गिरीश कुलकर्णी

हे सामाजिक काम आहे? हा तर माझी समजूत वाढविण्याचा कट आहे. प्रत्येक माणूस समृद्ध करण्याचा डाव आहे. अगदी तळपत्या सूर्याखाली सर्वादेखत माणूस घडवला जातो आहे. निसर्ग रुजवला जातोय. या सगळ्याचा मी साक्षीदार आहे.

Mothers day special
“एक दिवस माझा मुलगा म्हणाला की, मीही तुझ्याबरोबर भांडी घासायला येतो अन्…” वाचा, घरकाम करणाऱ्या महिलांचे अनुभवकथन….
Labor, died, Kalyan East,
पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून कल्याण पूर्वेत मजुराचा खून
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
sharad pawar family
“माझ्या नणंदेची जागा…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शर्मिला पवारांचं समर्थन; म्हणाल्या, “सुप्रियाताई जन्माने…”
pune crime news, young man attempted suicide at police station
पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Wardha Police, mahatma Gandhi s proverbial monkey idea, Combat Rising Cybercrime, marathi news, cyber police, cyber crime news, wardha news, wardha police news,
महात्मा गांधी यांची प्रतीके अन् वर्धा पोलिसांची नाविन्यपूर्ण…
thane lok sabha marathi news, rajan vichare latest marathi news
“राजन विचारे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन केल्याने एम.के. मढवी यांना अटक”, सुषमा अंधारे यांची टीका
BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?

तिरप्या कोनात सूर्य. तळपता. त्यापुढे कोणीतरी सावली तयार करतंय.. खाली बराच अंधार करून असलेली सावली. त्या सावलीतही कुणीतरी. पाणी आहे खाली. पाण्याचा आवाज येतो आहे. खालून कोणीतरी ओरडतोय. सावली तयार करणारा प्रतिसाद देतोय. खालून बोलावतायत वरच्याला. तो तयार नाही बहुतेक!

‘‘अरेऽऽऽ, हाण की लेकाऽऽऽ’’

‘‘पांडय़ाऽऽऽ मार उडी..’’

शब्द चित्र स्पष्ट करत उमटेस्तोवर ओरखडा उमटवीत चित्रावर एक विशिष्ट लयदार आवाज. उघडलेच डोळे. गजर? हं.. फोन! उचलून कानी लावला.

‘‘सर, उटले का नाही? जायचं नं?’’

ताडकन् उठलो. न राहत्या गावी जाग मोठी गमतशीर येते, नाही? विशेषत: विचारांची भेंडोळी उशाला घेऊन झोपल्यावर. तर बरं का, हळूहळू ध्यानी आलं. ‘लातूर’ डोळ्यांत, डोक्यात नीट प्रकाशलं. हाटेलच्या चहानं तर वट्ट जागं केलं. अर्र्र.. उशीर झाला. तो होतोच. बापजाद्यांचे दुर्गुण घेऊ  नयेत, ही अक्कल येईस्तोवर पाऽऽर जनुकांत विरघळवून बसतो आम्ही ते. स्वत:ची ओळख पटवण्यासाठी हमखास उपयोगी यावा असा अस्सल मराठवाडी आळस! तो परंपरेतूनच आलाय माझ्यात. मीही जोपासलाय तो निगुतीनं.

‘‘इंग्रज जाण्याच्या ज्या अनेक थेऱ्या सांगितल्या जातात नं विनोदासाठी- त्यात हीपण एक टाकावी. इतकी सॉलिड ‘स्थितीस्थापकत्वाची थेरी’ किंवा ‘म्हसाड’ थेरी! चिखलात बसलेलं म्हसाड (म्हणजे म्हैस)! यष्टीम्होरं आल्यालं म्हसाड! हालतच नाई ओ.’’ तयार होऊन आलेल्या इरफानसमोर चेहरा सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत मी.

तो तर अस्सल मराठवाडी. पण त्यानं हे म्हसाड उठविलं. आन् चुचकारून बाजूलाही घेतलं होतं. माझ्या अनेकरंगी शंकांपैकी एकीचं चमकतं उत्तर डोळ्यात घेऊन तो आला होता मला घेऊन जायला. मराठवाडय़ातल्या लोकांना कामाला लावण्याच्या रात्रीच्या त्या साऱ्या गमजा खऱ्याच असाव्यात!

