‘लोकरंग’ (३१ मार्च)मधील माधव गाडगीळ यांचा ‘चिपको… हिमालयापासून केरळपर्यंत’ हा लेख नागरिकांना जोगोजागी अशाच चिपकोसारखी चळवळ उभी राहावी यासाठी उद्युक्त करतो. निसर्गचक्र हळूहळू लोप पावत आहे. कधी हिवाळा, कधी उन्हाळा तर कधीही पाऊस बरसत आहे. नद्यांचे पूर, भूस्खलन, वणवे, दुष्काळ आता नेहमीचेच झाले आहेत. त्यात सामान्य शेतकरी, आदिवासी, मागास समाज होरपळत आहेत. याचाच अप्रत्यक्ष संबंध बेरोजगारीशीही आहेच. पण ‘सबका’ विकासाचे गुटगुटीत स्वप्न साकार झालेले चमचमीत रस्ते, बुलेट ट्रेन्स, विमानतळे, विनाशकारी प्रकल्प, इ.. पूर्ण झाल्याचे समाधान ‘जागतिक तापमानवाढ’ हे मिथ समजणाऱ्या जगातल्या सर्वच सरकारांना आहे. कारण ‘निवडणुका जिंकणं’ एवढाच काय तो उद्देश समोर ठेवणारी सरकारं सत्तेसाठी काही दिवसांपूर्वी भयंकर आरोप केलेल्या पक्षाशी आपली घट्ट नैसर्गिक मैत्री करू शकतात, तर निसर्ग-पर्यावरणासारख्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या अस्तित्वाला मगरमिठी मारून नष्ट करणे त्यांच्यासाठी काय अवघड? निवडणुकांसाठी सामोरे जाणाऱ्या युवा नागरिकांना OTT, IPL, दिड GB डाटा, बाजारू राजकारण, धर्म-जातींसारख्या असंख्य गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलेले असताना पर्यावरण हा तसा दुय्यमाहून दुय्यम मुद्दा! आणि कुठल्याही सरकारला जे हवं तेच म्हणजे- विचार करणाऱ्या नागरिकांना जाळ्यात अडकवून ठेवण्याचं महा-मस्त्यकाम सहजगत्या होत असतं.

वाढते तापमान आणि बदलता निसर्ग हे समोरच्या काहीच वर्षांत विश्वाला पछाडून सोडणारे भयाण संकट असेल. आणि त्याच्याशी लढण्यासाठी सुजाण नागरिकांनी नाका-तोंडात पाणी जाईस्तोवर वाट पाहायची नसते. जगभरातील सर्वसमावेशकतेला पाठिंबा देणारे वैज्ञानिक विचारवंतच येणाऱ्या काळात सामान्य नागरिकांसाठी दिशा देणारे ठरू शकतात. नागरिकांनी त्यांच्या विचारांची वाट धरायला हवी. जात-धर्म या संकुचित मुद्द्यासाठी लढणारे नेते लवकर मोठे होतात, पण मानव जातीसहित सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाच्या असलेल्या पर्यावरणासारख्या सर्वसमावेशक मुद्द्यासाठी लढाणाऱ्या नि:स्वार्थ वैज्ञानिक विचारवंतांना पाठिंबा देणे ही येणाऱ्या काळाची गरज असेल! त्यासाठी नागरिकांना सर्व बाबतीत सुजाण व्हावे लागेल, कारण लोकशाही व्यवस्था नेहमीच जागरूक आणि सुजाण नागरिकांमुळेच समृद्ध होतं असते, हे चिपको आंदोलनाच्या अग्रणी नेत्यांकडे पाहून आपण समजू शकतो. आपल्यासहित समोर येणाऱ्या पिढ्या संकटात असताना लोकप्रतिनिधीकडे केलेली पर्यावरण संरक्षणाची मागणी रास्त असेल. कारण लोकांना जे हवं असतं तेच सरकारी अजेंडे असतात हा इतिहास आहे. पण त्यासाठी नागरिकांनी तशी मागणी करायला हवीय. उद्या भारत नावाच्या देशातल्या नागरिकांना पर्यावरण हा मुद्दा धर्माएवढा किंवा जातीपेक्षाही कट्टर महत्त्वाचा वाटला तरच अनेक राजकीय पक्षही आम्हीच कसे कट्टर पर्यावारणवादी म्हणून आक्रमक झाले तर आश्चर्य वाटू नये. -करणकुमार गीता जयवंत पोले

lokrang article, book review, ajunahi jivant aahe Gandhi, Gandhi paradigm, poem on Gandhi, Kavita sangrah, ajay kandar, Hermes prakashan, loksatta lokrang, Gandhi s life,
गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे
shivar lokarang article, shivar loksatta
शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…
documentary review A Journey of Self-Discovery
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आत्मशोधाचा प्रवास…
Venice Biennale, Venice, paintings,
डोळ्याला डोळा भिडवून पाहणं…
Karmayoga, Jambu Dwaipayana,
जंबुद्वैपायनाचा कर्मयोग…
Gautam buddha lokrang article, Gautam buddha samyak life lokrang article
बुद्धाचा सम्यक जीवनप्रवास
loksatta editorial on one year of women paraded naked in manipur incident
अग्रलेख: समर्थांची संशयास्पद संवेदना
Hate speech by pm Modi
लालकिल्ला : भाजपची भाषा बदलू लागली!

