अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- बाबा पदमनजी!

बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी किंवा भाऊ महाजन यांचे स्फुट निबंधलेखन हे नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहे. पुस्तकरूपाने ते नंतरच्या काळात प्रकाशित झाले. परंतु स्वतंत्ररीत्या निबंध लिहून त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये बाबा पदमनजी यांचे नाव घ्यावे लागते. त्यांनी १८५२ मध्ये स्त्रीसुधारणा या विषयावर मुंबईच्या पुस्तके व निबंध करणाऱ्या मंडळीसाठी ‘स्त्रीविद्याभ्यास निबंध’ लिहिला. या निबंधात त्यांनी पुराणमतवादी वृद्ध आणि नव्या मताचा तरुण यांच्यातील संवादातून स्त्रीशिक्षणाची चर्चा केली आहे. स्त्रीशिक्षण पुरुषांच्या दृष्टीने मुळीच आवश्यक नसल्याचे वृद्धाचे म्हणणे आहे. यावर त्या तरुणाने दिलेले उत्तर असे,

Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Why Women Make More good friends In Office Than Men
कामाच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांची का असते अनेकांबरोबर घनिष्ठ मैत्री?
homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!

‘‘.. आपण ह्मणतां कीं, ‘विद्येच्या योगाने स्त्रिया आपल्या पतीस मानणार नाहींत व त्या व्यभिचारिणी होतील.’ तर हें तुमचें बोलणें केवळ उपहासास्पद आहे; आणि याला कांहीं आधार नाहीं, असें मला वाटतें. तुमच्या शास्त्रांत विद्येचीं जीं स्तुतिपर वाक्यें आहेत, तीं सर्व खोटीं असें सिद्ध करितां. विद्येपासून चांगले व वाईट असीं दोन्ही फळें प्राप्त होतात, हें खरें; परंतु सुविद्या व सुशिक्षा यांचीं फळें वाईट आहेत कीं काय? ‘विद्याददातिविनयं,’ या वाक्याचा आपणास विसर पडला काय? विद्या या शब्दाचा अर्थ ‘जाणणें,’ असा आहे. आणि त्याची व्याप्ती पाहिली असतां, मूल लिपीपासून ईश्वराच्या अपार ज्ञानापर्यंत आहे. आणि दुसरा अर्थ ह्मटला ह्मणजे चोरी करायास शिकणें, हीहि एक विद्या आहे, असें ह्मटलें तरी होतो. परंतु तुह्मास हा भेद समजत नाहीं. ज्या विद्येने मनुष्याचें मन प्रकाशित होतें, जिच्या ज्ञानरूप चक्षूने आपणास या जगांतील कृत्यांत त्यांच्या कर्त्यांचें अपार चातुर्य, कौशल्य, पराक्रम, संकेत, दया, हीं दिसू लागतात, जी, मनाचा गर्व हरण करून, नम्रता आणित्ये, ती विद्या स्त्रियांस शिकविली असतां, त्या आपल्या पतीचा मानभंग करणाऱ्या उद्धट व व्यभिचारिणी अशा होतील कीं काय? नाहीं.. जगांतील सर्व मनुष्यें परमेश्वराच्या पवित्र आज्ञा उल्लंघून भ्रष्ट झालीं आहेत. तेणेकरून त्या सर्वाची अंत:करणें, वासना, कल्पना, कर्मे, हीं पापी आहेत. परंतु आपण हा अर्थ मनांत आणून बोलत नाहींत. आपल्या मतें ईश्वराने स्त्रियांसच दुष्ट स्वभाव दिल्हा आहे, तर असी गोष्ट नाहीं. त्याने स्त्री-पुरुषांचा स्वभाव सारखाच केला आहे, हें अनुमानावरून व प्रत्यक्ष प्रमाणावरून स्पष्ट कळूं येतें.. पुरुषांच्या शरीरांत जें अन्न पाचन होतें, तसेंच स्त्रियांच्याहि शरीरीं होतें; व जसा पुरुषाचे मनास व आत्म्यास विद्या, ज्ञान, बुद्धी, धर्म, यांचा आहार पाहिजे. तसेंच स्त्रियांसहि ज्ञानाचें व धर्माचें खाजें पाहिजे. आणि ते सर्पास पाजलेल्या दुधाप्रमाणें विष व्हावायाचें नाहीं.’’