‘‘दावतपूरला लोक वाट पाहतायत. तुमच्या हस्ते मशीनचं उद्घाटन करायचंय. मशीन येऊन थांबलंय कवाचं.’’

खरं तर मला ‘ऑन द वे’ असलेल्या ‘मीनल स्वीट मार्ट’मध्ये ‘खारा’ खाऊन पुढे जावंसं वाटत होतं. पण इतक्या सकाळी ते तरी कुठलं उघडं असणार होतं? म्हणून मग पाय निघाला. गाडी औसा रस्त्याला लागली. उन्हं तापू लागली. शहर सोडून वेग धरल्यावर चहूबाजूंनी डोळ्यात भरेलसं उजाडपण. मधेच हिरवा तुकडा दिसला तर तो खुपेल अशी त्या रखरखीची संगती. इरफाननं ‘गमछा’ दिला. उन्हानं मी गारद होऊ  नये म्हणून. मी ही नवी ओळख मानेभोवती रुळवली.

‘‘थांब. मी जातो..’’ असं म्हणत मी लांबून पळत येऊन कुंपणागत लावलेली बाभळीच्या काटय़ांची आकडी सफाईदार उडी मारत लांघली. आत हिरवाकंच उस दाटी करून सळसळत होता. जेमतेम पंधरा वीस किलोमीटर कापून आम्ही हे शेत पाहताच थांबलो होतो. ‘शेतातला ऊस खाण्याची मज्जा’ अनुभवण्यासाठी! ‘लातूर-तुळजापूर-उमरगा-नळदुर्ग-लातूर’ अशी सायकल ट्रीप काढली होती तीन दिवसांची. मी आणि अतुल पालीवाल पुण्याकडचे, तर धन्या कुलकर्णी, संजय रेणापूरकर आणि ‘कृषिवल’ अतल्या असे पाच सायकलवीर. धन्या, अतल्या नको म्हणत असताही मी ऊस तोडायला घुसलो आत. पोरं रस्त्यावर नजर ठेवून. एका घोडय़ावरनं एक आजोबा दुडक्या चालीनं आम्हाला ओलांडीत पुढे गेले आणि मी फडात घुसलो. ‘काऽऽडकन्’ आवाज करीत ऊस आडवा केला तशी भिर्र्र करीत एक दगड येऊन पडला. आणि पुढचं काही कळायच्या आत अस्सल गावरान शिव्या आणि दगडांचा मारा माझ्या दिशेनं होऊ  लागला. दगड लागू तर नयेत, पण भीती तर वाटावी अशा पद्धतीनं हात- दीड हात अंतरावर येऊन पडत होते. कसाबसा बाहेर आलो तर घोडं हाताशी धरून ते मघाशी गुमान पुढे गेलेले आजोबा तोंडाचा पट्टा चालवीत परत येत होते.

‘‘आरं, काय अकलाबिकला हाईत का न्हाई? कालेजातनं शिकताय आन् आडानीपना गेला न्हाई व्हय आजून? मायला तुमच्या! हिथं तळहाताच्या फोडागत पीक जपतोय शेतकरी! आन् तुमी उनाड कुत्र्यागत कुटंबी तोंड घालताय व्हय?’’

थरथर कापत ऐकत निश्चल उभे होतो आम्ही. म्हातारबा चांगलेच संतापले होते. बरोबरच होतं त्यांचं. त्यांच्या अडचणींची मला पुसटशीही कल्पना नव्हती. माझं हे शहरी अडाणीपण मला ही चोरी करायला उद्युक्त करून आता प्रसंगाला तोंड कसं द्यावं, याचं मात्र कोणतंही उत्तर देत नव्हतं. आजोबा म्हणाले, ‘‘लावून दे माझा ऊस परत.. तरच सोडतो.’’ कळेना काही. जीव रडकुंडीला आला. तसं म्हाताऱ्याच्याही डोळ्यांत पाणी आलं. म्हटला, ‘‘पोराहो, शेती मोठी आवघड झालीय. पाऊसपान्याचा घोर. लेकरं शेतीत ठरनात. मजूर न्हाई. ईज न्हाई. आसं समदं पार करून श्येतकरी पीक उभं करतुया. आन् तुमी भाडय़ाहो, चोऱ्या कराय लागले. आनि काय करायचं सांगा की..’’