निसर्ग जितका कोमल तितकाच क्रूर

‘लोकरंग’ (२१ एप्रिल) मध्ये ‘चारशे कोटी विसरभोळे’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख निसर्गाला कळीचे फूल करता येते, पण काट्याचे फूल करण्याची किमया फक्त मानवात आहे हे पटवून देणारा होता. ‘साधा निसर्गाचा समतोल, नका करू प्राणी हत्या आणि वृक्षतोड’ हा पर्यावरणाच्या अंतरीचा कळवळा व्यक्त करण्यासाठी एक छोटीशी ‘ग्रेटा’ नावाची मुलगी जागतिक हवामान परिषदेमध्ये जमलेल्या सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर येऊन उभी राहते आणि विचारते, ‘आम्ही लहान मुलांनी कोणता गुन्हा केला आहे की तुमच्या बालपणी तुम्हाला मिळालेली शुद्ध हवा आम्हाला का मिळू नये?’ काही क्षण सर्व स्तब्ध झाले. गेल्या आठवड्यात दुबईमध्ये पर्जन्यवृष्टीने घातलेला धुमाकूळ व झालेली अपरिमित हानी, मुंबई तसेच इतर भागात वाढत असलेले उष्माघाताचे प्रमाण म्हणजे जीवसृष्टीचे होऊ घातलेले उच्चाटन होय. ‘निसर्ग हे परमेश्वराचे प्रक्षेपण केंद्र आहे, तेथून प्रक्षेपित केलेल्या ध्वनीलहरी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत.’ हा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा संदेश किंवा ‘निसर्गावर हुकमत गाजवायची असेल तर त्याच्या नियमांचे पालन करा’ हा एफ. बेकॉन यांचा संदेश आपण आत्मसात केला पाहिजे; अन्यथा निसर्ग जितका कोमल आहे तितकाच क्रूर आहे याची प्रचीती मानवाला वेळोवेळी येत राहील. -सूर्यकांत भोसले

ही एक सामूहिक जबाबदारी

‘लोकरंग’ (२१ एप्रिल) मध्ये ‘चारशे कोटी विसरभोळे’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. एकूणच प्राणिमात्रांच्या तुलनेत मानवप्राण्यांत विचार करण्याची अनन्यसाधारण अशी निसर्गदत्त शक्ती – क्षमता आहे हे मानवजातीचे एक वेगळे वैशिष्ट्य असले तरीही काहीही केल्या विचार करण्यास तयार नसणे, हेदेखील या मानवप्राण्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) या जागतिक हवामानबदलाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने गेली तीन दशके तापमान वाढीच्या अभ्यासाद्वारे अनेक निरिक्षणे नोंदवून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाद्वारे तापमानवाढीचा (ग्लोबल वार्मिंग) निर्वाणीचा इशारा जगाला आणि धोरणकर्त्यांना देण्यात आला आहे.

आपल्या सूर्यमालेतील अनेक ग्रहांपैकी फक्त आपल्या पृथ्वीवर विविधतेने नटलेले समृद्ध व पूर्णविकसित वनस्पती व प्राणी जीवन अस्तित्वात आहे असे अभिमानाने म्हटले जाते. कारण जीवसजीवांना राहण्यासाठी पोषक अशी जैविक पार्श्वभूमी आजतरी फक्त पृथ्वीवरच अस्तित्वात आहे. तथापि मागील काही शतकातील मानवाचा पर्यावरणातील अनिर्बंध हस्तक्षेप पृथ्वीवरील तापमान वाढीवर झाला आहे. सुमारे २७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९२ साली विज्ञान क्षेत्रातील अनेक नोबेल पारितोषिक विजेते व युनियन ऑफ कन्सर्न्ड सायंटिस्ट यांनी संयुक्तरित्या मानवाला उद्देशून एक पत्र लिहिले की, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर अतिशय गंभीर परिणाम होत असून, हवामानबदल, तापमानात वाढ व जैवविविधता धोक्यात आली आहे. स्थानिक ते जागतिक अशा सर्वच धोरणकर्त्यांनी यातून योग्य तो बोध घेऊन पर्यावरण रक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात. तर २०१७ मध्ये जगभरातील तब्बल पंधरा हजार शास्त्रज्ञांनी, आपण पृथ्वीच्या सहनशक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडून जलद गतीने विनाशाकडे मार्गक्रमण करीत आहोत, असे मत नोंदवले आहे.