बाबांचे पूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. त्यांचा जन्म बेळगावचा. तिथल्या मिशन स्कूलमध्ये त्यांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान मिळाले. ते ज्या काळात शिक्षण घेत होते तो काळ इथल्या समाजाला आपल्या धर्माकडे, त्यातील चालीरीतींच्या इष्ट-अनिष्टतेकडे पाहायला लावणारा होता. ‘ज्ञानोदय’, ‘प्रभाकर’ व ‘ज्ञानप्रकाश’ या तीन नियतकालिकांनी ही प्रक्रिया प्रवाही बनवली होती. बाबांनीही त्यांच्या धर्मसंबंधी विचारांना या नियतकालिकांची पाश्र्वभूमी सांगितली आहे. १८५१ ते १८५४ दरम्यान प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘हिंदू लोकांच्या सणाविषयी निबंध’, ‘व्यभिचारनिषेधकबोध’ आदी पुस्तकांतील विचारांवरून याच काळात ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची त्यांची इच्छा अधिकाधिक तीव्र होत गेल्याचे दिसून येते. अखेरीस ३ सप्टेंबर १८५४ रोजी त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. मात्र त्यांच्या पत्नीने धर्मातर करण्यास नकार दिला. धर्मातरासंबंधी तिचे मत अनुकूल करण्यात ते अयशस्वी ठरल्याने १८५७ च्या सुमारास त्यांना तिच्यापासून घटस्फोट घ्यावा लागला. त्याच वर्षी त्यांनी ‘यमुना पर्यटन’ ही कादंबरी लिहिली. तिच्या प्रस्तावनेतील हा अंश –

‘‘या पुस्तकांत विनायकराव व यमुनाबाई यांचें धर्मसंबंधी मत कित्येकास आवडेल व कित्येकास आवडणार नाहीं, आणि कोणीं तर असें म्हणतील कीं, पुनर्विवाहाच्या विषयाशीं त्याचा संबंधच नाही, हें बोलणें जर स्त्रियांस, चिनी लोकांच्या मताप्रमाणे अमर आत्मा नसता तर मात्र मोठय़ा उपयोगास पडते. अथवा या देशातील जनावरांची दु:खें निवारण्याचा उपाय कोणी करील आणि त्यासाठीं पुस्तक रचील तेव्हां घोर्पडय़ांची संजाव घोडी किंवा रामजी पाटलाचा सोम्या बैल आणि गोदावरीबाईची काशी गाई व मल्हारी घनगराची  भवानीब करी व कृष्णा गवळ्याची महाला म्हैस, पुतळाबाईची मैनी मांजर, तमाशेवाल्याची रत्नी पोरी व बहादूर माकड यांची धर्मसंबंधी मतें काय आहेत, यांचा विचार करण्याची गरज नाही असें म्हटले असता चालेल परंतु स्त्रियांस जर आत्मा आहे तर त्यांचे सुख कसे वाढावे व त्याची पुढे अवस्था काय होणार हा विचार केलाच पाहिजे.’’

मराठीतील ही पहिली कादंबरी. यमुनाच्या प्रवासाची ही कथा. यमुना तिचा पती विनायकबरोबर प्रवासाला निघते. तिथे काही हिंदू विधवा त्यांना भेटतात, त्यांची दु:खे त्यांना दिसतात. त्याचे चित्रण या कादंबरीत येते. त्यातील एक उतारा पाहा –

‘‘या विधवांस भ्रतारसुख खेरीज करून दुसरे संसारसंबंधी सुख असावे तेही त्यांच्या स्वप्नी नाही. सारा दिवस मजदूराप्रमाणे कष्ट करावे; आणि एक वेळ घरातील सर्वत्रांची मने राखून अन्न खावे, वर्षांचे काठी दोन रुपयांचे लुगडे व पैशाचे गोपीचंदन असे पाहिजे ते देखील कोणी सासूसासरा दीर वगैरे संतोषाने देत नाहीत आणि ही केव्हा मरेल ही इच्छा करतात. ज्या अगदी गरीब असतात त्यांना लोकांच्या घरी मोलमजुरी करण्यास जावे लागे तेही पुढील दाराने जाऊ नये, मागील दाराने जावे, आणि घरच्या यजमानांनी खुशामत करून काम करावे. रस्त्याने फिरण्यासही तिला लाचारी. कोणी बाहेर जाऊ लागल्यास ती पुढे आली असता अपशकून होतो म्हणून त्या बिचारीस आपले तोंड झाकावे लागते.’’

