आमच्या दहा वर्षांच्या भाचीला मोठं होऊन पाळणाघर सुरू करायचं आहे. घरातून तिला पाठिंबा मिळाला. पण आमच्या ओळखीतल्या एका काकूंना तिची करिअरची ही निवड चमत्कारिक वाटली. त्या हसल्या आणि तिला ‘करेक्ट’ करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ‘‘हं! म्हणजे तुला बालरोगतज्ज्ञ व्हायचंय तर! वाऽऽऽ!’’ यावर विलक्षण ठामपणेआमची भाची म्हणाली, ‘‘नाही. मला लहान मुलं आवडतात. मला त्यांना सांभाळायचं आहे. पाळणाघर म्हणजे ‘डे केअर सेंटर’!’’ काकूंनी तिचा नाद सोडला आणि माझ्या दादा-वहिनीची कींव करणाऱ्या स्वरात म्हणाल्या, ‘‘बघा बाबा, घरात इंजिनीयर्स, सायकॉलॉजिस्ट असताना हे काय भलतंच सुचलंय हिला!’’ आम्ही रमाकडे पाहून डोळे मिचकावले. तिला झटकन कळले की, श्रमप्रतिष्ठा न जाणणाऱ्या आणि अपारंपरिक विचार न करणाऱ्या व्यक्तींपैकीच या काकू! त्यांच्याशी संवाद न नेलेलाच बरा.

या गोष्टीला आता चार वर्षे झाली, पण रमाची करिअर महत्त्वाकांक्षा तीच आहे. ती अधिकच तीव्र झाली आहे. वाढ झाली आहे ती रमाच्या ‘डे-केअर’मध्ये येणाऱ्या मुलांसाठी ती कोणकोणते उपक्रम राबवणार, या कल्पनांची! तिचा हा कल पाहून आम्ही तिला काही आधुनिक पाळणाघरे आणि पारंपरिक पाळणाघरं चालवणाऱ्यांची भेट घालून दिली. रमाने सर्वाचे नीट निरीक्षण केले. हा उपक्रम राबवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात, कोणती आव्हानं व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, किती निष्ठेने काम करावं लागतं, त्यासाठी काय प्रशिक्षण घ्यावे लागते, इ.ची माहिती त्यांनी दिली. ही सर्व माहिती गोळा केल्यावररमाचा विचार अधिकच पक्का झाला. त्यातील अर्थकारणाची चर्चा तिला फारशी समजली नाही, परंतु ती बाजूही या व्यवसायात अनिवार्य आहे, हे तिच्या लक्षात आलं. रमा पुढे हा ‘व्यवसाय’ करिअर म्हणून निवडेल की नाही, ही पुढची  गोष्ट आहे. परंतु तिचा जो काही निर्णय असेल तो मिळवलेल्या माहितीवर, त्यात कार्यरत व्यावसायिकांच्या अनुभवाधारे, स्वत:च्या गुण व क्षमतांचे योग्य मूल्यमापन करूनच ती घेईल यात शंका नाही.

economic survey report uncertainty in job sector due to ai
‘एआय’मुळे नोकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचा इशारा
principles of the indian Constitution
संविधानभान : उदारमतवादी मार्गदर्शक तत्त्वे
day longer climate change
रात्रीपेक्षा दिवस का मोठा होत आहे? वैज्ञानिकांनी सांगितलं धक्कादायक कारण
UPSC Success Story Meet man who faced financial difficulties in childhood
UPSC Success Story: अपयश म्हणजे अंत नाही; परिस्थितीवर मात करत पठ्ठ्या कसा झाला आयएएस अधिकारी वाचा
pm narendra modi vienna visit
“भारतानं जगाला बुद्ध दिला, युद्ध नव्हे”, पंतप्रधान मोदींचा व्हिएन्नातील भारतीयांशी संवाद; म्हणाले, “हजारो वर्षांपासून…”
corruption in awarding tenders corruption in mumbai civic body heavy rains bring mumbai to a halt
अग्रलेख : टेंडर प्रजासत्ताक!
Japan Supreme Court ordered compensation for victims of forced sterilisation
जबरदस्तीने नसबंदीचा ‘तो’ कायदा असंवैधानिक; जपानमधील हा निर्णय महत्त्वपूर्ण का मानला जातोय?
What are India guidelines for heart disease patients
हृदयविकार रुग्णांसाठी भारताची मार्गदर्शक तत्त्वे कोणती?

