करून घ्यायचंय आपल्याला, तर मी शिक्षक होईन. मुलांनी आपला रोल निवडलाय. ज्या तंत्रज्ञानाबरोबर ती वाढतायत, ते तंत्रज्ञान कसं वापरायचं, हे त्यांच्या हातात आहे. याचा अर्थ वेळ आहे, विचार करायची क्षमता आहे, संधी आहे, तर सर्वानीच बदलत्या भूमिकेसाठी तयारी करू या. ठरलेल्या चाकोरीतून इथे तरी बाहेर पडू या..

private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

‘आता हे असंच चालणार काही दिवस..’ असं म्हणून आपण सगळे आता सरावाचे झालोय बंदला. एका अर्थानं चांगलं आहे म्हणा! चिंता वाढल्या? वाढणारच. नोकरीतल्या समस्या निर्माण झाल्या? होणारच. त्यातून माणसं ये-जा करू लागली नि मिळेल तिथे नोकरीधंदा करून पोट भरू लागली. एक मात्र घडलं आमच्याकडे यंदा. शेतीला माणसं भरपूर मिळाली नि शेतीही लोकांनी केली. तरी प्रश्न होताच : मुलांचं काय? त्यांच्या शाळेचं काय? घरी काय होणार? यातही असं घडतंय की, ज्यांना काय करायचं माहीत नाही, त्यांची चिंता फक्त चिंताच राहिलीय. ज्यांना काही करता येतं ठरवलं तर, पण केलं जात नाहीए, त्यांची चिंता सुटेल. पण तसं घडत नाहीये. यातही एका गटाकडे लक्ष द्यायचं ठरवलं तरी तो गट त्याचं त्याचं बघतोय. कारण तो युवा गट आहे. विशेषत: ९ ते १४ वयोगटातल्या मुलांच्या बाबतीत चिंता आहे.

सुरुवातीला सगळ्या घटनांना अगदी उधाण आलं. ऑनलाइनवर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाल्या. मनात असो-नसो, आवडो- न आवडो; सगळे करायला लागलेत, मग आपणही केलंच पाहिजे, या जाणिवेनं अभ्यास सुरू झाला. भराभर कार्यक्रम तयार झाले. (ते कसे, आशय काय, त्याची मांडणी, सादरीकरण हे मुद्दे तूर्तास बाजूला ठेवू.) पालक दामटवून दूरदर्शनवरील कार्यक्रमांना बसवू लागले मुलांना! त्याची गंमत सांगते. परवा तिसरीचा कार्यक्रम लागला होता. बाईंच्या शेजारी दोन मुलं. बाईंनी धडा वाचून दाखवला. नेहमीचे प्रश्न विचारले. नेहमीचाच अभ्यास दिला. पाठ संपला. वाचणारी मुलं असं वाचत होती, की माझ्या नातवानं विचारलं,

‘ही मुलं कुठली आहेत? कितवीत आहेत?’

‘का रे?’

‘हे ताई-दादा एवढे मोठे दिसतायत, पण त्यांना वाचता पण येत नाही?’

‘येतंय ना!’

‘किती कसेतरी वाचतायत!’ वयानं मोठी असलेली मुलं त्यांच्यापेक्षा लहान वर्गातल्या पाठासाठी होती. तीही कदाचित वेगळ्या माध्यमातली असावीत. अगदी साध्या साध्या संबोधावर पण ती अडत होती.

चला.. काहीतरी तयार झालं. असं का व्हावं? खरं तर खूप वेगळा आशय, वेगळ्या पद्धती, करोना गृहीत धरूनही वेगळं शिकण्याचं वातावरण सहज तयार करता आलं असतं. नि यानिमित्ताने वेगळं, आशयघन मुलांपर्यंत, पालकांपर्यंत पोचलं असतं. ऑनलाइनला हा एक पर्याय काढला गेला असावा.