या कादंबरीबरोबरच बाबांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली. त्यांची संख्या शंभरीपार जाते. ‘उदयप्रभा’, ‘सत्यदीपिका’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. पुढे १८८४ मध्ये त्यांनी ‘अरुणोदय’ या शीर्षकाचे लालित्यपूर्ण आत्मचरित्रही लिहिले. त्यात त्यांच्या जन्मापासून ते बाप्तिस्म्यापर्यंतची हकिगत आली आहे. त्यातील हा उतारा –

‘‘माझा मराठी अभ्यास बेळगांवांतील सरकारी शाळेंत झांला. ही शाळा सन १८३० सांत स्थापिली होती. शाळेची सरकारी मराठी शाळा जागा गांवांतील आदितवार पेठेंत होती तींत खोल्या नव्हत्या. केवळ लांबचे लांब घोडसाळ किंवा उतारशाळेप्रमाणें ती होती. तिला एकच दरवाजा असून पायऱ्या मात्र पुष्कळ व उंच होत्या. शाळेंत घडय़ाळ नव्हतें, सावलीच्या खुणांवरून सुट्टी देत असत. मुलांकरितां सरकारी पाटय़ा होत्या, कोणी मुलें आपल्या घरच्या पाटय़ा आणून तेथेंच ठेवीत. स्लेटीच्या ऐवजी बहुतेक मुलें टिनाचें तगट वापरीत, त्यावर शाईनें हिशेब मांडीत व ते ओल्या फडक्याच्या बोळानें पुसून टाकीत. स्लेटपेन्सलीच्या ऐवजीं ‘बळू’ (कानडी) नांवाच्या मातीच्या तुकडय़ानें लिहित. सणांच्या सुटय़ा फार असत. गांवांत रात्रीं कीर्तन किंवा नाटक झालें असतां जर मुलें दुसरे दिवशीं जागरणामुळें शाळेंत आलीं नाहींत तर त्यास शिक्षा होत नसे. शिक्षेचे प्रकार जुन्या गांवठी शाळेप्रमाणें होते, म्हणजे घोडीवर चढविणें, पाठीवर पाटय़ा ठेवणें, कान धरून उठाबशी करावयास लावणें, जमिनीवर हाताचें एक बोट टेंकावयास व एक पाय मागें उचलावयास लावून ओणवें करणें इत्यादि. वेतानेंहि मुलांस खूब बडवीत. अभ्यास म्हटला तर साधारणच, म्हणजे धूळाक्षर, कित्ते वळविणें, खरडे लिहिणें, मोडी कागद वाचणें असा होता. संध्याकाळी मुलें परवाचा म्हणत. वरच्या वर्गात कांहीं भूगोल, व्याकरण, गणित शिकवित. वाचनाकरितां बालगोष्टी, मनोबोध कथा, इसापनीति, लघुहितोपदेश, सिंहासनबत्तिशी, वेताळपंचविशी, पंचोपाख्यान, मराठय़ांची बखर, इंग्लंदचा इतिहास, बालमित्र, बैठकचावडी, जागतीजोत इत्यादिक पुस्तकें होतीं. व्याकरण शिकविण्यासाठीं बालव्याकरण, (बाळगंगाधर शा. जांभेकर याचें) व दादोबाचें व्याकरण (१ ली आवृत्ति) हीं होतीं. आमच्या अखवानजीला (पंतोजीला) व्याकरण किंवा गणित फार चांगलें नव्हतें, ते ब्राह्मण जातीचे असून त्यांस सही करण्यापुरतें इंग्रजी येत होतें. ते फार लालची होते. मुलास शाळेंत घांलताना सरस्वतीपूजनाच्या निमित्तानें त्यांस शक्तीप्रमाणें पागोटें वगैरे देण्याची तेव्हां चाल होती; निदान काहीं दक्षिणा तरी द्यावी लागत असे; शिवाय शाळेंतील मुलांस मिठाई वगैरे वाटीत. आमच्या गुरुपत्नीनें कधींमधीं सधन आईबापांच्या मुलांस घरीं जेवायास बोलवावें. अब्राह्मण मुलांस दूर ओटय़ावर बसावें लागत असे. इतकेंच नाहीं तर त्यास त्यांच्या उष्टय़ा पत्रावळी बाहेर उचलून टाकून जेवणाची जागा शेणानें सारवून काढावी लागत असे. ही जेवणावळ स्वार्थाची असे. मुलांस आमच्या गुरुपत्नीस भोजनाच्या दामदुप्पट दक्षिणा, चोळखण वगैरे द्यावें लागत असे.’’

हे आत्मचरित्र आवर्जून वाचावेच. याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले ‘बाबा पदमनजी – काल व कर्तृत्व’ हे डॉ. के. सी. कऱ्हाडकरांनी लिहिलेले चरित्रही वाचायला हवे. बाबा पदमनजी हे रसायन समजून घेण्यासाठी ते उपयोगी पडणारे आहे.

संकलन – प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com