‘‘मागून घ्यावं रं. मागितला अस्तास तर मोळी द्येतो की बांधून..’’

उभ्या जन्मात शेती न केलेला, पाहिलेला मी इंजिनीयरिंगचा विद्यार्थी. उत्तम साहित्य वाचणारा, नाटकं बसवणारा, लिहिणारा, संवेदनशील, वगैरे. पण मला मुळी शेतकऱ्याच्या व्यथेचं भानच नव्हतं. मी सुन्न होऊन आजोबांचे पाय धरले. म्हतारबानंही मोळी बांधून दिली उसाची. छे! समजुतीचीच मोळी दिली बांधून! पुढच्या पूर्ण प्रवासभर  ‘‘खातोस का ऊस गिऱ्या?’’ असं म्हणत पोरांनी ती घट्ट बांधायला मदत केली.

वाऱ्यावर भिरभिरीत नजर ते शेत शोधत होती.

‘‘आता कुणी ऊस करत नसेल, नाही?’’

‘‘ऊस?’’ मोठय़ानं हसत इरफाननं दावतपूर फाटय़ावरनं आत वळत असलेल्या गाडीत माझ्या शहरी अकलेचा हलकेच कचरा केला.

‘‘हे आलं बगा दावतपूर..’’

‘‘पांडय़ाऽऽऽ हाण की उडी..’’

मनाशी आवाज. गमछा सावरत उतरलो. शिवारात गर्दी वाट पाहत थांबलेली. एक भलंथोरलं मशीनही. टाळ्या वाजवून, हारतुऱ्यानं स्वागत केलं ग्रामस्थांनी. गाव जोमात काम करत होतं. तरुणांचा गट विशेष सक्रिय होता. तहसीलदार गाठाळ मॅडम आणि ग्रामसेवक भालके आवर्जून उपस्थित होते. दोघं व्यवस्थेचे प्रतिनिधी. आपल्या जबाबदारीचं योग्य वाचन करीत गावाबरोबर झटून राबत होते. मशीन चालू करून बाह्य़ा सरसावल्या.

‘कुदळ येती का हांता?’- इरफानचा प्रश्न आठवला.

‘‘पांडय़ाऽऽऽ हाण की उडी!’’

घाव घालायला सुरुवात केली. मंडळींनी टाळ्या वाजवल्या. अगदी शास्त्रोक्त जरी नाही, तरी बरं हानीत असावा मी. ‘‘जमतंय की लेका!’’ची कुजबूज वाढली. मग पुण्याहून हेच सगळं अनुभवायला आलेला चेत्याही सरसावला. मर्सिडीज गाडीतून आलेला ‘ह्य़ो साहेब पन हान्तोय कुदळ’ म्हटल्यावर लोक आनंदले. लातूरमध्येच माहेरच्या कार्यासाठी पुढे आलेल्या वहिनी (चेतनच्या पत्नी) आणि दोन लेकरांनीही गिरीशकाकाला मदत करायला सुरुवात केली. हा- हा म्हणता हात चालू लागले. घामच घाम भुई भिजवीत राहिला. कधी गमछानं टिपत, तर कधी खारट घोट गिळत त्या तापत्या उन्हात आम्ही सगळे जणू एखादं ऋण फेडतो आहोत असंच वाटलं.

शाळेत सभा भरली. स्पर्धेचा शेवटचा टप्पा चालू असल्यानं झालेल्या आणि शिल्लक कामाचा आढावा घेण्यात आला. वृक्ष- लागवडीच्या कामाचा मोठा अनुशेष सोडता गाव बऱ्यापैकी स्पर्धेत होतं. मी उत्साह देणारं बोललो. तर इरफाननं करडी तंबी दिली. ‘कामाचा झपाटा वाढला नाही तर काही खरं नाही..’ असं रोखठोक सांगितलं. इरफानसरांना सगळ्यांनी फार प्रेमाने आश्वासन दिलं- ‘‘आम्ही करतू!’’

