१९२८ साली बाबासाहेब खेर यांनी ‘दि खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन’ (केस्वा) या संस्थेचे बीज रोवले. गेल्या सुमारे दोन दशकांत या संस्थेचा ‘युवा परिवर्तन’ या उपक्रमाद्वारे कार्यविस्तार झाला. गोंधळलेल्या, भविष्याबद्दल अनिश्चितता असलेल्या युवापिढीच्या हाताला काम आणि त्यांना जगण्याचे बळ देणारी ही संस्था. यंदा तिच्या कार्याची द्विदशकपूर्ती व ‘केस्वा’ला ९० वर्षे पूर्ण होणे, असा योग जुळून आला आहे. त्याचेच औचित्य साधून ‘प्रकाशाचे बेट’ हे अनुराधा गोरे यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ‘युवा परिवर्तन’मुळे अंध:काराकडून प्रकाशाच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्यांची कहाणी हे पुस्तक सांगते.

अनेकदा अल्पवयीनच नव्हे, तर वयात आलेल्या मुला-मुलींचा मार्ग भरकटतो. त्यांना योग्य दिशा मिळत नाही. मात्र युवा परिवर्तनसारखी संस्था त्यांच्या मदतीला येते आणि त्यांना मार्ग दिसू लागतो. अन् ते योग्य दिशेने आपले जीवन घडवितात. मात्र यासाठी आवश्यकता असते ती समुपदेशनाची. केस्वा हे अशा समुपदेशनाचे केंद्र आहे. त्या केंद्राविषयी आणि युवा परिवर्तनच्या कामाविषयी, ही संस्था चालविणाऱ्या किशोर आणि मृणालिनी खेर या दाम्पत्याच्या कार्याविषयी हे पुस्तक माहिती देते. पुस्तकाच्या उर्वरित भागात परिवर्तन झालेल्या मुलांविषयी वाचायला मिळते.

बंटीची कहाणी ही त्यापैकीच एक. शाळेत असतानाच वाईट सवयींच्या आहारी गेलेला बंटी चोरी आणि अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या एका टोळीच्या फासात अडकला. त्यालाही त्या वस्तूंची चटक लागली आणि तो त्यांच्या आहारी गेला. व्यसन सोडविण्यासाठी त्याला आई-वडिलांनी ‘युवा परिवर्तन’कडे आणले, आणि तो या सवयींतून बाहेर पडला.. हसनची कहाणीही तशीच. अंधश्रद्धेने भरकटलेल्या हसनला वडिलांनी या समुपदेशन केंद्रात आणले आणि काही काळातच हसनमध्ये सुधारणा झाली.. रवीही असाच सुधारला. अभ्यासात मागे असलेला रवी आणि त्याचे वडील यांच्यातील नाते दुरावत गेले आणि रवीने अभ्यास करणेच सोडून दिला. मात्र समुपदेशनाच्या माध्यमातून रवीला पुन्हा अभ्यासाकडे वळविण्यात केंद्राला यश आले आणि रवी मार्गी लागला.. गणेशला घरची आर्थिक ओढाताण पाहावत नव्हती. त्याला नेमके काय काम करावे हे कळत नव्हते. केंद्राने त्याला अभ्यासाबरोबरच त्याची नर्सिगची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. अन् आज त्याने स्वत:चा नर्सिग ब्युरो सुरू केला आहे.. प्रवीणची कहाणीही अशीच काहीशी. घरातल्या आर्थिक ओढगस्तीमुळे मनातल्या मनात घुसमटणाऱ्या प्रवीणला केंद्राची मदत मिळाली आणि तो आज संगणकाद्वारे मिळणारी कामे करून स्वतंत्र झालाय. घराला हातभार लावतोय..

आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच वाईट संगतीला लागून भरकटलेली ही मुले. शिक्षणापासून, कुटुंबापासून दुरावलेली. या भणंगतेतून त्यांना बाहेर काढून पुन्हा एकदा मार्गावर आणण्याचे, मुख्य प्रवाहाला जोडण्याचे काम ‘युवा परिवर्तन’ करत आहे. त्यांचे हे कार्य व त्यात त्यांना आलेले यश जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.

‘प्रकाशाचे बेट’- अनुराधा गोरे,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे- १२१, मूल्य- २०० रुपये.