सिद्धार्थ खांडेकर siddharth.khandekar@expressindia.com
मायकेल कारबेरी हा क्रिकेटपटू इथल्यांना फार माहीत असण्याची शक्यता कमीच. पण अमेरिकेत मिनेआपोलिस शहरात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन-अमेरिकन नागरिकाचा पोलीस चौकशीदरम्यान जीव गुदमरून मृत्यू झाला आणि त्यातून अन्यायसंतप्त कृष्णवर्णीय अभिव्यक्तीचा जो महास्फोट जगभर झाला, त्यात काही क्रीडापटूंनीही आवाज उठवला. कारबेरी हा त्यांच्यापैकीच एक. कारबेरी हा इंग्लिश फलंदाज. या देशाला कॅरेबियन क्रिकेटपटूंची एक चांगली परंपरा होती. ती मध्यंतरी खंडित झाल्यासारखी झाली होती. या दशकाच्या सुरुवातीला एक चांगला डावखुरा फलंदाज म्हणून कारबेरी नावारूपाला आला. तेव्हा ही खंडित परंपरा पुनरुज्जीवित झाल्यासारखी वाटली. पण ते समाधान अल्पकालीन ठरले. कारण कारबेरी इंग्लंडकडून केवळ सहा कसोटी सामनेच खेळू शकला. कारबेरीचे दुख ते नाही; वेगळेच आहे. जॉर्ज फ्लॉइडसारख्यांना अमेरिकेत जे वारंवार अनुभवाला येते, तशी तुच्छता आणि अवहेलना इंग्लंडमध्ये आमच्याही वाटय़ाला येते असे त्याचे म्हणणे. कारबेरीची कारकीर्द काही झळाळती नाही, परंतु त्याने उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच ठसठशीत आहेत. उदा. इंग्लिश क्रिकेटमध्ये सध्या निर्णय घेणारी जी मंडळी आहेत, त्यांच्यात एखादा तरी कृष्णवर्णीय आहे का? जरा खालच्या स्तरावरसुद्धा हीच परिस्थिती आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक वा मुख्य प्रशिक्षक कधी कृष्णवर्णीय होते का? त्याच्याही खाली उतरल्यास कौंटी क्रिकेट संघांचे कर्णधार कधी तरी काळे असतात का? आता या नियमाला कारबेरी स्वत: अपवाद ठरला. कारण त्याच्याकडे लिस्टरशायर संघाचे नेतृत्व होते. पण ते अल्पकालीन ठरले. त्याच्या बदली आलेल्या गोऱ्या कर्णधाराला संपूर्ण हंगाम एकही सामना जिंकता आला नाही. पूर्वी एका कौंटी क्लबकडून कारबेरी खेळायचा. त्या क्लबच्या प्रशिक्षकाचा एकदा त्याने जीवच घ्यायचे बाकी ठेवले होते. कारण..? तो गोरा प्रशिक्षक कारबेरीला म्हणाला, ‘अंधारात तू दिसतच नाहीस’! त्या प्रशिक्षकाला बदडल्यानंतर कारबेरीची संघातून हकालपट्टी झाली. प्रशिक्षकावर मात्र काहीच कारवाई झाली नाही. कारबेरीच्या मते, कॅरेबियन आणि आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंना व नागरिकांना वर्णद्वेषी टोमणे नित्य ऐकावे लागतात. रस्त्यावर मोटार चालवताना गोऱ्या पोलिसाने अडवले आणि तुम्ही काळे असाल तर तुमची खैर नाही.
१९७६ मध्ये तत्कालीन इंग्लिश कर्णधार टोनी ग्रेगने वर्णद्वेषी टोमणावजा शब्द वापरल्याने त्यावेळी इंग्लंड दौऱ्यावर आलेला वेस्ट इंडिज संघ चवताळून खेळला होता. ‘आम्ही चांगले खेळू आणि या संघाला रांगायला लावू’ (विल मेक देम ग्रोवल!) हे त्याचे उद्गार त्याच्या दक्षिण आफ्रिकी पार्श्वभूमीवर अधिकच वादग्रस्त ठरले. आफ्रिकेतील काळे गुलाम प्रामुख्याने अमेरिकेत पाठवले जात असताना त्यांना काही वेळा रांगायला लावले जाई. वर्ण-वर्गीकरण हे दक्षिण आफ्रिकेचे त्याकाळी अधिकृत धोरण असायचे. तो संदर्भ वेदनाजनक होता. ग्रेगचा तसा काही उद्देश नव्हता. तो सहजपणे बोलून गेला. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाइव्ह लॉइड आणि त्याचे सहकारी मायकेल होल्डिंग, व्हिव्हियन रिचर्ड्स इत्यादींनी मात्र हा टोमणा फारच मनावर घेतला. त्या मालिकेत इंग्लिश संघ ०-३ असा पराभूत झाला. पण त्याहीपेक्षा उल्लेखनीय म्हणजे टोनी ग्रेगवर विंडीज वेगवान गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा यथेच्छ मारा केला. अखेरीस ओव्हल मैदानावरील एका सामन्यात मैदानातील एका कोपऱ्यात एकवटलेल्या कॅरेबियन वंशाच्या प्रेक्षकांसमोर टोनी ग्रेग स्वतच रांगला आणि एक प्रकारे त्याने चुकीची कबुली दिली. त्या मालिकेनंतर इंग्लंडमध्ये मोठय़ा संख्येने स्थलांतरित म्हणून राहणाऱ्या कॅरेबियन समुदायाला नवी ओळख आणि सन्मान मिळाला. पण तो तात्पुरता होता, हे ४३ वर्षांनंतर कारबेरीने ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्यातून दिसून येते.
