‘राशिद.. कुछ अच्छा सुना यार!’’ नानाची (पाटेकर) प्रेमळ दरडावणी ऐकून फोनच्या त्या बाजूला असलेले उस्ताद राशिद खान चक्क बंदिश गाऊ लागले.. नानानी मुद्दाम फोन स्पीकरवर ठेवला होता- मी हरखून ऐकतच राहिलो! साक्षात पंडित भीमसेन जोशी यांनी ज्या व्यक्तीला आपली गादी चालवण्याचा अधिकार दिला होता, ते रामपूर सहसवान घराण्याचे उस्ताद राशिद खान चक्क मित्राच्या विनंतीवरून तानपुरा वगैरे न लावता फोनवर गात होते! खाँसाहेबांचं गाणं झाल्यावर नानानी त्यांना माझ्याविषयी सांगितलं, आणि फोन माझ्याकडे देत म्हटलं, ‘‘बोल!’’ मी थरथरतच फोन घेतला आणि जरा भीत भीतच बोलू लागलो. ‘बिग फॅन मोमेंट’ का काय म्हणतात ते झालं होतं माझं! मी विनम्रपणे खाँसाहेबांकडून त्यांचा नंबर आणि पुण्यात कार्यक्रम असेल तेव्हा नक्की भेटू असं वचन घेतलं आणि हो- नानाचे दहा वेळा आभार मानले. ही घटना असेल साधारण २००२ सालची.

काही महिन्यांतच उस्तादांचा कार्यक्रम पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात असल्याचं कळलं आणि मी जरा बिचकतच त्यांना फोन केला. न जाणो एवढा मोठा कलाकार स्वत: फोन घेईल की त्यांच्या वतीने कोणी सेक्रेटरी? उस्तादांनी स्वत:च फोन घेतला. मी ओळख दिली. त्यांचा फोनवरचा खर्जातला, पण मैत्रीपूर्ण स्वर ऐकून मी सैलावलो. ‘‘आप से मिलने के लिये थिएटर पे आ सकता हूँ?’’ या प्रश्नावर त्यांनी ‘यात विचारण्यासारखं काय आहे?’ या स्वरात मला यायला सांगितलं. मी उत्साहाने कार्यक्रमाच्या वेळेआधीच नाट्यगृहावर पोहोचलो, आणि खाँसाहेबांना शोधत शोधत ग्रीन रूमपर्यंत पोहोचलो. कॉलेजच्या दिवसांत सवाई गंधर्व महोत्सव आणि इतर शास्त्रीय गायन, वादनाच्या कार्यक्रमाला वेळोवेळी हजेरी लावत असल्यामुळे शास्त्रीय कलाकारांचा आब, त्यांच्या आजूबाजूला असलेली शिष्यगणांची आणि चाहत्यांची लगबग मी बघितलेली होती. खाँसाहेबांच्या आजूबाजूलाही अशीच वर्दळ असेल असं गृहीत धरून मी दरवाजावर टकटक करून ते असलेल्या मेकअप रूममध्ये शिरलो आणि बघतो तर काय, त्या मेकअप रूमच्या मध्यभागी सतरंजीवर एक माणूस मांडी घालून पान लावत बसला होता- मी चमकून बघितलं. हेच उस्ताद राशिद खान आहेत? चाहत्यांचा, शिष्यांचा गराडा सोडाच, त्या खोलीत ते सोडून दुसरं कुणीही नव्हतं- मी अदबीनं म्हटलं, ‘‘खाँसाहाब, मैं राहुल.’’

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी

‘‘अरे राहुलभाई पधारो.’’ आणि सतरंजीवर थाप मारत म्हणाले, ‘‘बैठो! पान खाओगे?’’ त्यांच्या या मैत्रीपूर्ण आमंत्रणाचा तत्काळ स्वीकार करून मी लगेचच त्यांच्यासमोर मांडी घालून बसलो आणि उस्तादांनी स्वत:च्या हातानं बनवलेलं पान चघळू लागलो! त्या क्षणी आमची मैत्री झाली आणि आम्ही ‘आप’ से ‘तुम’ झालो!

