‘कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे निधन..’ वर्ष संपता संपता अशी काही बातमी कानावर येईल अशी कल्पनाच नव्हती. पण बुधवारच्या सकाळी घरात बसलो असताना अचानक फोन खणखणला आणि ही बातमी कळली. तेव्हापासून मन भूतकाळात खेचलं गेलंय. भूतकाळात म्हणजे पार सहा दशकं मागे! पाडगांवकर आणि माझ्या ओळखीला तेवढी र्वष उलटून गेलीत, हे नवलदेखील त्याचवेळी जाणवलं. त्यांची भेट अगदी काल-परवाच झाली असंच वाटतंय.
साधारण १९५०-५५ चा हा काळ. मराठी भावगीतांसाठी खूपच समृद्ध असा काळ म्हणावा लागेल. एकाच वेळी वेगवेगळ्या पठडीचे संगीतकार, कवी, गीतकार मराठी संगीताचे दालन एकापेक्षा एक अशा अनमोल शिल्पांनी या काळात फुलवीत होते. याच सुमारास भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये पदवी मिळवून मी आकाशवाणीत संगीत विभागात नोकरीला लागलो होतो. वास्तविक भौतिकशास्त्राचा आणि या सुरांच्या जगाचा एकमेकांशी दूरान्वयेही संबंध नव्हता. पण मी संगीताकडे कधी ओढला गेलो, हे माझं मलाच कळलं नव्हतं. आकाशवाणीतला तो संगीत विभाग मला खूप आवडत होता, हे नक्की!
या संगीत विभागात ‘भावसरगम’ वगैरे कार्यक्रमांद्वारे मराठी भावगीतं आम्ही तयार करत असू. त्यात दर आठवडय़ाला एक नवीन गीत लोकांच्या कानी जात होतं. याच विभागात आम्ही काही संगीतिकाही तयार करत असू. तोपर्यंत मी मंगेश पाडगांवकर हे नाव ऐकलं नव्हतं. त्यावेळी ते चर्चगेटजवळ ‘युसीस’मध्ये काम करत होते. मला वाटतं, रमेश मंत्री आणि जयवंत दळवी हेदेखील तिथेच कामाला होते.
..तर एक दिवस मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेली ‘राधा’ नावाची संगीतिका माझ्या हाती आली. ही संगीतिका वाचल्यावर त्यातील काव्य खूपच सुलभ आणि माझ्या प्रकृतीशी मिळतंजुळतं आहे, हे माझ्या लक्षात आलं. कवी वा गीतकार आणि संगीतकार यांचा संबंध सुरांच्या तलम आणि हळुवार लाटांवरचा असतो. सूर घेऊनच शब्द येतात असं मला वाटतं. पाडगांवकरांचे शब्द नेमके तसेच होते. आणि मला तेच भावलं. त्यांचं पहिलं संगीतबद्ध केलेलं गाणं म्हणजे ‘दूर आर्त सांज कुणी..’ मला वाटतं, मधुबाला चावला हिने ते गायलं होतं.
या संगीत विभागात काम करताना पाडगांवकरांची तब्बल ५२-५५ गीतं मी स्वरबद्ध केली. ही सगळीच गाणी अत्यंत सोप्या शब्दांतली आणि तरीही प्रचंड प्रभावी होती. त्यांच्या काव्याने मला सोपी चाल, अवघड चाल, किचकट चाल आणि शब्दांमागोमाग आपसूकच येणारी चाल अशा विविध चालींची अनुभूती दिली. गाण्याला चाल लावणं हे बोलण्याच्या ढंगाप्रमाणेच झालं पाहिजे. म्हणजे बोलताना आपण एखाद्या शब्दावर थांबत असू, तर त्या चालीतही ते थांबणं आलं पाहिजे, हे पाडगांवकरांच्या कवितेबाबत सहज शक्य होतं. पाडगांवकरांच्या कवितेचं मोठेपण म्हणजे त्या कवितेचा अन्वयार्थ वेगळा काढावा लागत नाही. तो शब्दांमागोमागच येतो. त्यांना त्यांचं कवीपण सिद्ध करण्यासाठी काहीही खटाटोप करावे लागले नाहीत. त्यांच्या कवितेतील सोपेपणामुळेच ते ‘कविवर्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
आज पाडगांवकर आणि मी आमच्या या कवी-संगीतकार या नात्याबद्दल विचार करतो तेव्हा ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ या गाण्याच्या वेळचा किस्सा आठवल्याशिवाय राहत नाही. आमच्या सांगीतिक जुगलबंदीत दुमत झालेलं ते एकमेव गाणं. या गाण्याची दुसरी ओळ सगळ्यांनाच माहीत आहे. या ओळीतून हे नक्कीच स्पष्ट होतं की, हे गाणं आनंदाचं नाही. तरीही या गाण्याला उडती चाल देत मी सनईचे आर्त सूर त्यात टाकले होते. पाडगांवकरांनी चाल ऐकल्यावर ते काहीसे वैतागून माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की, ही उडती चाल त्यांना पसंत नाही. पण मीदेखील माझ्या चालीवर ठाम होतो. किंबहुना, माझा त्या चालीवर दृढ विश्वास होता. पाडगांवकरांनीही थोडं नमतं घेतलं. आणि पुढे त्या गाण्याने इतिहास रचला. आजही ते गाणं सगळ्यांना खूप आवडतं आणि त्यातले ते सनईचे सूरही मनाला भावतात. मला वाटतं, कवीचा संगीतकारावरचा विश्वास खूप मोलाचा असतो. पाडगांवकरांनी तो माझ्यावर टाकला आणि त्यामुळेच आमची सांगीतिक कारकीर्द अक्षरश: बहरली. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी’, ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘अशी पाखरे येती आणिक’, ‘या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ अशी किती गाणी सांगायची!
उत्तरकाळात पाडगांवकरांमधील ‘वात्रट’ माणूस थोडासा बाजूला झाला. त्यानंतर त्यांनी कबीर, मीरा, तुकाराम आदींच्या काव्याचा भावानुवाद केला. मला वाटतं, वात्रटिका लिहिणाऱ्या पाडगांवकरांचा पिंड पहिल्यापासूनच आध्यात्मिक असावा. त्याशिवाय ते वात्रटिकाही लिहू शकले नसते. पण जसजशी कवी म्हणून त्यांची प्रगल्भता वाढत गेली तसतसा त्यांचा हा पिंड अधिकच भक्कम होत गेला. मी ओशोंवर लिहिलेल्या काही रूबाया त्यांना वाचून दाखवल्या होत्या. त्यात त्यांनी काही मोलाच्या सूचनाही केल्या होत्या. याआधीही माझ्या काही कवितांच्या पुस्तकांवर आम्ही एकत्र भेटून चर्चा केली होती. आता अशी चर्चा कोणाबरोबर करायची? श्रीनिवास खळे, विंदा करंदीकर, वसंत बापट, शांता शेळके यांच्यानंतर आता पाडगांवकरही गेले. त्यांच्याच एका कवितेप्रमाणे आता डोळ्यांसमोर केवळ आठवणींचं धुकंच तेवढं साठून राहिलंय..