कारबेरीच्या वक्तव्याची दखल इंग्लिश क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) घेतली आहे. अजून खूप मजल मारायची आहे, अशी कबुलीही दिली आहे. दोन वर्षांपूर्वी ईसीबीने एक कार्यक्रम हाती घेतला, पण त्याचा लाभ प्रामुख्याने आशियाई वंशाच्या (म्हणजे गौरेतरच.. पण काळे नाही!) उदयोन्मुख क्रिकेटपटूंनाच मिळत आहे. या योजनेचा मूळ उद्देश कृष्णवर्णीय आणि आशियाई अशा सर्वच क्रिकेटपटूंच्या प्रगतीचा आहे. त्याला कृष्णवर्णीयांकडून फार प्रतिसाद मिळत नाही, ही ईसीबीची कबुली त्यांचा किमान हेतू शुद्ध असल्याचे दर्शवते. पण हे प्रयत्न अधिक व्यापक केले पाहिजेत, असे कारबेरीसारख्यांचे म्हणणे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा आयसीसीने याबाबत अनपेक्षित समंजस भूमिका घेतली आहे. निव्वळ जॉर्ज फ्लॉइडविषयी कणवेतून नव्हे, तर त्याच्यावरील अन्यायाविरोधात आंदोलन करणाऱ्यांप्रति भावनिक पाठिंबा आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी, तसेच मूक निषेध करण्यासाठी एका गुडघ्यावर बसून मान तुकवण्याचा पवित्रा घेणारे हल्ली जगभर दिसू लागलेत. असा काही प्रतीकात्मक पवित्रा एखाद्या क्रिकेटपटूने मैदानावर घेतला किंवा एखादी घोषणा कोरलेला मनगटपट्टा वा शिरपट्टा कुणी घातला तर त्याच्यावर सरसकट कारवाई केली जाणार नाहीच; उलट व्यावहारिक शहाणपण आणि भान ठेवून (कॉमन सेन्स) याविषयी निर्णय करावा, अशी सूचना आयसीसीने केलेली आहे. वास्तविक कोणत्याही प्रकारच्या राजकीय संदेशरूपी किंवा विशिष्ट संघटनेची वा राजकीय पक्षाची वा लष्करी रेजिमेंटची चिन्हे किंवा प्रतीके बॅट, शर्ट, पँट, ग्लव्हज्, बूट, हेल्मेट किंवा दर्शनी शरीरभागावर वागवण्यास आयसीसीची मनाई असते. अलीकडेच भारताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या ग्लव्हज्वर असलेल्या खंजिराच्या चिन्हाला आयसीसीने आक्षेप घेतला होता. धोनी हा भारताच्या क्षेत्रीय लष्कराच्या पॅराशुट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल आहे आणि खंजीर हे या रेजिमेंटचे बोधचिन्ह आहे. ते क्रिकेट सामन्यामध्ये वागवण्याचे वा मिरवण्याचे प्रयोजन काय, असा आक्षेप घेऊन आयसीसीने ते ग्लव्हज् धोनीला बदलायला लावले. मागे एका सामन्यात इंग्लंडचा मोईन अली ‘सेव्ह गाझा, फ्री पॅलेस्टाइन’ हे शब्द कोरलेला मनगटपट्टा लावून मैदानात उतरला. त्यावेळी सामनाधिकारी असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर डेव्हिड बून यांनी मोईनला तो पट्टा काढायला लावला. राजकीय भूमिकेला खेळात स्थान नाही, ही आयसीसीची भूमिका रास्तच. पण फ्लॉइड प्रकरणानंतर अमेरिकेतील काही संघटना, तसेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना ‘फिफा’ यांच्या पावलावर पाऊल टाकून आयसीसीने हा नियम शिथिल केला आहे. कारबेरीसारखे क्रिकेटपटू फ्लॉइड प्रकरणानंतर व्यक्त होऊ लागलेले असताना आयसीसीने योग्य ती संवेदनशीलता दाखवून त्यांना दिलेला अव्यक्त पाठिंबा प्राप्त परिस्थितीत मोलाचा ठरतो.