मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

समकालीनांपेक्षा आगळ्या शैलीतील गायक मन्ना डे यांचीे येत्या १ मे रोजी जन्मशताब्दी होत आहे. त्यानिमित्ते..

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?

१ मे हा मन्ना डे यांचा जन्मदिन आपणा सर्वाच्या सहज लक्षात राहण्यासारखा आहे. याचं कारण जवळजवळ सर्व जगासाठी हा सुट्टीचा दिवस असतो. पण त्यांचं जन्मवर्ष १९१९ की १९२० याबद्दल मात्र त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे चाहते यांच्यात एकमत नाही. ते काहीही असो, पण लवकरच येणाऱ्या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आणि दुसरं म्हणजे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने मन्ना डे नावाच्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका महान गायकाला दिलेली ही मानवंदना होय. यापुढे मन्ना डे यांचा उल्लेख ‘मन्नादा’ असा करणार आहे. (त्यांचं मूळ नाव प्रबोधचंद्र असं होतं. पण त्यांचे सुप्रसिद्ध गायक काका के. सी. डे यांनी प्रेमाने त्यांचं नामकरण ‘मन्ना’ केलं आणि सचिनदा, हेमंतदा आणि सलीलदा यांसारखंच ते ‘मन्नादा’ असं यथावकाश झालं.)

मन्नादा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुरेल दंतकथा आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आपल्या जवळजवळ ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत मन्नादांनी ३५०० हून जास्त गाणी गायली असणार. त्यात हिंदी आणि बंगाली गीतं प्रामुख्यानं असली तरी त्यांनी इतर अनेक भारतीय भाषांमधली फिल्मी आणि गैरफिल्मी गाणीसुद्धा गायली आहेत. मन्नादांनी आपल्या भावमधुर गाण्यांनी जवळजवळ पाच दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. तीन पिढय़ा त्यांच्या गायनावर पोसल्या गेल्या. त्यांच्या महानतेबद्दल बोलायचं झालं तर पाश्र्वगायक म्हणून ते जितके परिपूर्ण होते, तितकेच ते अष्टपैलूदेखील होते. स्वत:चा आवाज हीच त्यांची पेहचान होती. त्या काळच्या प्रमुख पाश्र्वगायकांपैकी किशोरदा प्रामुख्याने देव आनंद आणि नंतर राजेश खन्नासाठी गायले. रफीसाहेब दिलीपकुमार, देव आनंद, गुरूदत्त आणि शम्मी कपूर यांच्यासाठी प्रामुख्याने गायले. मुकेश हा राज कपूरचा गाता आवाज म्हणून ओळखला जायचा. ‘दिल का हाल सुने दिलवाला’ (‘श्री ४२०’- १९५५), ‘ये रात भिगी भिगी’ (‘चोरी चोरी’- १९५६), ‘ए भाय जर देख के चलो’ (‘मेरा नाम जोकर’- १९७०) अशा काही  गीतांसाठी मन्नादांनी राज कपूरला उसना आवाज दिला खरा; पण ते कधीही राज कपूर किंवा अन्य कोणत्याही हिरोच्या नावाबरोबर जोडले गेले नाहीत. बंगाली चित्रपटांत त्यांनी उत्तमकुमारसाठी अनेक गाणी गायली आणि सौमित्र चॅटर्जीचा गाता आवाज म्हणूनही ते ओळखले जायचे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बलराज सहानी (‘तू प्यार का सागर है’- सीमा, १९५५), प्राण (‘यारी है ईमान मेरा’- जंजीर, १९७३) या चरित्र अभिनेत्यांनाही त्यांनी उसना आवाज दिला आहे. इतकंच नव्हे तर जॉनी वॉकर (‘किसने चिलमन से मारा’- बात एक रात की, १९६२) आणि मेहमूद (‘बनाओ बतिया हटो काहे को झूटी’- मंझिल, १९६०) या विनोदवीरांसाठीही त्यांनी पाश्र्वगायन केलं आहे. यावरून त्यांच्या आवाजाचा पल्ला आणि गायक म्हणून असलेलं अष्टपैलुत्व या गुणांचा प्रत्यय येतो. मन्नादांचा पैस फार मोठा होता. वेगवेगळ्या शैलींतली आणि भिन्न मूड्सची हजारो गाणी त्यांच्या नावावर आहेत. सिनेसंगीतातील असा एकही प्रकार नाही, की जो मन्नादांनी गायला नसेल. वानगीदाखल खालील प्रातिनिधिक स्वरूपाची मन्नादांनी गायलेली १६ गाणी महत्त्वाच्या तपशिलांसह देत आहे. ही गाणी मन्नादांचं आणि त्यांच्या गायकीचं वैविध्य आणि अष्टपैलुत्व निश्चितच अधोरेखित करतील. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही गाणी त्यांनी नुसती गायली नसून गाण्याच्या त्या- त्या प्रकारातील सर्व बारकावेदेखील त्यांनी आपल्या गाण्यात आणले आहेत..