एव्हाना जेवणाचा सरंजाम सजला होता. मंडळींनी जेवून जायचा आग्रह धरला तशी मी म्हणालो, ‘‘किती खड्डे राहिलेत?’’

‘‘३०० खड्डे करायचे राहिले आहेत झाडांसाठीचे.’’

‘‘मग आसं करा- मी पुढं निलंग्यातून जाऊन येतो संध्याकाळपर्यंत. खड्डे पूर्ण झाले असले तर पाटीवर (फाटय़ावर) या मला न्यायला. मी परत गावात येईन संध्याकाळी. आणि सगळे जेवण करू.’’

मंडळी जरा कचरली. पण जरा चेतवताच तरुणांनी अट स्वीकारली. ‘‘तुम्हाला जीऊ  घालतोच बगा. पन नक्की यायचं..’’ असं म्हणत टाकोटाक कामाला धावली. गाडीनं दावतपूर शिवार सोडलं तसं मी इरफानला विचारलं, ‘‘करतील का?’’

‘‘करतील की. तुमी जेवनार ना पन? नाही- तिकट आस्तय म्हनून म्हनलं.’’ काय निराळंच पोरगंय हे? किती नेमकं कळतंय माणूस याला. उगा आशेला लावून हा गडी जाणार नाही ना, याचीही काळजी घेतोय हा. मला डॉ. पोळ यांचा, सत्यजीतचा अभिमान वाटला. कामावर नेमकी दृष्टी खिळवून प्रत्येकाला प्रेरणा देत, कधी आव्हान देत उभं करत होता इरफान काम करायला. मी मागं पडणाऱ्या शिवारावर नजर टाकली. एकसारखे टी-शर्ट घालून ग्रामसेवकांचा गट शिवारात श्रमांची नक्षी काढण्यात गुंतून गेला होता. दावतपूरचं वैशिष्टय़ ठरलेला हा सरकारी नोकरांचा गट. एरवी शेतकऱ्यांच्या दृष्टीस न पडण्यासाठी प्रसिद्धी पावलेला ग्रामसेवक- आपलं पदनाम सार्थ करीत भर माळावर इतक्या संख्येनं एकत्रित काम करीत असलेला पाहणं हे चमत्कार पाहिल्यासारखंच की! येतील लोक या उन्हात? राबतील पैसे न देता? इत्यादी प्रश्नांचा फोफाटा अस्मानी उडवीतच पुढं निघालो.

‘धप्प्..’ आवाज करीत पांडय़ानं छाती लाल करीत उडी घेतली एकदाची. सुशील देशपांडे! माझा शाळेतला दोस्त. पुण्याचा. मी अन् माझ्या धाकटय़ा भावानं पिढीजात वाटय़ास आलेली शेती करायला घेतली तेव्हा आवर्जून माझ्या गावी सोलापूरजवळ नान्नजला आला होता. भालचंद्र करमरकर या आणिक एका उच्चविद्याविभूषित मित्रानं बळ दिल्यानं मी अन् शिरीषनं शेती करायला घेतली. विहीर पाडली. राहुल बकरेनं सांगितलेल्या जागी. भूजलतज्ज्ञ असलेला राहुल नियोजन आयोगात काम करून आलेला. सामाजिक उद्योजक असलेला हा गडी ककट, अहमदाबादच्या मदतीनं नवी उपकरणं तयार करीत, नवं तंत्रज्ञान वापरीत शेतकऱ्याच्या मदतीस उतरलेला. त्यानं शिरीषला भूजल पुनर्भरणाचं महत्त्व बारकाईनं विशद करून सांगितलं होतं. त्यानं शास्त्रशुद्धरीत्या बेतून दिलेल्या जागी विहीर पाडल्यानं पाणी लागलं भरपूर. त्याच विहिरीत उडय़ा मारायला जमले होते सगळे. भालचंद्र, राजेश गावडे, मी आणि पांडय़ा. शाळेत जाधव बाईंकडून शंकर पाटलांची ‘वळीव’ कथा एकत्र शिकलो होतो. ग्रामीण जीवनाशी असा ओझरता संबंध आलेले आम्ही चार शहरी शहाणे. तरी भाल्या अन् राजानं उडय़ा मारल्या बिनधास्त. मीही मारली. पण पांडय़ा मारेना. पोहता येत असून!