मानवाचे पृथ्वीवरील भवितव्य अथवा अस्तित्व अवलंबून असल्याच्या ज्या काही नऊ मर्यादा आहेत, त्यापैकी तीन मर्यादा तर आपण २००९ सालीच ओलांडल्या आहेत. हवेतील कर्ब उत्सर्जन वाढीमुळे पृथ्वीचे हरितछत्र व वातावरणातील ओझोनछत्र विरळ होत आहे, त्यामुळे तापमानात वाढ होत आहे आणि ती अशीच होत राहिली तर लवकरच पृथ्वी हा शुक्र ग्रहासारखा उष्ण ग्रह होऊन पृथ्वीवरील तापमान वाढीची परिणती अखेर पृथ्वीवरील जीवसृष्टी कायमची नष्ट होण्यात होईल. रामदास स्वामी यांनी आपल्या दासबोध ग्रंथात ‘स्वत: फांदीच्या शेंड्यावर बसून बुडाकडील फांदी तोडणाऱ्या आत्ममग्न इसमाची संभावना ‘ऐतिहासिक मूर्ख’ अशी केली आहेच.

मध्यंतरी वर्ल्ड – वाइड फंड फॉर नेचरचा ‘लिव्हिंग प्लॅनेट’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, यात मानवाचा तथाकथित प्रगतीचा एकूणच हव्यास पर्यावरणाच्या – प्राणिमात्रांच्या – जैवविविधतेच्या कसा मुळावर आला आहे याचे भयानक वास्तव सप्रमाण मांडले आहे. जैवविविधता ही पर्यावरण संतुलनाची मुख्य निकड आहे. मानव आपल्या तथाकथित विकासाच्या आहारी गेल्याने जागतिक तापमान वाढून नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आल्या आहेत. ग्लोबल वार्मिंग या घटकामुळे शेतीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो आहे यावर जगभरातील सर्वच शास्त्रज्ञांचे आता एकमत झाले आहे. पर्यावरण जतन, रक्षण आणि संवर्धन हा केवळ पर्यावरणवाद्यांचा लढा नसून ही एक सामूहिक जबाबदारी आहे.-बाळकृष्ण शिंदे, पुणे</strong>

कडक उन्हाळ्यात थंड हवेची झुळूक

‘लोकरंग’मधील (२८ एप्रिल) ‘चेरीचा बहर आणि कवी!’ हा विजय पाडळकर यांचा लेख वाचला. हा लेख म्हणजे कडक उन्हाळ्यात थंड वाऱ्याची झुळूक! जपानमध्ये साधारण वसंत ऋतूच्या दरम्यान चेरीला बहर येतो. तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्याची वर्णने, तिकडच्या कवींनी लिहिलेल्या कविता, हायकू सारे काही आनंददायक! आपल्याकडे मात्र वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूलही लागत नाही, कारण झाडांचे जंगल कमी होत असून सिमेंटचे जंगल वाढत आहे. -प्र. मु. काळे, सातपूर, नाशिक

मोलाची माहिती

‘लोकरंग’मधील (१४ एप्रिल) ‘बालमैफल’मध्ये प्राची मोकाशी यांची ‘क्रांतीचे प्रतीक’ ही गोष्ट वाचली. या गोष्टीतल्या रिया हिने भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्या शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेत या महामानवाविषयी दिलेली माहिती केवळ लहानग्यांनासाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही मोलाची आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचा मानवतावादी लढा सर्वज्ञात आहेच; परंतु या गोष्टीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी, त्यांच्या वाचनप्रेमाविषयी, त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जी माहिती देण्यात आली आहे ती वाचून माझा आंबेडकरांबद्दलचा आदर आणखीन दुणावला.

प्रतिकूल परिस्थितींचा सामना करून त्यांनी मिळविलेले शिक्षण, अनेक क्षेत्रांत असणारे त्यांचे प्रगाढ ज्ञान, त्यांच्यात भारताच्या जडणघडणीसाठी असणारी तळमळ या कथेतून सहजपणे अधोरेखित झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून शिकण्यासारखे खूप काही आहे आणि त्यासाठी प्रत्येक माणसाने आंबेडकरांचे चरित्र, साहित्य वाचून ते समजून त्यांची तत्त्वे जर अंगीकारली; तर आपला भारत देश विकसनशील न राहता एक विकसित राष्ट्र म्हणून नक्कीच नावारूपाला येऊ शकेल. -डॉ. प्रमोद आनंदा कांबळे