१) ‘केतकी गुलाब जुही’-  बसंत बहार, १९५६/ शंकर-जयकिशन/ राग बसंत बहारवर आधारित गीत.

२) ‘तू प्यार का सागर है’- सीमा, १९५५/ शंकर-जयकिशन/ एक उदात्त प्रार्थनागीत.

३) ‘लागा चुनरी में दाग’- दिल ही तो है, १९६३/ रोशन/ राग भैरवी ठुमरी.

४) ‘ना तो कारवां की तलाश है’- बरसात की रात, १९६०/ रोशन/ राग खमाजवर आधारित एक अप्रतिम कव्वाली.

५) ‘चली राधे रानी’- परिणिता, १९५३/ रचना- मन्ना डे/ एक बंगाली लोकगीत.

६) ‘एक चतुर नार’/ पडोसन, १९६३/ आर. डी. बर्मन/ कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतावर आधारित एक विडंबनगीत.

७) ‘भगत के मन में बसे हे राम’- शबाब, १९५८/ नौशाद/ एक भजन.

८) ‘ये रात भिगी भिगी’- चोरी चोरी, १९५६/  शंकर-जयकिशन / लता मंगेशकरबरोबरचं एक प्रणय द्वंदगीत.

९) ‘आओ ट्विस्ट करे’- भूतबंगला, १९६५/ आर. डी. बर्मन/ पाश्चात्त्य पॉप गीत.

१०) ‘चलत मुसाफिर मोह लिया रे’- तिसरी कसम, १९६६/ शंकर-जयकिशन / एक उत्तर भारतीय लोकगीत.

११) ‘ए मेरे प्यारे वतन’- काबुलीवाला, १९६१/ सलील चौधरी/ अफगाण लोकसंगीतावर आधारलेले गीत.

१२) ‘आमी ते जल साधरे’/ ‘अँथनी फिरिंगी’, १९६७/ अनिल बागची / बंगाली चित्रपटगीत.

१३) ‘मनसा माईने वारू’-  प्रसिद्ध मल्याळी चित्रपट ‘चेमीन’, १९६५/ सलील चौधरी.

१४) ‘घनश्याम सुंदरा’- ‘अमर भूपाळी’ (व्ही. शांताराम यांचा मराठी आणि बंगालीतील एक चित्रपट. मराठी लोकसंगीतावर आधारलेले लता मंगेशकर यांच्याबरोबर गायलेले गीत/ वसंत देसाई.

१५) ‘लपक झपक तू आरे बदरवा’-  बूटपॉलिश, १९५८/ शंकर-जयकिशन / राग आडानावर आधारलेले एक विडंबनगीत.