खरं तर जे समोर येतंय ते चालवून घ्यावं लागतंय. कारण आपण काही करत नाही, नि चालवून घेणं सरावाचं झालंय. आता पुढे जाऊ या. जर भूमिका बदलल्याच आहेत, तर त्या समजावून घेऊ या. म्हणजे काय? तर इतके दिवस मुलांचा अभ्यास, त्यांना शिकवणं ही अलिखित आपली जबाबदारी नाही असा आपला ग्रह होता. चांगलं, अधिक चांगलं, उत्तम शिक्षणासाठी शाळा, जादा क्लास, स्पेशल क्लास यांच्यावर जबाबदारी टाकून आपण मोकळे झालो होतो. मग त्यासाठी पैसे जाईनात का.. अशा समजुतीत का होईना, पण होतो आपण. पण आता सगळंच आपल्या खांद्यावर आलंय. म्हणून आपण एका वेगळ्या, व्यावसायिक शिक्षकाची भूमिका घेऊ या. काय द्यायचंय, का द्यायचंय, कसं द्यायचंय याचा आपण विचार करू. आपण सगळे ‘फ्रेश टीचर्स’ होऊ. आम्हा शिक्षकांचं कसं होतं, की वर्षांनुर्वष तेच ते, त्याच त्या पद्धतीनं शिकवत बसलेले असतो आम्ही! नव्या लोकांचा उत्साह आणि दम आपण निर्माण करू. समजण्याची एक पातळी आपण गाठू. कशी? साचेबंदपणातून बाहेर येऊन. तो द्यायला, जपायला शाळेचं अभ्यास शिकवणं सुरूच आहे. त्यांची भूमिका बदलेल असं नाही. मात्र, आपल्याला संधी आहे. पाठय़पुस्तक टाळायचं नाही; पण तेवढंच घेऊन बसायचं नाही. आपल्याला आवडतील त्या गोष्टी, कविता, उतारे निवडू या. अगदी सगळ्या वर्गासाठी. इथे आपल्या आधीच्या पिढीच्या स्मरणात असलेल्या गोष्टींचा उपयोग होईल. आजी-आजोबांच्या कविता कशा आहेत बघू! गाण्यांसारख्या कविता गुणगुणायची सवय होईल. डाऊनलोड करू या अभ्यासक्रम. निदान आपल्या मुलांच्या इयत्तेच्या विषयांचा अभ्यासक्रम नजरेखालून घालू.. म्हणजे उद्दिष्टे समजतील. नि तिकडे आपल्या मुलांना न्यायचंय, हे एकदा मान्य केलं की मग ते कसं न्यायचं हे समजण्याइतके आपण सूज्ञ नक्कीच आहोत. असं करत गेलो की मग फक्त चिंता करण्यातून हळूहळू बाहेर पडायचा रस्ता सापडेल.

आम्ही खूप लहानशा गावात राहतो. पालकवर्ग मुलांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारा असेलही, पण मुलांचा काठी होणारा आहे असं नाही. ऑनलाइन शाळेबद्दल मी वेगवेगळ्या इयत्तांतील मुलांशी बोलत होते. ‘आमचं आम्ही मनाने मनाचं शिकतो!’ हे वाक्य मला खूप शिकवून गेलं. टाइमपासचे मार्ग त्यांनी शोधलेले दिसले.

माझ्या मनात आलं- नेहमीचं घेऊन झालं. आता वेगळी वाट शोधू या. तिसरीतल्या मुलांची कविता नेहमीप्रमाणे संपली. मग जोडय़ा केल्या. पहिली ओळ एकाने द्यायची. दुसऱ्याने ती पूर्ण करायची. बघा हं.. ‘तबल्यावरती बोटे पडली ताक्  धिना धिन..’ ‘जमिनीत फुटवा आला.. चिखलणी चिखलणी करून झाली.’ ‘पोळपाटावर लाटणे फिरले.. कणीक असेल तर पोळी लाटून झाली’ इथपासून ते ‘आई-बाबा कामाने दमले.. आम्ही कामं केली.’ मजा आली. मूळ कविता विस्तारत गेली. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, एवढी कल्पकता आपल्यात आहे; फक्त आपण ती वापरली नव्हती. ती मोठय़ा मुलांपर्यंत वापरताना आपलीच मुलं आपल्याला वेगळी जाणवतात. एका मोठय़ा वर्गातल्या मुलाने ‘श्रावणमासी’चे ‘फाल्गुनमासी, दु:ख मानसी, रखरखाट तो चोहीकडे’ असे केले होते. कवितेचं उद्दिष्ट हे आहे की, तिचा रसास्वाद घेता घेता कल्पकता निर्माण करणं, कमी शब्दांत अधिक आशय व्यक्त करण्याची क्षमता येणं. त्यादृष्टीने प्रयत्न का नाही करायचा? एकदा पाठय़पुस्तकनिर्मितीच्या वेळी शेवाळकर सर म्हणाले, ‘हिरवे पिवळे ऊन कोवळे’ या ओळीवर ‘ऊन कसे होते?’ हा प्रश्न जाणिवेच्या, अनुभवाच्या पातळीवर मुलाला नेतच नाही. तो कसा नेईल, असा प्रश्न तयार करा ना!’ आता ती संधी आहे.