त्या पहिल्या भेटीपासून झालेली आमची मैत्री जवळजवळ २२-२३ वर्ष अबाधित राहिली. राशिद खान हा अत्यंत मनमोकळा आणि दिलखुलास माणूस होता. त्याच्यात एक लहान मूल दडलेलं होतं. जसजशी आमची ओळख वाढत गेली, तसतसा आमच्यातला स्नेहदेखील वाढत गेला. गाणं हेच आयुष्य असलेल्या उस्तादला लहानपणी गायक बनण्याची कणभरसुद्धा इच्छा नव्हती, हे त्यांनी मला सांगितल्यावर मला महद्आश्चर्य वाटलं होतं. बदायुन (उत्तर प्रदेश)मध्ये जन्म झालेल्या आणि वाढलेल्या राशिदनं आपल्या आईच्या काकांकडे (उस्ताद निसार हुसैन खाँ) गायनाचं खडतर शिक्षण घ्यायला सुरुवात केली- ज्याचा त्याला प्रचंड कंटाळा होता. (पहाटे चारपासून संध्याकाळी सहापर्यंत एकच सूर लावायचा रियाझ करायचा असेल तर कोणालाही कंटाळा येईल!) नंतर काही वर्ष त्याला मुंबईला आपल्या मामांकडून (उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ) तालीम मिळाली. काही वर्ष राशिद साहेबांची गायनाच्या शिक्षणाची गाडी अशीच ढकलावी लागली, पण आवाज फुटल्यानंतर तो गाणं म्हणण्याची मजा घेऊ लागला. राशिद १४ वर्षांचा असताना निसारआजोबा त्याला आपल्याबरोबर कलकत्त्याच्या आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमीत घेऊन गेले. कलकत्त्यात त्याचा जीवही रमला आणि गाण्याची गोडीही लागली. अखेरच्या श्वासापर्यंत राशिद खाननं कलकत्त्यालाच आपलं घर मानलं.

२००४ साली ‘पुणे फेस्टिव्हल’ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत रंगा गोडबोलेनं मला एका मैफिलीचं आयोजन करायला दिलं. संपूर्ण संध्याकाळ ‘मल्हार’ रागावर आधारित रचना सादर कराव्यात अशी कल्पना मी मांडली. प्राची शहाचं नृत्य, पं. शिवकुमार शर्मा यांचं वादन आणि उस्ताद राशिद खान यांचं गायन- सगळय़ा सादरीकरणाचं मूळ राग मल्हार – असा कार्यक्रम ठरला. मी स्वत: कलाकारांशी संपर्क साधून संयोजनाचं काम करत असल्यामुळे त्या वेळेस माझी खाँसाहेबांबरोबरची मैत्री द्विगुणित झाली. प्रत्येक भेटीत त्यांचा जमिनीवर पाय असलेला स्वभाव अधोरेखित होत राहिला. २००६ साली चाळिशीच्या आतच, उस्ताद राशिद खान यांच्या पुढे ‘पद्मश्री’ हे बिरूद लागलं, पण त्यांचा अहं फोफावला नाही- बहरलं, ते गाणं!

राशिद भाईंना कुठलाही संगीत प्रकार वज्र्य नव्हता. त्यांना गायला मनापासून आवडायचं आणि हेच सत्य होतं. मैफिलीत त्यांनी लावलेला पहिला स्वरच इतका दमदार असायचा, की तो ऐकून अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहायचे. त्यांचा आवाज आणि सुरांची समज ही दैवी देणगी तर त्यांना होतीच, पण पहाटे चार वाजल्यापासून एकाच स्वराचा केलेला रियाझदेखील कारणीभूत होता. आवाजाची दैवी देणगी असली तरी गळय़ातली फिरत आणि समेवर येण्याचं कसब हे कमवावंच लागतं. चारपट लयीतली तान घेऊन राशिदभाई समेवर आले की श्रोते टाळय़ांचा कडकडाट करत. उस्ताद शास्त्रीय मैफिली गाजवत होतेच, पण २००७ साली ‘जब वी मेट’मधलं संदेश शांडिल्यचं संगीत असलेलं ‘आओगे जब तुम साजना’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं आणि ते अक्षरश: घराघरांत पोहोचले.