१६) ‘पूछो ना कैसे मैंने रैन बिताई’- मेरी सूरत, तेरी ऑंखें, १९७२/ एस. डी. बर्मन/ अहिर भैरव रागावर आधारित एक भावपूर्ण विरहगीत.

एक लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट.. ‘आओ ट्विस्ट करे’ आणि ‘पूछो ना कैसे’ ही दोन अतिशय भिन्न शैलींतील, वेगळ्या सांस्कृतिक पर्यावरणातली, खरं तर दोन टोकांची गाणी मन्नादा विलक्षण सहजतेने गातात. ‘पूछो ना कैसे’ हे ‘मेरी सूरत, तेरी आंखे’मधलं एक अजरामर गीत. या गाण्यातलं दर्दमधुर एकांतपण मन्नादा उत्कटपणे व्यक्त करतात. अहिर भैरव रागाचं सौंदर्य मुलायम, धिम्या स्वरात मांडतात. आणि हाच माणूस ‘आओ ट्विस्ट करे’ची नटखट मस्तीही तितक्याच समर्थपणे व्यक्त करतो. एकीकडे अभिजात रागदारी संगीतातला भारदस्तपणा, तर दुसरीकडे पाश्चात्त्य पॉप सुरावटीतला जोशपूर्ण उन्माद.. याला म्हणतात मन्नादा!

मन्नादांच्या साठेक वर्षांच्या कारकीर्दीत दोन विचित्र, पण तितक्याच मजेशीर घटना घडल्या. यातील पहिली घटना १९५६ सालच्या ‘बसंत बहार’ या सिनेमाशी संबंधित आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या सिनेमातली पंडित भीमसेन जोशी आणि मन्नादांची बरीच गाजलेली जुगलबंदी आठवत असेल. (यात या दोघांनी बसंत बहार या रागावर आधारित ‘केतकी गुलाब जुही चंपक बन फुले’ हे गीत गायलं आहे.) आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीस मन्नादांनी या जुगलबंदीसाठी चित्रपट निर्मात्यांना आपला नकार कळवला होता. माझ्या दृष्टीने या त्यांच्या नकाराची दोन कारणं असावीत. एक म्हणजे त्यांना पंडितजींबद्दल असलेला नितांत आदर. आणि दुसरं म्हणजे किराणा घराण्याच्या या दिग्गजापुढे आपण कमी पडू ही भीती. पण शेवटी या दिव्यासाठी मन्नादा तयार झाले आणि काही आठवडय़ांच्या अथक रियाज आणि मेहनतीनंतर हे गाणं एकदाचं रेकॉर्ड झालं. गाणं सर्वाच्या अपेक्षेबाहेर उत्तम  झालं. इतकं, की खुद्द पंडितजींनीदेखील मन्नादांचं भरभरून कौतुक केलं. पण गमतीची गोष्ट म्हणजे या जुगलबंदीत मन्नादा पंडितजींना हरवतात. (वाचकांचा गैरसमज होऊ नये म्हणून एक स्पष्टीकरण : मन्नादांनी ज्याला प्लेबॅक दिला त्या ‘गोपाळ’ या चित्रपटाच्या हिरोची भूमिका करणारा भारतभूषण जिंकतो; पण पंडितजींनी ज्याला प्लेबॅक दिला तो राजगायकाची भूमिका करणारा अज्ञात नट हरतो.) जाता जाता.. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजा नवाथे आणि संगीत दिग्दर्शक होते शंकर-जयकिशन.

याउलट, १९६३ मधील ‘पडोसन’ या सिनेमातल्या एका गाण्याच्या चढाओढीत मन्नादा हरतात आणि किशोरदा (किशोरकुमार) जिंकतात. ‘एक चतुर नार’ हे ते प्रसिद्ध गाणं. मास्टरजींची भूमिका करणाऱ्या मेहमूद या तुफानी विनोदवीरास उसना आवाज दिला होता मन्नादांनी आणि भोला या रांगडय़ा हिरोची भूमिका करणाऱ्या सुनील दत्तला किशोरदांनी.

