आशीष अशोक निनगुरकर
केंद्र सरकारच्या टपाल खात्यात नोकरी, पण आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची हौस. त्यातून डाक्युमेण्ट्री करता करता सामाजिक संस्था उभी करीत त्याद्वारे मदत करण्याची परंपरा या दिग्दर्शकाने रुजवली. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना देणाऱ्या आनंदावर आत्मशोधाचा प्रवास घडतो, हे मानणाऱ्या दिग्दर्शकाचे चिंतन…

एका सिनेमाच्या निमित्ताने चित्रीकरणाच्या जागेसाठी भटकंती सुरू असताना मराठवाड्यात जाण्याचा योग आला. तेव्हा रस्त्यावर एक विदारक चित्र दिसून आले. चार ते पाच लहान मुले व मुली डोक्यावर हंडा घेऊन अनवाणी चालताना दिसले. कडक ऊन त्यात दुपारची वेळ. हे असे दृश्य पाहून एसी कारमध्ये मला घाम फुटला. त्या मुलांशी चर्चा केल्यावर कळले की, ही मुले शाळेत जात नाहीत, कारण त्यांना काही किलोमीटरवरून रोज पाणी आणावे लागते. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ त्यातच जातो. मग शाळेत जाणार कधी? आम्ही जर पाणी आणले नाही तर घरात काहीच काम होणार नाही. हे सर्व सांगताना त्या मुलांच्या डोळ्यांमध्ये पाणी येत होते. त्यांच्या बोलण्यातून हे नक्की जाणवले की, पाणी त्यांच्यासाठी अमृत आहे आणि ते लोक पाण्याची मनोभावे पूजा करतात. पण याहून शहरातील परिस्थिती वेगळी आहे. काही दुर्गम भागांत आणि खेडेगावात लोकांना प्यायला पाणी नाही, तर शहरात काही ठिकाणी पाणी ओसंडून वाहते आहे.

Venice Biennale, Venice, paintings,
डोळ्याला डोळा भिडवून पाहणं…
Gautam buddha lokrang article, Gautam buddha samyak life lokrang article
बुद्धाचा सम्यक जीवनप्रवास
shivar lokarang article, shivar loksatta
शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…
Karmayoga, Jambu Dwaipayana,
जंबुद्वैपायनाचा कर्मयोग…
loksatta editorial on one year of women paraded naked in manipur incident
अग्रलेख: समर्थांची संशयास्पद संवेदना
chaturang, friendship, story of school friendship
सांदीत सापडलेले : मैत्री
loksatta editorial bjp bring pakistan issue in lok sabha election campaign for targeting congress
अग्रलेख : शेजार‘धर्म’!
lokrang article, book review, ajunahi jivant aahe Gandhi, Gandhi paradigm, poem on Gandhi, Kavita sangrah, ajay kandar, Hermes prakashan, loksatta lokrang, Gandhi s life,
गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे

रायगड जिल्ह्यातील काही आदिवासी वस्त्यांमध्ये फिरताना असे जाणवले की, ही मंडळी शौचालयाला जातानादेखील पाणी वापरत नाहीत, कारण त्यांचा ‘जल’ हा देव आहे. पाण्याला देव मानणारे ही मंडळी पाण्यावाचून तडफडून मरत आहेत. म्हणून या विषयावर अभ्यास सुरू असताना जर पाणी संपले तर काय होईल? किती भयानक स्थिती असेल? आता सर्व गोष्टी पाण्यावर अवलंबून आहेत. मग पाण्यावाचून जीवन कसे जगता येईल? त्यातूनच माझ्या ‘वर्तुळ’ या माहितीपटाचा जन्म झाला. आदिवासी पाड्यातील वास्तव, त्यांना भेडसावणारे प्रश्न यातून मांडण्याचा प्रयत्न मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी केला. ‘वर्तुळ’नंतर पुढे ‘कॉमा’ आणि ‘शिमगोत्सव’ सारखे माहितीपट तयार झाले.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…

गावाकडच्या लोकांची सध्या विचित्र अवस्था आहे. प्रत्येक गावात कागदोपत्री टँकर पाठवले जातेय, पण ते टँकर प्रत्यक्षदर्शी त्या गावापर्यंत पोहोचत आहे का? बरं, टँकरमधून पाण्याची ‘थेंब-थेंब’ गळती होते, याउलट दूध, पेट्रोल व डिझेल यांच्या टँकरची झाकणे कडेकोट बंद असतात. मग पाण्याच्या टँकरची ही अवस्था का? त्याबद्दल कुणी भाष्य करताना दिसत नाही. रायगड पट्ट्यातील आदिवासी पाड्यांवर जेव्हा आम्ही भेटी देत होतो; तेव्हा तेथील लोकांचे एकेक अनुभव अचंबित करणारे होते. त्यांच्यासाठी हे जीवन म्हणजे रोजचाच संघर्ष होता. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी सर्व घटनांचे तपशीलात चित्रीकरण केले. वीज नसल्याने मुलाखती घेताना कॅमेरा कित्येकदा बंद पडायचा, मग आम्ही पुन्हा तालुक्याला जाऊन बॅटरी चार्ज करून शूटिंग पूर्ण केले. त्या भागातील लोकांसाठी कायमच मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांच्या मदतीने आम्हाला ‘वर्तुळ’ हा माहितीपट तयार करता आला आणि त्यातून वास्तव परिस्थिती मांडता आली.

