को जागरती?

आभाळात ब्याटरी लावा पाहा चांदणं कसं टिपूर पडलंय केजोच्या चित्रपटांतल्या सारखं खुर्चीतल्या खुर्चीत रोमँटिक करणारं

मग घडय़ाळात पाहा किती रात्र झालीय अन् किती चांदणं उरलंय ते बरीक उशीरच झालेला असेल मग जाऊन झोपा

आभाळात ब्याटरी लावा

पाहा चांदणं कसं टिपूर पडलंय

केजोच्या चित्रपटांतल्या सारखं

खुर्चीतल्या खुर्चीत रोमँटिक करणारं

आपापल्या गच्चीवर जा

भिजा त्यात मनसोक्त हसा

जमल्यास एखादी सेल्फी काढा

उगाच आपली चांद सिफारीश म्हणून

 

मग ती देईल

चांदीच्या प्याल्यातून घोटीव मसालेदार दूध

केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, जायफळ,

वेलदोडे

अलीकडे तूरडाळही घालतात म्हणे त्यात

शोभेसाठी

प्या

पिता पिता लावा गाण्याच्या भेंडय़ा

म्हणा

ओम्नमोशिवायनमहा

ह आला ह

हमे तुमसे प्यार कित्ना

काय पण लाजली ती.. अहह!

किंवा खेळा दमशिरास वा मेंढीकोट

नाचा मोबाइलवरल्या गाण्यांवर

आपल्याच शांताबाईसह

किंवा

बसा आपल्याच घरातल्या बाल्कनीत

दूधच प्या असंही नव्हे, पण

चखण्याला चांदणं असू द्या

लावा किशोरीचं सहेला रे

एकटय़ाने सुसंस्कृत जागायला बरं पडतं ते..

 

मग घडय़ाळात पाहा

किती रात्र झालीय

अन् किती चांदणं उरलंय ते

बरीक उशीरच झालेला असेल

मग जाऊन झोपा

आपापल्या बिछान्यांत सुरक्षित

जमल्यास थोडंसं चांदणं घेऊन कुशीत

कोजागरी आहे म्हणून

एवढं जाग्रण चालतं

एरवी सालं कोण एवढं जागतं?

 

रोज पहाटे उठून

त्याला दाढीअंघोळ, नाश्ताबिश्ता

तिला जेवणाचा डबा, नट्टापट्टा

आठ-तेहतीसची गाडी

तोच तो डबा नि तीच ती टोळी

फॉरवर्डी विनोदाला ऑनलाइन टाळी

तीच ती कचेरी आणि तेच ते काम

थंड थंड रक्त आणि उसळता घाम

रूटीन रूटीन जगण्याचा

रूटीनच होतो वीट

बातम्या बघायच्या म्हटलं तरी

सांगावं लागतं

उघडा डोळे आणि बघा नीट

कोजागरी आहे म्हणून

एवढं जाग्रण चालतं

एरवी कुणाची खबर घ्यायला

कोण सालं जागतं?

 

जागू नका

दारे लावा, खिडक्या लावा

डोळ्यांनाही पडदे लावा

 

बाहेर चांदणे गिळताहेत राहू केतू

कोणी पेट्रोल टाकून पेटवताहेत

माणसांमधले सेतू

निषेधालाही असतात किंतु आणि

पापण्यांतल्या अश्रूंनाही जडलेले हेतू

फवारताहेत क्लोरोफॉर्म

पडद्यांआडून पडद्यांवरून

लहान मेंदू मोठा मेंदू

त्याचा करताहेत चेंडू

व्हाटस्यापी मेसेजांमधून

तेव्हा मेंदूिबदू कपाटात ठेवून

झोपा

जागे राहू नका

 

ते कोणी तरी तिकडे म्हणतेय

जागे राहा, जागे राहा, नाही तर गब्बरसिंग येईल

त्याच्याकडे लक्ष देऊ नका

झोपा

 

हां आता कोजागरी आहे म्हणून

थोडं जागलेलं चालतं

एरवी सालं कोण एवढं जागतं?

 

-balwantappa@gmail,com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poetry on moon