हिंदी चित्रपट संगीत जगतात रफीसाहेब आणि मन्नादा ही एक आगळीवेगळी जोडी होती. बरीचशी अगोदरच्या दशकांमधील पंकज मलिक आणि कुंदनलाल सैगल या जोडीसारखी. दोघांनी पन्नासेक गाणी एकत्र गायली. पण दोघेही आपापल्या ठिकाणी अत्यंत सुरक्षित असल्यामुळे  प्रतिस्पर्धी कधीच बनले नाहीत. उलटपक्षी, ते एकमेकांचे चाहते असून त्यांना एकमेकांविषयी कौतुकयुक्त आदर होता. मन्नादा नेहमी म्हणत असत की, ‘रफी माझ्याहून सरस गायक आहे.’ आणि रफी म्हणत असत- ‘लोक माझी गाणी ऐकतात, पण मी मन्नादांची गाणी ऐकतो.’

ज्या दिवशी रेकॉर्डिग नसायचं त्या दिवशी बऱ्याचदा हे दोघे पतंगबाजी करायचे आणि त्यात मन्नादा नेहमीच रफीसाहेबांची पतंग काटायचे. हे असं कसं होतं, असं रफीसाहेबांनी एकदा बोलून दाखवलं. यावर मन्नादांची प्रतिक्रिया अशी- ‘रफीसाहेब, तुम्ही माझ्यापेक्षा चांगले गायक असाल, पण मी तुमच्यापेक्षा सरस पतंगबाज आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल.’

एच. एम. व्ही.ने १९७३ साली एक अल्बम प्रकाशित केला होता. यात मन्नादांनी प्रख्यात हिंदी कवी हरिवंशराय बच्चन लिखित ‘मधुशाला’ या महाकाव्यस्वरूप कवितेचा एक भाग असलेल्या २० रूबाया गायल्या आहेत. ‘मधुशाला’ हे दीर्घकाव्य रूपकात्मक असून आधुनिक हिंदी कवितेतील ‘छायावादी’ प्रवाहाचे ते एक उत्तम उदाहरण आहे. त्यावर सुफी कवितेचाही प्रभाव आहे. या रूबायांना हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जयदेव यांनी फार सुंदर चाली लावल्या आहेत. मन्नादांच्या अष्टपैलुत्वाशी परिचित असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनाही ही गीते ऐकून सुखद धक्का बसला असणार. या अल्बममुळे मन्नादांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच बाजू प्रकाशात आली आणि ती म्हणजे मन्नादांनी हरिवंशराय बच्चन यांच्यासारख्या मंचकवीच्या काव्याबद्दल दाखवलेली तरल संवेदनशीलता. दुर्दैवाने मन्नादांना सुमनांजली वाहताना हा पैलू दुर्लक्षित तरी राहिला आहे किंवा त्याचा नुसता पुसटसा उल्लेख केला जातो. मन्नादा यांचं व्हावं तेवढं चीज झालं नाही असं मानणारा एक फार मोठा वर्ग आहे. सिनेमाप्रेमी, हिंदी चित्रपट गीतांवर नियमित लिहिणारी मंडळी, समीक्षक असे पुष्कळ जण असं मत वारंवार मांडत आले आहेत. हे खरं किती? की ही नुसती लोकप्रिय समजूत मानायची? कुणी अधिकारी व्यक्तीनं या विषयावर लिहिलं पाहिजे. मन्नादा हा माणूस प्रेम करावा असा. अगदी लव्हेबल. शिवाय बराचसा रफीसाहेबांसारखा अजातशत्रू. तरीही हिंदी चित्रपटांत मन्नादा हे संगीतकारांची प्रथम पसंती कधीच नव्हते. यातलं खरं काय, यावर लिहिलं गेलं पाहिजे.

शब्दांकन : आनंद थत्ते