शेती करायला घेतानाची माझी अवस्था तीच होती. जीवावर बेतणार नाही हे ठाऊक असूनही नव्यानं जीव धोक्यात- किंबहुना अडचणीत घालणं नको वाटत होतं. चारीठाव सगळी सुरक्षितता असतानाही उडी घेणं धाडसाचं वाटत होतं. हे सगळं त्या माळावर राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या आकृत्या न्याहाळताना मनात येत होतं. का आलोय मी इथं? झेपणार आहे का मला हे? माझ्या शेतात तर आहे की पाणी! मला सांगितलं तेवढं करून थांबू की. टीव्हीवरचा कार्यक्रम करायला बोलावलंय, तर तेवढं करून थांबू. कोणीच बळजबरी केली नाहीये. मग माझी नक्की प्रेरणा काय? सामाजिक कामाची आवड वगैरे म्हणावी तर अजिबातच नाही. कारण ‘समाज’ नावाची कल्पना मला कधी भय घालते, खोडे घालून पाडते कधी, तर कधी अपार ऊर्जाही देते. अंदाज नाही मला या ‘समाज’ नावाच्या गोष्टीचा. बरं, आत्ममग्न होत कलासाधना करावी इतकं थोरपण माझ्यात नक्की नाही. मात्र, मला माणसं आवडतात. त्यांच्यावर प्रेम करायला, रागवायला आवडतं. त्यांना गोष्टी सांगायला आवडतात. त्यांच्या गोष्टी ऐकायला आवडतात. पण माझ्या आवडत्या जी. ए., नेमाडे, एलकुंचवार, आळेकरांसारखं त्यांच्याकडं तटस्थतेनं पाहणं मला साधेलसं चुकूनही वाटत नाही. मी लडबडून जातो भावनेत. समकालीन भवताल न्याहाळत, कालपरत्वे होणारी त्यातील उलघाल समजावून घेत पुढची वाट दाखवणारं चिंतन मांडण्याइतकं लेखकपण माझ्यात नाही. मग का आलोय मी?

..तर बरं का, सामाजिक असो वा व्यक्तिगत-जगण्याच्या व्यवहारात मी बिनदिक्कत शरीक होतो. नव्हे, माझं निरागस कुतूहल जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत मी उडय़ा मारतो. मला या श्रमदानाच्या प्रयोगाचं भलतं कुतूहल वाटलं होतं. ते शमवायलाच कदाचित मी आलो होतो. म्हणजे मागे एकदा विनोबांनी हजारो एकर जमिनीचं दान मिळवल्याचं वाचलं होतं. त्याचा अचंबा वाटला होता. तसंच काहीसं हेही. देतील असं दान लोक? चला जाऊन पाहून येऊ..

दुसरंही एक कारण असं बरं का, की माझ्या लहानपणीचा निसर्ग आता कुठे सापडत नाही. शहरी आसमंतात हर प्रहर वाहनांचेच आवाज येतात अन् कवाडं उघडताच भिंती आडव्या येत कूपमंडुकत्व देतात. माध्यमी शहाणपण लेवून मी बाजारात बसतो. पैशाशिवाय दुसरा व्यवहार करत नाही. अशा मला मधेच ओढ लागते झाडाझुडपांची, निसर्गाची. तो शोधत आलोय का?  सापडेल का पण या प्रयत्नातून निसर्ग? हे हजारो श्रमिक रुजवताहेत म्हणे तो. असेलही. नाही.. नाही. मला वाटतं, त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे आमीर, सत्यजीतचं हे अचाट धाडस!

अहो, इथल्या पिढीजात धुरंधर राजकारण्यांनी, बाबू हापिसरांनी पाण्यागत पैसा वाहवून, आम्ही जनतेनीबी मोठय़ा आळसानं साथ देत टिकवून धरलेला हा दुष्काळ! तर तोच हटवायला निघायचं? काय भाबडी म्हणायची का येडी? अहो, आहे समजा मॅन-मेड.. म्हणजे मानवनिर्मित. पण म्हणून काय ही पिढय़ांनी कमावलेली आपत्ती अशी झपाटय़ानं निखंदून टाकायला निघायचं? आणि कुणाच्या जीवावर? तर हजारो अनोळखी माणसांच्या जीवावर! छ्या! आसं कुटं आस्तय व्हय? असा कसा विश्वास ठेवता येतो राव यांना? हे म्हणजे खिशात दमडा नसताना पिक्चर काढायच्या गमजा करण्यासारखंच की हो! मी आणि उमेश कुलकर्णीनं असं एकदा केलं असल्यानं असावं कदाचित, पण मला जाम प्रेम वाटत होतं या प्रयोगाबद्दल!

