‘रंगदेवतेचे आंग्लरूप’ या लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या प्रा. अविनाश कोल्हे यांच्या नाटय़समीक्षात्मक पुस्तकाला ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी लिहिलेली प्रस्तावना..

अविनाश कोल्हे हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि नाटय़समीक्षक असले तरी मी त्यांना एक नाटय़रसिक म्हणूनच ओळखतो. मराठी माणसांचं नाटकावर प्रेम असतंच आणि या नाटय़वेडाचं देशभरात कौतुकही होत असतं. मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे. नाटक सादर करणारी संस्था, नट-नटय़ा, नाटककार यांचा सगळा इतिहास तपासून, दहा ठिकाणी चौकशा करून नाटक आपल्याला आवडणारं असेल अशी खात्री पटल्यावरच तो नाटकाला जातो. कोल्हेंचं नाटय़प्रेम वेगळं आहे. मराठी नाटय़रसिक आणि रंगकर्मी फिरकणारही नाहीत अशा वेगळ्या नाटय़प्रयोगांकडे ते हमखास दिसतात. ते इतर भाषांतली नाटकंही मोठय़ा आवडीनं बघतात, समजावून घेतात. मराठी रसिकांना आणि कलावंतांना इतर भाषेतल्या रंगभूमीवर काय वेगळे प्रयोग होताहेत हे कळावं म्हणून त्या नाटकांवर लिहितात.
पूर्वी, म्हणजे खूप पूर्वी नव्हे- मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात महिन्यातून किमान एकदा कुटुंबीयांसमवेत एखादं रंजक कौटुंबिक मराठी व्यावसायिक नाटक बघावं असा रिवाज होता. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून तर दिवसाला तीन-तीन हाऊसफुल्ल प्रयोग होत असत. तिकीट मिळालं नाही म्हणून निराश होऊन परत जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी असे. मराठी प्रेक्षक तिकीट काढून नाटक बघतात, या गोष्टीवर इतर प्रांतांतल्या प्रेक्षकांचा पटकन् विश्वास बसत नसे. पण आज मात्र मराठी नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे. तरुण प्रेक्षक मराठी नाटकाकडे वळताना दिसत नाही. पन्नाशीपुढचे काही प्रेक्षक मात्र आजही निष्ठेनं मराठी नाटक बघायला येतात. पण आजच्या नव्या नाटकाचा अनुभव घेण्यापेक्षाही नाटकातून जुने क्षण जगण्याचा आनंद त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे मराठी व्यावसायिक नाटकाला रसिकांचा नॉस्टॅल्जिया कुरवाळण्यासाठी ‘वरून नवीन, पण आतून जुने’ असेच प्रयोग करावे लागतात. फार मोठय़ा बदलाचं धाडस करता येत नाही. महाराष्ट्रातली हौशी रंगभूमी ही स्पर्धावर अवलंबून असल्यामुळे तिथेही परीक्षकांना भापवणारी,चटपटीत, चमकदार नाटकं होत राहतात. मराठी रंगभूमीवर सातत्याने वेगळे, अर्थपूर्ण प्रयोग करणाऱ्या अनेक संस्था आर्थिक अडचणींमुळे बंद पडल्या आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमीवर फार नवीन प्रयोग होताना दिसत नाहीत. मराठी रंगभूमीला साचलेपण आलं आहे अशी तक्रार मराठी-अमराठी विद्वान करत असतात.
आज टेक्नॉलॉजी आणि अनेक माध्यमांच्या उदयामुळे परिस्थिती बदलली आहे. जीव रमवण्याचे, गुंतवण्याचे अनेक सोपे, स्वस्त पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. नाटकापेक्षा तात्काळ झिंग आणणाऱ्या इतर गोष्टींचं प्रेक्षकांना जास्त आकर्षण वाटू लागलं आहे. नव्या टेक्नॉलॉजीच्या अद्भुत चमत्कारांपुढे नाटकाची जादू त्यांना मिळमिळीत वाटू लागली आहे. टेक्नॉलॉजीने रंगभूमीसमोर जबरदस्त आव्हान उभं केलं आहे. नाटकापासून दूर गेलेल्या प्रेक्षकांना रंगभूमीकडे पुन्हा कसं आकर्षित करायचं, ही चिंता जगभरातल्या रंगभूमीला भेडसावते आहे. नाटक बदलतंय. माणसाचं जगणं बदललं की नाटकाला बदलावंच लागतं. आज जगभर नव्या नाटकांचा शोध घेतला जातो आहे. नाटकाचा वेगळा विचार करण्याची गरज भासते आहे.