भूमिका बदललीय.. मनात असो वा नसो, ती स्वीकारावी लागलीय. ती वठवायला फार मेहनत करावी लागणार आहे. अर्थात असं वाटलं तर! आपण या गोष्टी ऑनलाइन शाळेतही का नाही करू शकणार? का तिथंही पुन्हा तेच! उलट, अधिक कृत्रिमपणे! प्रत्येक वाक्याला ‘छान, मस्त, शाब्बास’ वर्गात आपण म्हणतो! काय चांगलं व्यक्त केलं, काय मध्यम दर्जाचं व्यक्त झालं, काय सामान्य दर्जाचं व्यक्त झालं, हे कसं कळणार मुलांना? मग ती बोअर होणारच. आधीच पडदा कृत्रिम.. त्यात आणखी आतला आशय कृत्रिम होऊन कसं चालेल? एकदा एका गटाला नऊ दगड दिले नि सांगितलं, ‘चार दगडांच्या तीन ओळी बनवा. तीन रांगा करा.’ खूप प्रयत्न केला नि रचना करता करता उत्तर सापडलं. नेहमीपेक्षा वेगळा विचार करावा लागला. तो आपल्याला करता येतो, हा विश्वास वाटला. एक १० इंचाचा लांब कागद आहे. त्याचे दहा तुकडे करायचेत. तर तो किती वेळा कापावा लागेल? करून पाहा. एकदम उत्तर नाही द्यायचं. करून पाहून जेव्हा मुलांनी उत्तर दिलं तेव्हा ते बरोबर आलं. म्हणजे या भूमिकेत अशा गोष्टी सादर करायच्या असतील तर आपण आपल्या भूमिकेचा विचार करू. माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारताना ती म्हणाली, ‘‘अगं, एक शब्द देऊन तो असा लिहा.. नि तो केव्हा वापरतात’ असं फेसबुकवर टाकलं तरी लोक वेडे होतात. सोशल मीडियावर सारखं दिसलं पाहिजे.’’ असं काहीतरी करून दिसण्यापेक्षा खरंच वेगळं काही करून व्यक्त होता येईल. उलट, किती साधी गोष्ट आहे : ‘मोरपीस’ हा शब्द. नेहमीचा प्रश्न.. ‘यातील अक्षरे वापरून शब्द बनवा.’ पुढचा टप्पा काय? ‘यातील अक्षरे वापरून वाक्य बनवा.’ (मोर, पीस, पीर, रस, सर.. संपले शब्द! वाक्याचे काय? तर- ‘रस पी’ हे वाक्य झालं.) आहे त्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेणं हे यामुळे जमेल. वरून खाली येऊ- १० वी ते १ ली.. तसतसं हे अवघड होतं, पण प्रतिसाद जास्त मिळतो.

आज आपलं ‘फ्रीली ब्रीदिंग’ बंद झालंय. नि डोळ्यापुढील कलात्मक/ कल्पक ध्येय नष्ट होत चाललंय. कारण व्यावहारिक ध्येयाची आपल्याला सवय लागली होती. ठीक आहे. तेव्हा ती गरज होती. आता गरज वेगळी आहे. शोधू या ना मग! या ध्येयाला ‘क्रीएटिव्ह एम’ म्हणतात म्हणे! हे सारं वेगळेपण ऑनलाइनलाही वेगळा दर्जा नक्कीच देईल. नीट विचार करून केलं तर नक्की याचं फलित चांगलं असेल. काहीतरी करायचंय म्हणून जर केलं गेलं तर मात्र ते जास्त नुकसानकारक आहे. आणि आपल्याला आपल्या भूमिकेसाठी काही ‘इनपुट्स’ हवे असले तर मोबाइल आहेच हातात! शिवाय आम्ही शिक्षक वेगळा विचार करत आहोत असं मानलं नि अधिक वेगळं आणि दर्जात्मक काम करायचं ठरवलं तर यंत्रणेतल्या कुणालाच सध्या अधिकारशाही गाजवायला वेळ नाही आणि प्रत्येक जण काय करतंय, हे पाहायलाही वेळ नाही. मग आपणही शोधू या रस्ते आपापले. शिक्षकांनी समजावं, माझं मूल मला माहीतेय, तर मी पालक होईन. नि पालकांनी समजावं, आता मुलांचं काहीतरी करून घ्यायचंय तर मी शिक्षक होईन. मुलांनी आपला रोल निवडलाय. ज्या तंत्रज्ञानाबरोबर ती वाढतायत, ते तंत्रज्ञान कसं वापरायचं, हे त्यांच्या हातात आहे. असं आहे तर हा वापर सर्वच गटांसाठी दर्जात्मकच व्हायला हवा. याचा अर्थ- वेळ आहे, विचार करायची क्षमता आहे, संधी आहे, तर सगळ्यांनीच बदलत्या भूमिकेसाठी तयारी करू या, आशय शोधू या, ठरलेल्या चाकोरीतून इथे तरी बाहेर पडू या. मग आपोआप ताणही दूर होईल, कारण मन स्थिरावेल. किती वेळ तेच ते प्रश्न द्यायचे? आणि मुलांनी ज्यांची उत्तरं माहीत आहेत, तेच प्रश्न सोडवायचे? नव्या प्रश्नोत्तरांचं भान येऊ दे ना!