‘वर्तुळ’ या माहितीपटाने मला एक नवा दृष्टिकोन दिला. आमच्या जख्खड झालेल्या मनाला विचाररूपी थप्पड देण्याचे काम केले. पाण्याचा अपव्यय खूप होतोय, तेव्हा आपण हे थांबवू शकतो हा विचार करण्याची वेळ आली आहे. एक दिवस पाणीच मिळाले नाही तर काय होईल? याचे दर्शन ‘वर्तुळ’मध्ये मांडले तर त्यावरची उपाययोजना ‘एक होतं पाणी’ या चित्रपटातून मी लेखक म्हणून मांडली.

रात्रीचा दिवस करून आम्ही ‘वर्तुळ’चे चित्रीकरण केले. आदिवासी पाड्यांमध्ये फिरताना रस्ते नाहीत. पायवाटेने जावे लागायचे. जवळपास सर्वच पाड्यांवर भेटी देऊन त्यांचे दु:ख समजून घेतले. ‘दुष्काळ पाण्याचा नाही तर त्याविरुद्ध लढण्यासाठीच्या इच्छाशक्तीचा आहे!’ या माहितीपटाच्या प्रक्रियेने मला अनेक गोष्टी दिल्या. कलाकृती अनेक तयार होतात, पण या कलाकृतीने काळजात घर करून पाणी वाचवण्यासाठी एक फार मोठी शिकवण दिली आहे. ‘दृष्टिकोन’, ‘दहा मिनिटे’, ‘शॉर्टकट’, ‘द व्हाइट इटेकसी’, ‘व्यथा’ (एक सत्य) तसेच ‘घुसमट’ या लघुपटांमधून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कॅन्सर या आजाराशी संबंधित ‘आरसा’ हा लघुपट व ‘कॉमा’ हा माहितीपट बनवला. या आरोग्यवर्धक दोन्ही फिल्म्सना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण

आठ वर्षांपूर्वी शहरातील रस्त्यावर मी अनेक लहान मुलांना झेंडे विकताना पाहिले आणि आजही हे चित्र दिसते; तेव्हा मला या मुलांचे कुतूहल वाटले होते. अधिक माहिती घेतली तेव्हा कळले की, ही मुले महाराष्ट्राच्या बाहेरची आहेत आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची यंत्रणा आहे. तो मुलगा जास्त काही सांगत नव्हता. घाबरत होता. पण त्याचे डोळे मात्र खरे बोलू बघत होते. त्यालाही हे सगळं नको होतं. खरं तर ज्या वयात पाटी आणि पेन्सिल हातात असायला हवी, त्या वयात या मुलांच्या नशिबी हे दुखणे आलेय? चौदा वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा अस्तित्वात येऊनसुद्धा कितीतरी वर्षं लोटली आहेत. आजही आपल्याला लहान मुले रस्ते, हॉटेल, बसस्थानके, सिग्नल, मंदिरे, दुकाने, रेल्वे स्टेशन, टपऱ्या अशा अनेक ठिकाणी त्यांच्याच कामात व्यग्र दिसतात.

एके दिवशी चहाच्या टपरीवर एक १२-१३ वर्षांचा मुलगा दिसला. ज्याला स्वत:चे आई-वडीलदेखील माहिती नव्हते. त्यानंतर सातारा रस्त्यावरील आलिशान हॉटेलमधल्या दारुड्या वडिलांमुळे मध्यरात्री रस्त्यावरच्या वाहनांजवळ जेवण्यासाठी केविलवाणा चेहरा घेऊन उभा राहिलेला ११ वर्षांचा चिमुकला दिसला. दोन्ही प्रसंग बहुधा माझ्याकडून उत्तर मागण्यासाठीच माझ्या समोर घडले असावे. त्यामुळेच चहाच्या टपरीवरील आणि हॉटेलमधील मुलाकडे चौकशी केली असता, नवीच माहिती कळाली. त्यानंतर बालमजूर असणारी अनेक ठिकाणे पालथी घातली. काही मित्रांना एकत्रित आणत याच कथानकावर आधारित चित्रपट करण्याचे ठरविले. हा विषय ऐकून अनेकांनी विरोध दर्शविला. कुणी निर्माता तयार होईना.तरी अशा वेळी यातून मार्ग काढत त्याने बालमजुरीवर भाष्य करणारा ‘रायरंद’ हा चित्रपट तयार केला. बहुरूपी आणि बालमजुरी या विषयावर वास्तव मांडले. त्यानंतर आम्ही ‘माणुसकी’ प्रतिष्ठानची निर्मिती केली. यातूनच ठिकठिकाणाहून अनेक बालकामगारांची सुटका केली. त्यांना वाऱ्यावर न सोडता आर्थिक स्थैर्य संपन्नता असलेल्या व्यक्तींना एकत्र जोडत या मुलांची अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह शिक्षणाची व्यवस्था केली. हे सर्व बालमजूर बाहेरच्या राज्यांतून आलेले होते.