आता हेच बघा की- ‘पाणी फाऊंडेशन’ पैसा घेणार नाही वा देणारही नाही. काय भन्नाट सूत्र आहे. कसं सापडलं असेल? किती स्पष्टता आली त्यामुळं. दोन हातांची नैसर्गिक साधनसंपत्तीच फक्त कामी लावायची. कमवायचा कष्टानं निसर्ग! घडवायची सृष्टी नव्यानं. रुजवायची आपुलकी अन् माणुसकी. खरं सांगू? ही खोलात मारलेली उडी होती! तीही कैफात नाही, तर विश्वासाच्या बळावर मारलेली.

तगरखेडा येईस्तोवर मनातल्या प्रश्नांचा दाह कमी झाला. ‘‘इथं आमिर सर येऊन गेलेत. डॉ. पोळही येऊन गेले आहेत. गाव काम करतंय जोरात. पण नेट लावला तर नंबरात येऊ  शकतं..’’ इरफाननं ब्रीफिंग दिलं. गावात मध्यवर्ती चौकात टेबल-खुच्र्या, माइक इत्यादी व्यवस्था करून मंडळी सज्ज होती.

‘‘आता इथून पुढं सत्कार, हारतुरे नकोत.’’ मी आधीच सांगितलं होतं. गावातून प्रशिक्षणासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनं बीजभाषण करताना गावाची ओळख सांगितली. या गावातली बरीच मंडळी आखातात काम करायला जातात असा उल्लेख केला. मला नवल वाटलं. या गावात ‘तोंड बंद, काम चालू’ असा मूक श्रमदानाचा आगळा प्रयोग राबवला जात होता.

मी म्हणालो, ‘‘गडय़ांनो, गाव पाणीदार करताहात. लवकरच लांबलांबून लोक या गावाचा पत्ता शोधत इथं येऊ  देत. एखाद्या हिवरेबाजारनं महाराष्ट्राचं भागायचं नाही. तगरखेडय़ाचा हा प्रयत्न शालेय पुस्तकात छापला जाईल असा धडा गिरवा. बक्षीस मिळालं गावाला की येतो मी. मग करा सत्कार.’’

थोरामोठय़ांच्या पाया पडत मार्गस्थ झालो.

‘‘फार वेळ बोलू नका. लई गावं करायचीत.’’ – इरफानची टोचणी होतीच.. ‘‘आता थोरमाकणीत जाऊ.’’

या गावी हनुमानाचं प्रसिद्ध देवस्थान. गावात उत्सव चालू होता. येणाऱ्या भाविकांस मोफत प्रसादवाटप होत होतं. शिवारात श्रमदान करून सगळे मंदिरालगत सभामंडपात जमले. इथं माती- परीक्षण करणारी टीमही भेटली. त्यांनी माती-परीक्षणाचं महत्त्व सांगितलं. गावात श्रमदानाला म्हणावासा जोर नव्हता. मी म्हटलं, ‘‘भक्तांना प्रसाद वाटताय आन् पाणी प्यायला त्यांनी काय घरी जायचं का? हजारो रुपये देवाच्या उत्सवावर खर्च करताय, पण जेसीबीच्या डिझेलचा लोकवाटा द्यायला रक्कम जमत नाही. मग चालतंय का हे देवाला?’’

‘‘हनुमान ही तर श्रमकऱ्याची देवता. स्वत:चा यत्किंचित स्वार्थ नसतानाही रामरूपी सत्यावर अढळ विश्वास ठेवून आख्खा पर्वत उचलून आणणारा हा देव. त्याचा कोणता गुण तुम्ही घेताय? नुसते देव देवळात पुजून आजवर काही भलं झालं नाही. पिढय़ा गेल्या तरी कशी जाग येत नाही?’’ हनुमंताच्या कथेचं हे इरफानी आख्यान ऐकताना मी चाट पडलो. बरं, गावाशी नातं इतकं घट्ट, की त्याच्या ‘इरफान’ असून  हनुमानावर बोलण्याला कुणाचाच आक्षेप नाही. उलट, कौतुक. निघताना सगळ्यांनी तोंडभरून काम करण्याचं आश्वासन दिलं. काय गंमत पाहा, इथं आम्ही व्हॉटस्अ‍ॅप शहाणे अहमहमिकेनं सहिष्णुतेसंबंधीचे वाद चघळीत असता वास्तवापासून किती दूर असतो याचा उत्तम पाठ मिळाला. निघालो पुढं.

इरफान सांगत होता, ‘‘गावोगावी सप्ते लावतात. हजारो-लाखो रुपयांची वर्गणी काढून कुठल्याशा बाबा-बुवापुढं सात-सात दिवस बसून राहत्यात. पण पाण्याचं काम करा म्हटलं की अडचणी सांगतात. बरं झालं बोललात. आन् या सगळ्यात पुढाऱ्याचा हात असतो. गावोगावी अशा सप्त्याचा धंदा चालतो.’’

मला गाडगेबाबांची आठवण आली. ‘‘सगळ्या संतांच्या शिकवणी आम्ही पायदळी तुडवल्या राव. आणि त्यांच्या पोथ्या तेवढय़ा घेऊन बसलो. नाही?’’

‘‘होय तर! आओ कुटलाच बाबा पोथीत सांगितल्यागत वागत नाही. निस्ता वाचून दाखवतो आनि तुंबडय़ा भरतो..’’

वाटेतल्या गप्पांना खळ नव्हता.

नदी हात्तरगा! काय गमतीदार नाव. नावातच फक्त नदी. दुष्काळानं गावच्या तोंडचं पाणी केव्हाच पळवलेलं. तिथं अजित देशमुख हे ग्रामसेवक आणि अन्वर पटेल हे शिक्षक हट्टाला पेटलेले. गावानं स्पर्धेत भाग घेतल्यापासून एकच ध्यास.. श्रमदानाचा! शाळेतली पोरं ऐन सुट्टीत एकत्र करीत मास्तरांनी काम चालवलेलं. ‘पैशे देत नाही, मग का करायचं काम?’ हा गावकऱ्यांचा सवाल. मी म्हणालो, ‘‘काम तुमचं; मग पैशे का देईल कोणी? मास्तरांसकट कोणाला पैशे मिळाल्याचं दाखवून द्याल तर म्हणाल ते हारू. पैशातून न मिळणारा आनंद मिळवायलाच तर काम करताहेत लोक. बाजूच्या गावात इतिहास घडत असताना तुम्ही कोरडेच राहणार का? नावात नदी असून दुष्काळ मिरवणाऱ्या गावाच्या नावागत? तुमच्या नशिबानं असा शिक्षक मिळालाय तर त्याला साथ द्या की.’’

खरंच, मला मास्तरांचं अप्रूप वाटत होतं. वाटलं, सत्यजीत अन् आमीरला बहुदा स्वप्नात दिसली असावीत ही माणसं. म्हणूनच हे असलं धाडस करू धजले. विश्वास ही काय अजब चीज आहे. ती परावलंबी नाही, तर स्वयंत्स्फूर्त आहे. तो सार्थ ठरविणारी माणसं असतील यावर विश्वास ठेवायला मनात निरागस प्रेमच हवं. खरोखर, गावोगावी सापडत होती की अशी माणसं!

‘गावानं गावासाठी गावकऱ्यांकरवी करायचं काम!’ अशी डॉक्टर अन् सत्याच्या मनातली कामाची व्याख्या साकार करणारं हे पुढचं गाव.. हलगरा! गावातला एक तरुण उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत ‘याहू’सारख्या कंपनीत कामाला. नाव- दत्ता पाटील. पोराचं आपल्या गावावर नितांत प्रेम. स्पर्धेची माहिती कळताच पठ्ठा गावी आला. स्पर्धेची सगळी रुजुवात करून मित्रांना कामाला लावून गेला. रोजच्या रोज तिकडून कामावर लक्ष ठेवून सूचना, मदत पाठवीत राहिला. आम्ही गेलो तर अंधारून येत असताही दत्ताच्या मित्रांनी गाव गोळा केलं होतं. त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करून, उत्साह देऊन आम्ही पुढे निघालो.

