समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर उत्तम कथालेखकाला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती असलेले आणि लिखाणात विविध प्रयोग करणारे ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही दुसरी कथा. तिसरी कथा पुढील रविवारी प्रसिद्ध करण्यात येईल.

म्हणा,
‘‘देश काँग्रेसमुक्त करण्यात इतका गुंतलो की दुप्पट उत्पन्न हे सतत मनात असूनही साधले नाही.’’
म्हणा,
‘‘नेहमी रोज सकाळी जाग आल्यावर मला आठवायचे… दुप्पट उत्पन्न करायचंय.’’
म्हणा,
‘‘सकाळी योगासने करताना, मोरांना खाऊ घालताना, नाश्ता करताना, दुपारचे जेवण घेताना, रात्री जेवण घेताना, रात्री झोपी जाताना, झोपेत दचकून जाग यायची… दुप्पट उत्पन्न… राहातेय.’’

म्हणा,
‘‘दिवसभरात सात वेळा कपडे बदलताना जाणवायचे… दुप्पट उत्पन्न राहातेय.’’
म्हणा,
‘‘देशात, परदेशात दौरे, चर्चा, भाषणे करताना मध्येच आठवायचे, दुप्पट उत्पन्न…. राहातेय.’’
म्हणा,
‘‘तीनशे सत्तर कलम रद्द करताना, पुतळ्याचे अनावरण करताना, नव्या संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करताना, प्रभू लल्लाची प्राणप्रतिष्ठा करताना… आठवायचे… उत्पन्न दुप्पट करायचेय.’’

हेही वाचा…केवळ योगायोग…!

म्हणा,
‘‘मला दु:ख होतेय, दुप्पट उत्पन्न हे वचन नाही पूर्ण करू शकलो.’’
म्हणा,
‘‘मला अपराधी वाटतेय.’’
म्हणा,
‘‘मोदी सरकारची शपथ घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करीन. नाही केले तर मोदी सत्तेतून पायउतार होतील. ही मोदी गॅरंटी आहे.’’
चूक झाल्यावर माफी मागणे, दिलगिरी व्यक्त करणे, ही सभ्यता होय.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माणसं आणि काळाचे दस्तावेजीकरण

चूक दुरुस्त करण्याची इच्छा असून उपयोग नसतो. चूक दुरुस्त करण्यासाठी शास्त्रीय पद्धत निर्माण करावी लागते. शास्त्रीय पद्धत निर्माण करणे, शोधणे, शोध लावणे ही संस्कृती होय.

मी माफी मागतो, मी दिलगीर आहे, वेळ आली की कुणीही सभ्यतेच्या क्षेत्रात सहज जाऊ शकतो. आदर्श सभ्यतेच्या क्षेत्रात जाणे अवघड असते. त्यासाठी तीव्र संवेदनशीलता आणि तीव्र प्रामाणिकपणा लागतो.
रिसर्च करणे, आधीच शोधलेल्याची कॉपी करणे सोपे असते. नवेच नव्यानेच शोधणे, निर्माण करणे अवघड असते त्यासाठी तीव्र बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम याची आवश्यकता लागते.

आदर्श सभ्यता संस्कृतीला म्हणाली, ‘‘मी अजून अमूर्त आहे.’’
संस्कृती म्हणाली, ‘‘मी थिजून गेलेली आहे.’’
आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘कुठाहेत तीव्र संवदेनशील प्रामाणिक लोक?’’
आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘राजकारण्यांना तीव्र संवेदनशील, प्रामाणिक लोक खपत नाहीत, तीव्र बुद्धिमत्तेचे कठोर परिश्रम करून नवे नवे शोध लावणारे लोक खपत नाहीत.’’
संस्कृती म्हणाली, ‘‘अरेरे.’’

हेही वाचा…‘समजुतीच्या काठाशी…’

आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘तीव्र संवेदनशीलता असणारे, तीव्र बुद्धिमत्ता असणारे, नवे शोध लावणारे लोक हयात असले तरी राजकारणी त्यांना गिनत नाहीत. भूतकाळातल्या तीव्र संवेदनशील, तीव्र बुद्धिमत्तेच्या लोकांना राजकारणी वापरतात. रशिया पुष्कीनला वापरतो. भारत आंबेडकर, गांधी यांना वापरतो.’’

संस्कृती म्हणाली, ‘‘मी भुकेलीच राहणार तर.’’
आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘राजकारण्यांना बऱ्यापैकी बुद्धिमान लोक आवडतात. ते टेक्नॉलॉजिस्ट, टेक्निशियन असतात, ते कॉपी करण्यात हुशार असतात. विकासाला तेच उपयोगाचे असतात ना!’’
संस्कृती म्हणाली, ‘‘असे आहे तर.’’

हेही वाचा…निखळ विनोदाची मेजवानी

आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘लोकशाही आहेच. सर्वसाधारण बुद्धीच्या लोकांना महत्त्व असते.’’
‘‘हं.’’
‘‘लोकशाहीत सर्वसाधारण बुद्धीच्या लोकांवर मोठी जबाबदारी असते.’’
‘‘कशी? कोणती?’’
‘‘दोन जबाबदाऱ्या असतात खरे तर.’’
‘‘सांग. मला उत्सुकता लागलीय.’’
‘‘एक जबाबदारी… राजकारण्यांना, सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर ठेवायचे. सत्तांध होऊ द्यायचे नाही. निवडणुकीत सत्ताधारी वरचेवर मधून मधून तरी बदलायचे. सत्ताधाऱ्यांना तेच कायम सत्ताधारी राहणार अशी भावना त्यांना होऊ द्यायची नाही.’’

हेही वाचा…भाजप आणि दलित राजकारणाचे ‘तुकडेकरण’

‘‘दुसरी जबाबदारी सांग.’’
आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘माणूस काय असतो? कुतूहली असतो. माणसाला कुतूहल असते, विश्व, सृष्टी, जीवन… इथपर्यंत कुतूहल असते. सर्वसाधारण माणसालाही मोठे, गहन कुतूहल असते. सर्वसाधारण माणसाला शोध घेता येत नाही, कुतूहल असतेच. जगताना सुख, दु:खे, अडचणी, संकटे असतात. तरी कुतूहल जागे ठेवायचे… सतत… जिवंत ठेवायचे, रसरशीत जिवंत ठेवायचे… इतके की अस्सल बुद्धिमान्यवर शोध लावण्यासाठी दबाव येईल, प्रेमळ दबाव येईल. लोकशाहीत जनतेवर, सर्वसाधारण लोकांवर ही दुसरी जबाबदारी आहे. माणसाच्या इतिहासात लोकशाहीमुळे ही जबाबदारी प्रथमच सर्वसाधारण माणसावर आलीय.’’

हेही वाचा…बालमैफल: पापडाचं भूत

संस्कृती म्हणाली, ‘‘व्वा! आदर्श सभ्यते, माझ्या प्रिय भगिने, तू सर्वसामान्यांना माझ्याशी निगडित केलेस!… संस्कृती म्हणजे उच्चभ्रूंची असा इतका काळ समज होता. लोकशाही सामान्यांनी कुतूहलांतर्फे माझ्याशी निगडित राहायचे. आनंद. आनंद.’’

lokrang@expressindia.com