२०१५ साली मी त्यांच्याबरोबर पहिलं ध्वनिमुद्रण केलं. निमित्त होतं विजयाबाई (मेहता) यांच्या ‘हमीदाबाई की कोठी’ या हिंदी नाटकाचं. विजयाबाईंना मी सुचवलं की पार्श्वसंगीतात आपण नाटकातल्या खाँसाहेबांचा आवाज आलापाच्या स्वरूपात वापरू या. ‘‘असा दमदार आवाज कोणाचा आहे? कोण गाईल?’’ विजयाबाईंना पडलेला प्रश्न. मी म्हटलं, ‘‘माझ्या डोळय़ासमोर एकच आवाज आहे- उस्ताद राशिद खान!’’

‘‘एवढा मोठा शास्त्रीय गायक नाटकात कशाला गाईल?’’- इति विजयाबाई.

मी म्हटलं, ‘‘उस्ताद माझे मित्र आहेत. मी सांगतो त्यांना.’’ आणि एक दिवस उस्ताद स्टुडिओत आले. ‘‘बोलो भाई. क्या क्या गाना है?’’ मी दोन दोन मिनिटांचे चार राग आणि एक ठुमरी करायचं ठरवलेलं होतं. ‘पुरिया धनाश्री’, ‘यमन’, ‘चारुकेशी’ आणि ‘दरबारी’ असे चार रागातले आलाप आणि एक ठुमरी- हे सगळं उस्ताद पाठोपाठ गायले! आणि अर्थातच कमाल गायले!! दोन मिनिटांत स्वरमंडलचे स्वर रागाप्रमाणे बदलले की उस्ताद टेकसाठी तयार. या रागातून त्या रागात कसा जाऊ? मूड बनला तर पाहिजे.. वगैरे कुठल्याही प्रकारचे नखरे नाहीत. मला वाटतं, स्वत:च्या गाण्यावरचा आत्मविश्वास आणि आवाजावर कमावलेली प्रचंड हुकमत या गुणांमुळेच हे त्यांना शक्य होतं. बरं हे सगळं हसत-खेळत, विनोद करत चाललेलं होतं. स्टुडिओच्या मॉनिटर रूममध्ये बसलेल्या विजयाबाई आणि रेकॉर्डिगला हजर असलेले इतर ‘राशिद खान फॅन्स’ कमालीचे खूश होते.

दरवर्षी १ जुलै उजाडताच मी राशिदभाईंना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असे. तेदेखील आवर्जून माझ्या मोठय़ा मुलाला (यशला) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत. आमची मैत्री जशी गाण्यात होती, तशीच खाण्यातही होती. विविध ठिकाणचे चविष्ट पदार्थ खाण्याची खाँसाहेबांना प्रचंड आवड होती. ‘गाना और खाना- इसीके लिये हम तो जीते हैं भाई’ हे त्यांचं कायम म्हणणं असायचं. उत्तम गवय्या आणि उत्तम खवय्या अशी त्यांची सर्वदूर ओळख होती.

उस्ताद राशिद खान आणि शंकर महादेवन यांचा एकत्रित कार्यक्रम मी २०१८ साली ‘दि मास्टर्स’ या नावाने षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रम हाऊसफुल होता हे सांगायला नकोच. दुसऱ्या कलाकाराप्रति आदर असणं आणि त्याच्या कलेची कदर असणं म्हणजे काय असतं, हे दोघे महारथी एकत्र गायला बसल्यावर पदोपदी दिसत होतं. उस्ताद आणि महादेवन- दोघंही अत्यंत गुणी गायक तर आहेतच, पण माणूस म्हणूनही महान आहेत. दोघांनी एकमेकांना पूरक गाणं गाऊन षण्मुखानंदमध्ये जमलेल्या २८०० श्रोत्यांना प्रचंड आनंद दिला. पुढे ‘प्लॅनेट’ मराठीसाठी पंडित भीमसेन जोशी यांच्या आयुष्यावर आधारित ‘भीमण्णा’ नावाचा कार्यक्रम मी केला, तेव्हा भीमसेनजींचा शिष्य नसूनही त्यांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या राशिदभाईंनी आपल्या अनभिषिक्त गुरूला त्यांच्या बंदिशी गाऊन मानवंदना दिली.