एका प्रसिद्ध मंदिराच्या बाहेर एक लहान मुलगा देवाची मूर्ती आणि फोटो विकण्याचे काम करत होता. त्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याऐवजी त्या मुलाच्या मागे गेलो. राजस्थान येथून पळून आलेला हा मुलगा महाराष्ट्रात देवाचे फोटो विकत होता. राहण्या- खाण्यासह त्याला रोज १०० रुपये मिळत होते. १० ते ११ वय असलेला या मुलाला मराठीपण येत नव्हते. पण त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून मी त्याला त्याच्या गावी पाठवले. हा मुलगा माझ्या नजरेत आला म्हणून ठीक. परंतु अशी कित्येक मुले गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य सोडून घराबाहेर पडतात. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तर काही लैंगिक अत्याचाराचे पीडित ठरतात. पण या परिस्थितीकडे आपण जोपर्यंत गांभीर्याने पाहत नाही, तोपर्यंत हा प्रश्न संपल्यात जमा होणार नाही. त्यासाठीच ही धडपड सुरू आहे. माणुसकी प्रतिष्ठानसह अनेक बालकामगारांना आम्ही मूळ प्रवाहात शिक्षणाचे महत्त्व पटवून योग्य मार्गावर आणू शकलो याचे समाधान आहे. ‘रायरंद’बरोबरच ‘वर्तुळ’ माहितीपटातून मी असे अनेक प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…

कोकणातला शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. गावागावातल्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा कशा असतात, अशा प्रश्नांची उत्तरे देणारा माहितीपट म्हणजे ‘शिमगोत्सव-प्रथा आणि परंपरा’. कोकणातील शिमगा सगळ्या नोकरदार लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा! समाजातील वाईट गोष्टी अग्निदेवतेच्या स्वाधीन करून त्या जाळून त्यांचे निर्दालन करणे हा होळी सणामागचा मूळ हेतू. सर्वसाधारणपणे आठ ते दहा दिवस हा शिमगोत्सव सर्वत्र केला जातो. गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन प्रचंड उत्साहात व भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करतात. आमच्या ‘शिमगोत्सव- प्रथा आणि परंपरा’ या माहितीपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे कोकणातील वांद्री, उक्षी व आंबेड गावात करण्यात आले. या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन मीच केले. एवढ्या गर्दीत सलग तीन ते चार दिवस चित्रीकरण करणे अवघड होते. कुठलाही रिटेक नव्हता. लोकांच्या आस्थेचा विषय होताच. सर्व गोष्टी सांभाळत आम्ही हे शूटिंग पूर्ण केले.

गेल्या चौदा वर्षांपासून मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या टपाल खात्यात नोकरी करतोय. सध्या साकिनाका पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे. नोकरी सांभाळून मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहे. योग्य वेळी केलेल्या धडपडींचे-लटपटींचे क्षण कसोटीचे होते हेच खरे; पण त्या क्षणांनीच मला बरेच काही मिळवून दिले. आयुष्याचा खरा भावार्थ मला इथूनच कळला. सुख नेमके कशात असते? हे विचाराल तर ते आपण आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांना देणाऱ्या आनंदावर असते. आनंद मिळवणे हे खूप सोपे आहे. मी माझ्या प्रत्येक कलाकृतीतून सामाजिक विषयावर गंभीरपणे व्यक्त होत असतो. केवळ लिहून किंवा बोलून मला थांबायचे नाहीये तर त्या दृष्टीने स्वत:पण अतोनात मेहनत घेत इतरांसाठी काम करायचे आहे.

माहितीपटाच्या म्हणजेच एकूणच या कलाविश्वाच्या जगात अजून खूप काही बघायचे आहे, पेरायचे आहे, वाचायचे आहे आणि वेचायचेदेखील आहे. त्यासाठी हा संघर्ष सुरूच राहणार आहे…

अभिनय, चित्रपटलेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन अशा जबाबदाऱ्या. सामाजिक माहितीपट आणि लघुपटांचा चित्रपट महोत्सवांमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव. एकूण सात पुस्तके प्रकाशित.

ashishningurkar@gmail.com