‘आजचं नाटक आपल्या मूळ उद्देशांपासून भटकलं आहे. बेगडी तंत्राच्या आहारी जाऊन आपली शक्ती, चमक, जादू हरवून बसलं आहे,’ असा विचार असलेले काहीजण- नाटकाने पुन्हा आपलं हरवलेलं अस्सल नाटकपण हुडकायला पाहिजे, असा आग्रह धरतात. तर याविरुद्ध यात असलेल्या काहीजणांना वाटतं, आजच्या जगण्याचा वेग अमानवी वाटावा इतका वाढला आहे. निव्वळ अभिनेत्यांची मानवी ऊर्जा आणि संहितेतला आशय या बळावर आजच्या तरुण, चंचल प्रेक्षकांना खिळवून ठेवणं शक्य नाही. नाटकाला अर्थहीन शब्दांच्या बेडय़ांतून मुक्त करावं लागेल. नटांच्या आणि तंत्राच्या, मशीनच्या ऊर्जेतून नवीन खरं-खोटं अद्भुत जग रंगभूमीवर निर्माण करावं लागेल, तरच नाटक जगेल. आज अनेक दिग्दर्शक नाटककाराला टाळून, तंत्राचा आणि अभिनेत्यांचा वापर करून थकवणारे, डोळे दिपवणारे प्रयोग करतात. आजच्या तरुण प्रेक्षकांना ते आवडतातही.
मुंबईत मराठी नाटकांच्या जोडीने हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा विविध भाषांतल्या नाटकांचे प्रयोग होत असतात. वेगवेगळ्या नाटय़महोत्सवांच्या निमित्ताने देश-परदेशातले वेगळे प्रयोगही बघता येतात. पण सर्वसामान्य मराठी प्रेक्षक अशा परक्या नाटकांना जात नाही. मराठी रंगकर्मीही असे वेगळे प्रयोग बघण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवत नाहीत. अविनाश कोल्हे इतर भाषांत होणाऱ्या प्रयोगांवर लिहितात. इतरत्र रंगभूमीवर होत असलेले बदल समजावून सांगण्याचं महत्त्वाचं कार्य बजावतात. त्यांच्या लेखांतून मराठी प्रेक्षकांनी इतरांचेही प्रयोग बघायला हवेत, ही त्यांना वाटणारी तळमळ सतत जाणवत राहते. हे लेख वाचल्यावर मी स्वत: यातली काही नाटकं पाहू शकलो नाही त्याची चुटपुट लागून राहिली.
अविनाश कोल्हेंची भाषा साधी, सरळ आहे. त्यांची समीक्षा क्लिष्ट परिभाषेत अडकत नाही. ते आपल्या लेखांतून आपण पाहिलेल्या नाटकांचा अनुभव वाचकांना देऊ पाहतात. त्यांच्या अनेक लेखांतून आपण प्रत्यक्ष थिएटरमध्ये बसून तो प्रयोग बघत आहोत असा भास होतो. ते फक्त नाटकाची गोष्ट सांगून थांबत नाहीत, तर अनेक नाटकांचा इतिहासही सांगतात.
अविनाश कोल्हे इराकी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची कहाणी सांगणारं नाटक (‘नाइन पार्टस् ऑफ डिझायर’) समजावण्यासाठी आखाती देशांतील परस्परसंबंध, अमेरिकन हस्तक्षेप, युद्धामागचं राजकारण वगैरे तपशील तर पुरवतातच; पण ‘नाइन पार्टस् ऑफ डिझायर’ या नावामागची गोष्टही सांगतात. ते ब्रेख्त, बर्नार्ड शॉ, दारिओ फोपासून अगदी अलीकडे लिहिणाऱ्या तरुण नाटककारांचा परिचय करून देतात. नाटककारांच्या नाटकांवर लिहिताना त्या- त्या नाटककाराचा परिचय करून द्यायला ते विसरत नाहीत. बर्नार्ड शॉचं ‘अ‍ॅड्रॉलिक्स अँड द लॉयन’ हे नाटक सत्तावन्न पानांचं आहे, पण त्याची प्रस्तावना मात्र अठ्ठावन्न पानांची आहे, आणि शॉ हे विद्वत्तापूर्ण प्रदीर्घ प्रस्तावनांसाठी प्रसिद्ध आहेत, ही गोष्ट ते आवर्जून नोंदवतात.
काही वेळा प्रयोगात पात्रांच्या छोटय़ा छोटय़ा, बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या कृतींमागे केवढा मोठा अर्थ दडलेला असतो, हे ते समजावून सांगतात. नाटकात गोष्ट असते, पण खरं नाटक गोष्टीपल्याड असतं. डोळस, गंभीर प्रेक्षक घडवण्यासाठी अशा समझोत्याची गरज असते. हे लेखन वर्तमानपत्रांसाठी झालेलं असल्यामुळे त्यावर काही मर्यादा पडलेल्या असल्या तरीही हे लेखन महत्त्वाचं वाटतं. अविनाश कोल्हेंनी असेच वेगळ्या भाषांतले प्रयोग आमच्यापर्यंत पोहोचवावेत.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती