आज वाचनसंस्कृती किती शिल्लक आहे, हा जरी वादविवाद व परिसंवादाचा विषय असला तरी दरवर्षी अनेक प्रकाशक निरनिराळ्या विषयांवर पुस्तके प्रकाशित करीतच असतात. वेगवेगळ्या रुचीच्या वाचकवर्गाला समोर ठेवून ही पुस्तके प्रसिद्ध केली जातात. मात्र, पुस्तकाच्या बाबतीत सगळ्यात उपेक्षित वर्ग आहे तो बालवाचक. बाल वा कुमारवयीन  मुलांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना आवडतील, त्यांच्या आवडीनिवडीला रुचतील अशी पुस्तके फारच कमी प्रमाणात आज उपलब्ध आहेत. त्यांच्या आकलनाला रुचतील, तंत्रज्ञान, विज्ञानाबरोबरच त्यांच्या रोजच्या जगण्यातील गोष्टी मांडेल असे साहित्य फारसे उपलब्ध नाही. आजच्या पिढीला वाचनाची आवड लागली पाहिजे, असे आपण एका बाजूला म्हणतो, पण त्याच वेळेस त्यांना रस वाटेल असे फारसे काही उपलब्ध करून देत नाही, याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो.

ही कमतरता कमी करण्याच्या दृष्टीने माऊस मल्टिमीडियाने उचललेले पाऊल स्वागतार्ह म्हणावे लागेल. बाल-कुमारांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी नुकतीच प्रसिद्ध केलेली ‘आमची धमाल गाय’ आणि ‘वाघाच्या पोटात गेले होते फुलपाखरू’ ही दोन पुस्तके बाल-कुमारांबरोबर मोठय़ांनीही वाचावीत इतकी मनोरंजक आणि सरस झाली आहेत.

‘आमची धमाल गाय’ या पुस्तकात सहा अनुवादित कथा आहेत. महाश्वेतादेवी, प्रेमचंद, यू. आर. अनंतमूर्ती, रोनाल्ड दाल, शिनीची होशी, जेम्स स्मिथ या प्रसिद्ध लेखकांच्या कथा उदय नारकर, अनंत भावे, अरिवद गुप्ता, उमा कुलकर्णी, निसीम बेडेकर, रजिया पटेल अशा तितक्याच तोलामोलाच्या अनुवादकांनी अनुवादित केल्या आहेत. यातली पहिलीच कथा आहे ती महाश्वेतादेवींची ‘न्यादोष’! यात त्यांनी त्यांच्या वांड गाईचे जे वर्णन केले आहे, ते उदय नारकर यांच्या अनुवादातून तितकेच धमाल उतरले आहे. या गाईच्या खोडय़ांचे वर्णन ऐकताना आपणही त्यात अक्षरश: गुंतून जातो. त्या मजेत सहभागी होतो. महाश्वेतादेवींच्या लेखनाचा हा पलू खूपच लोभस आहे. प्रेमचंद यांची ‘ईदगाह’ ही कथा एका गरीब लहान मुलाचे भावविश्व मांडते. जत्रेला गेलेला हा मुलगा त्याच्याकडे असलेल्या अपुऱ्या पशांतून स्वतसाठी काही न आणता आपल्या आजीचा हात स्वयंपाक करताना भाजू नये म्हणून चिमटा आणतो.. हे या कथेत हृदयस्पर्शी पद्धतीने आले आहे. ‘चिनी चिमाजीची सर्कस’, ‘उशी’ या कथाही मनोरंजनाबरोबरच मुलांना अधिक काही देणाऱ्या (तेही उपदेश न करता) आहेत.

‘वाघाच्या पोटात गेलं होतं फुलपाखरू’ या कथासंग्रहात दिलीप प्रभावळकर, निरंजन घाटे, श्रुती पानसे, मोहन ननावरे, प्रतीक पुरी, अरुण मांडे या सहाजणांच्या कथा आहेत. ‘आमचं क्रिकेट’ ही दिलीप प्रभावळकरांची कथा क्रिकेट सामना बघताना झालेली मजा व गोंधळाचे मनोरंजक वर्णन करते. यातली मिश्कील शैली वाचकांना नक्कीच आवडेल. ‘वाघाच्या पोटात..’ ही कथा लहान मुलांना पडणारे प्रश्न उलगडणारी आहे. या संग्रहातल्या इतर चार कथा विज्ञानकथा आहेत. श्रुती पानसे यांनी आपला मेंदू बोलतो आहे अशी कल्पना करून त्याच्या मनात काय विचार येतात, ते या कथेत रसाळपणे मांडले आहे. आदिमानवाच्या काळातील वातावरण आणि शोध ‘हूची गोष्ट’ या कथेत भेटतात. ‘माइंड रीडर’ ही प्रतीक पुरी यांची कथा अस्वस्थ करणारी आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जर माणसाच्या मनातील विचार कळू लागले, तर सरकार त्याचा त्यांच्यावरच अंकुश आणण्यासाठी कसा उपयोग करील, ही कल्पना यात मांडली आहे.

अरुण मांडे यांची ‘कासव’ ही कथा अप्रतिम आहे. अनेक वर्षांनी पृथ्वी नष्ट झाल्यावर जमिनीखाली राहणारी माणसे त्यात आहेत. निसर्ग, पाणी, झाडे या सगळ्या गोष्टी कधीही न पाहिलेल्या एका छोटय़ा मुलाचा अपघाताने या गोष्टींशी परिचय होतो आणि पुन्हा जीवनाकडे माणसाची वाटचाल सुरू होते. या सगळ्या विज्ञानकथा असल्या तरी त्या वाचायला, समजायला उगीचच अवघड नाहीत. उलट, त्या वाचनाची आवड वाढविणाऱ्या आणि वाचकाला खिळवून ठेवणाऱ्याच आहेत.

या पुस्तकांच्या मजकुराइतकेच त्यांचे रूपही आकर्षक आहे. प्रकाशक अमृता वािळबे आणि प्रशांत खुंटे यांनी पुस्तकाची रचना कोणालाही आवडेल अशीच केली आहे. सहज वाचता येईल असा फॉन्ट, दोन वाक्यांतील पुरेसे अंतर आणि रेश्मा बर्वे यांची रेखीव चित्रे यामुळे ही पुस्तके वाचनीय होण्याबरोबरच प्रेक्षणीयही झाली आहेत. त्यांची मुखपृष्ठेही आकर्षक आहेत. दिवाळीच्या सुट्टीत किंवा एरवीही कुमारांना वाचायला देण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी ही पुस्तके आदर्श म्हणता येतील अशी आहेत. माऊस मल्टिमीडियाने आजच्या कुमारांना आवडेल, पटेल आणि रुचेल असे हे आगळे साहित्य आणले आहे. त्याचे आपण स्वागत करायला हवे.

 

‘आमची धमाल गाय’ आणि ‘वाघाच्या पोटात गेलं होतं फुलपाखरू’

संकल्पना / संपादन- अमृता वािळबे, प्रशांत  खुंटे

माऊस मल्टिमीडिया प्रकाशन, पुणे</p>

मूल्य- प्रत्येकी ९९ रुपये

सीमा भानू