दिवसभर डोईवर ऊन घेऊन, कुदळ अन् घसा चालवून दमलो होतो.

‘‘झाली नं आजची गावं?’’ मी इरफानला विचारलं.

‘‘का? भूक नाय लागली का?’’ त्यानं फिरकी घेतली.. ‘‘दावतपूरला थांबलीत की पोरं.’’

‘‘अरे, हो रे! मी विसरूनच गेलो.’’ मनात म्हटलं, ‘‘अतीच विश्वास दिसतोय याला!’’ असं म्हणेस्तोवर गाडीच्या प्रकाशात पाटीवर (म्हणजे मुख्य रस्त्यापासूनचा गावाकडे वळणारा फाटा) उभी असलेली पोरं दिसली. इरफान म्हणला, ‘‘आलीत की!’’ खरं सांगतो, मी खुळावून पाहत राहिलो. आणि पाहून हरखून गेलो. लहान पोरागत.

विठ्ठल अन् महेश बेडजवळगे, दत्ता पाखरे आणि सगळीच. ‘‘च्यायला या येडय़ांनी खोदले काय ३०० खड्डे?’’ सकाळी एक खड्डा खोदतानाचा लागलेला दम आठवला.

उतरलो खाली. तर पोरांचे चेहरे पडलेले. विठ्ठल म्हणाला, ‘‘अडीचशेच झाले. त्रास व्हाय लागला. मंग कुनी तेनं आजारी पडू ने म्हनून थांबलो. उद्या बाराच्या आत मारतो बाकीचे. तुम्ही जेवन करा की.’’

मी रडवेला झालो हो. कोण कुठला मी? पण मला दिलेला शब्द खरा करण्यासाठी या जीवघेण्या उन्हात ही पोरं सलग सहा तास राबली होती. मला सुचेना काही. मी कसाबसा आवंढा आवरत म्हटलं, ‘‘विठ्ठला, भेट लेका कडकडून. माझं पोट भरलं की लेका. तुजी ही भुईभर माया कुटं ठीऊ? काय बारदाना तेन आन्लायस का? आनी पुना फुकाटचं खाऊ  घालू नको. कमवू दे की लेका मलाबी.’’

शहराचे दिवे दिसू लागले. सरला दिवस डोळ्यापुढून जाईना. एकेक माणूस परत परत आठवू लागला.

हे सामाजिक काम आहे? हा तर माझी समजूत वाढविण्याचा कट आहे. प्रत्येक माणूस समृद्ध करण्याचा डाव आहे. अगदी तळपत्या सूर्याखाली सर्वादेखत माणूस घडवला जातो आहे. निसर्ग रुजवला जातोय.

या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. या समूहातला प्रत्येक चेहरा स्वतंत्र आहे. आणि तरीही एकत्र काम करतो आहे.

‘नको घाबरूस. ती गर्दी नाही.

आपलेच तर शेजारी आहेत.

देऊन बघ त्यांना आपल्या विश्वासाचा चेहरा.

ती इतर कुणी नसून आपणच तर आहोत’

एका कवितेच्या कार्यक्रमात कुणा पंजाबी कवीच्या या अनुवादीत ओळी मी वाचतो. आज त्याचा अर्थ लागतो आहे. अनावर आनंद झाला. भयमुक्त मी साद घातली, ‘‘पांडय़ाऽऽऽ, हाण उडी. तरंगतं आपोआप!’’

विचारांचाही नाद होत असावा. इरफाननं ‘ऊन लागलं काय सायबाला?’ असं मागं पाहिलं. मी उगी राहिलो. तसाही गाडीभर माझ्या शहरी शहाणपणाचा कचरा होताच दिवसभराचा- त्यात आणि भर नको.

इरफाननं उद्याचा कार्यक्रम सांगितला आहे. आणि मी वेळ पाळणार आहे. तळहातीच्या कमावलेल्या फोडांना हळुवार कुरवाळीत मी जागेपणी केलेला तो शेवटचा विचार..

girishkulkarni1@gmail.com