यावरून आपल्या लक्षात येईल की, करिअर हे केवळ शिक्षण पूर्ण केलं, पोटापाण्यापुरता नोकरी-व्यवसाय निवडला/ केला, की सगळं मार्गी लागलं असं नाही. कारण असं मानणं म्हणजे बसमध्ये नुसतं पाऊल ठेवताच ‘गावाला पोहोचलो’ असं म्हणण्यासारखं आहे. करिअर ही एक बहुरंगी संकल्पना आणि सखोल प्रक्रिया आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवी मूलभूत गरजांच्या यादीत आता स्वास्थ्य, शिक्षण आणि करिअरचाही समावेश झाला आहे. या सर्व गरजा एकमेकींशी संलग्न आहेत. या गरजांमध्ये करिअरचे विशेष स्थान आहे. करिअर मनुष्याला आपली जीवनशैली आखण्यास मदत करते. हातावर पोट असणाऱ्यांना ही संधी मिळणे कठीण.

लहान मुलं कळत-नकळत विविध व्यावसायिकांचं अनुकरण करताना दिसतात; ज्याला आपण ‘pretend play’ असं म्हणतो. कोणी शेफ बनतात, तर कोणी ब्युटिशियन्स, कोणी कलाकार, तर कोणी गृहिणी-गृहस्थ. कोणी खेळाडू, तर कोणी शिक्षक. ही मुलं त्यांनी पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले व्यवसाय आणि त्यातील कार्यपद्धतीचे हुबेहूब अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्यांच्या निरीक्षणक्षमतेची, आकलनशक्तीची आणि कल्पनाशक्तीची ओळख होते. आपण त्यांना प्रोत्साहन देतो. ते जरूर द्यावे. त्यांच्याशी त्यांना समजेल-उमजेल अशा पद्धतीने चर्चा करावी, त्यांची बाजू ऐकून घ्यावी, त्यांना माहिती द्यावी. त्यांना त्या व्यावसायिकांची भेट घडवून द्यावी. आपल्या अशा प्रोत्साहनामुळे मुलं या गोष्टींबद्दल अधिक जागरूक होतात. पालक म्हणून आपल्याला या विषयाबद्दल आस्था आहे, सजगता आहे, जबाबदारीची जाणीव आहे, हे त्यांना जाणवते आणि याची त्यांना नकळत शिकवणही मिळते. त्यातून त्यांचीही मानसिकता या दिशेने घडण्यासाठी मदत होण्याची शक्यता वाढते. या तालमीत तयार झालेली मुलं पालकांशी खुला संवाद झाल्यामुळे करिअरकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मनमोकळेपणाने सांगतात, त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मागतात.

किशोरवयाचा आणि करिअरचा विशेष संबंध असतो. साधारणत: याचवेळी मुलांची बुद्धिमत्ता चाचणीद्वारे करिअरसंबंधीची रूपरेषा आखली जाते. या चाचण्यांमध्ये साधारण बौद्धिक क्षमता (general mental ability), आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व पैलूंचा आढावा आणि अभिवृत्ती (Aptitude) यांच्या मूल्यमापनाचा समावेश असावा. त्याचबरोबर जीवनमूल्ये, चारित्र्य, व्यक्तित्व, बलस्थान, गुण यांच्या मूल्यमापनावरही भर असावा. हे मूल्यमापन शास्त्रीय चाचण्यांधारे करावे आणि तेही प्रशिक्षित मानसिक आरोग्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. या चाचण्या त्यामुळे बऱ्याच अंशी विश्वसनीय ठरतात. अर्थात चाचण्यांची निवड आणि त्यांचे (अंकरूपी) निकाल यांच्या विश्लेषणाची जबाबदारी तज्ज्ञांवर सोपवावी आणि त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. आपले पालक व शिक्षकांचीही आपल्या क्षमता, त्रुटी, आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व आणि करिअर निवडण्याबाबत काही मतं असतात. तीही त्यांच्या निरीक्षणातून तयार झालेली! त्यांचे महत्त्व निश्चित आहे. परंतु क्वचित् प्रसंगी त्यांच्या मतांमागे त्यांची स्वत:ची (अधुरी) स्वप्ने, अनुभव असतात. त्यात कधी कधी अनवधानाने टोकाचा, पक्षपाती, एकतर्फी दृष्टिकोन असू शकतो. त्यामुळे निर्णय बाधित होऊ शकतो. म्हणून त्यांच्या मताचा आदर ठेवून, वस्तुस्थितीनिष्ठ सल्ल्यांचा समावेश करून वैज्ञानिक चाचण्या केल्या जाव्यात. म्हणजेच वैयक्तिक मते आणि शास्त्रीय निकष या दोन्हींवर ही प्रक्रिया आखावी.

कोणतीही करिअरनिवड यशस्वी करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज असते. ती ही की, प्रत्येक करिअरचे आपले असे विशेष स्वरूप असते. ढाचा असतो. कार्यपद्धती असते. अपेक्षा व मागण्या असतात. आणि या सगळ्याच्या अनुषंगाने तयारी, मानसिकता आणि साजेसे असणारे लोक त्या करिअरनिवडीत चपखल बसतात, स्थिरावतात, प्रगती करतात, समाधानी असतात.