‘लोकसत्ता गप्पां’च्या निमित्तानं मला राशिदभाईंची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. पण प्रेक्षकांसमोर बोलताना ते जुजबी बोलत असत. ‘‘मुझे जो कहना है, वो मैं गाने में कहुंगा.’’ असा त्यांचा बाणा असे! २०२२ मध्ये उस्ताद राशिद खान आणि कौशिकी चक्रवर्ती यांचाही एकत्रित कार्यक्रम करण्याचं भाग्य मला लाभलं. या प्रत्येक कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भेटींमधून आमची मैत्री दृढ होत गेली; नव्हे, मी त्यांच्या घरातलाच एक सदस्य झालो.
३० डिसेंबर २०२१ला उस्तादच्या चिरंजीवाचं- अर्मान राशिद खानचं, त्यांच्या कलकत्त्याच्या घरीच एका छोटेखानी समारंभात गंडाबंधन झालं. मला या सोहळय़ात ताजला (अर्मानचं लाडाचं नाव) आशीर्वाद देण्यासाठी खास आमंत्रण होतं. राशिदभाईंची पत्नी जोयिता आणि अर्मानच्या दोन्ही मोठय़ा बहिणी सोहा आणि शाओना जातीनं जमलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करत होत्या. राशिदभाईंनी अर्मानला गंडा बांधला. बरेली शरीफ दग्र्याचे ‘साहेबे सज्जादा सरकार मेहंदी मियां नियाजी’ आणि काशीच्या संकटमोचन हनुमान मंदिराचे विश्वंभर शास्त्री या दोघांच्या हस्ते अर्मानला शाही स्नान घालण्यात आलं. राशिद खान संगीत हा एकच धर्म मानत होते याचं यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकेल?

बोस्टनस्थित अनुराधा (जुजु) पालाकुर्ती आरती अंकलीकर यांच्या शिष्या आहेत आणि उत्तम गातात. अनुराधाबरोबर राशिद खान युगुल गीत गातील का, अशी विचारणा मला प्रशांत पालाकुर्ती यांनी केली. मी त्या गाण्याचं संगीत दिग्दर्शन करावं अशी प्रशांतची इच्छा होती. मी राशिदभाईंना विचारलं तर ते लगेचच तयार झाले. मला या माणसाची खरोखर कमाल वाटली. ही गायिका कोण आहे? मी भारतातला मोठा पद्मभूषित शास्त्रीय गायक असूनही तिच्याबरोबर मी गायलो तर माझी पत कमी होईल का? वगैरे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. राहुलभाई गाणं करतो आहे म्हटल्यावर ते निश्चिंत होते. गाणं सुंदर झालं. राशिदभाईंना मी ते ऐकवलं असता त्यांनी मुक्त कंठानं अनुराधाच्या गाण्याची स्तुती केली. हे गाणं या वर्षी प्रदर्शित होईल. पण ते लोकांसमोर येण्याआधीच राशिदभाई निवर्तले ही खंत सतत माझ्या मनात राहील.

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गाणाऱ्या एका प्रतिभावान गायकाला आपण मुकलो आहोत याचं शल्य आपल्या सगळय़ांच्या मनात कायम राहील यात शंका नाही. पण माझ्या मनात मात्र एक मोठय़ा मनाचा, अवखळ स्वभावाचा, अत्यंत गुणी मित्र गमावल्याचं डोंगराएवढं दु:ख आयुष्यभर घर करून राहील.

(लेखक संगीतकार आहेत.)

rahul@rahulranade.com