यावरून आपल्या लक्षात येईल की, करिअर पर्याय निवडताना यांसारख्या बाबींचा आवर्जून विचार करणे अनिवार्य ठरते. आपण आपल्या कल्पना, मानसिकता, व्यक्तित्व/व्यक्तिमत्त्व पैलू, मूल्ये, क्षमता, त्रुटी, जीवनशैली, अपेक्षा, इच्छा, कौटुंबिक स्थिती, कल, वारसा, आर्थिक-सामाजिक-भौगोलिक सद्य:स्थिती व अपेक्षित स्थिती इ.चा विचारपूर्वक पाठपुरावा करून आपली निवड योग्य ठरेल अशी आशा निश्चितपणे करू शकतो. परंतु आपण हेही जाणतो की, कोणतीही प्रक्रिया- अगदी कितीही लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक हाताळली तरीही काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. आणि नेमके त्यांचेच वर्चस्व झाले तर संपूर्ण प्रक्रियेवर विपरित परिणाम घडू शकतो. अशावेळी काही गोष्टींची उजळणी करावी. ठरवले त्यापेक्षा काही वेगळे वा विरुद्ध घडले, तरी अशी घटना माझ्याबाबतीतच नाही तर इतर कोणाच्याही बाबतीत घडू शकते असा विचार करून कपाळाला हात लावण्यापेक्षा ते प्रयत्नांच्या दिशेने मारावेत. त्याबद्दल शरम वा न्यूनगंड वाटायची गरज नाही. याउलट, निष्क्रियता टाळून, आपली चूक स्वीकारून ती सुधारण्याचे धाडस दाखवल्याबद्दल आनंद बाळगावा. ही नवी प्रक्रिया/ निवड/ निर्णय मनाजोगा आणि वस्तुस्थितीनिष्ठरीत्या फळास येईल, यासाठी मनाशी काहीएक कालावधी ठरवावा. त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करावे. वाजवीपेक्षा अधिक कालावधी लागल्यास परिस्थितीचे अवलोकन करावे, फेरविचार करण्याची गरज आहे का, या दिशेने विचार-आचारप्रक्रिया वळवावी. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आपल्या या पीछेहाटीने निराशा येईल, वाईट वाटेल, हताश वाटेल, पुढेही अपयशच येईल अशी भीतीही वाटू शकेल. या स्वाभाविकरीत्या उद्भवणाऱ्या मानवी भावना आहेत. त्यांचा स्वीकार करावा. स्वत:साठी थोडा वेळ द्यावा आणि नव्या जोमाने प्रक्रिया पुन्हा सुरू करावी. पण यावेळी निराळ्या, नव्या कार्यपद्धती, योजना आखून!

आणखी एक घटना बऱ्याचदा ‘midlife crisis’ च्या स्वरूपात आपल्यासमोर उभी ठाकते. म्हणजे एका करिअरची निवड करून त्यात बराच कालावधी व्यतीत केल्यावर, खुशी/नाखुशीने त्यात कार्यरत राहिल्यावर आपण एके ठिकाणी ‘अडकून’ पडल्याची भावना ग्रासते. त्याचवेळी कुटुंबाच्याही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे करिअरबदलाचा विचार मनात आला तरी घाबरायला होते. ‘इतका मोठा निर्णय घेतला आणि तो चुकला तर?’ ही भीती इतकी तीव्र असते, की बरेच लोक हे पाऊल उचलत नाहीत.  त्यामुळे असा निर्णय घेताना स्वत:च्या मताबरोबर वस्तुस्थिती व कुटुंबाच्या मानसिक तयारीचाही विचार करावा आणि तज्ज्ञांच्या मदतीने योग्य तो निर्णय घ्यावा. अगदी करिअरबदल शक्य नसल्यास सद्य:स्थितीत काय नावीन्य आणता येईल, कोणत्या प्रकारचे बदल घडवून आणता येतील (ज्यामुळे आपला निभाव लागू शकेल!) याचाही विचार करावा.

करिअरबद्दलची ही चर्चा हिमनगाचे केवळ दिसणारे टोक आहे. त्याचे ढोबळ स्वरूप जरी लक्षात आले, तरी प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता, महत्त्वाकांक्षा, इच्छा, अपेक्षा, कौटुंबिक-आर्थिक-सामाजिक बाबी, परिस्थिती निराळ्या असल्याने त्यांच्या विशेष स्वरूपाचाही विचार आपणास करावयाचा आहे.

डॉ. केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)