जी. के. ऐनापुरे
भीमगीतांच्या शब्दाशब्दांतून बुद्ध आणि आंबेडकर पुढल्या पिढीपर्यंत पोहोचले. एक सबंध पिढीची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चेतना शाहिरांनी घडवली. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गीतं रचून ती गावागावांत लोकप्रिय कशी केली, त्याचा बराचसा इतिहास अज्ञात आहे. आंबेडकरी शाहिरी ही केवळ कला नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीचे ‘चरित्र आणि चारित्र्य’ही आहे… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या जयंतीनिमित्ताने भीमगीतांची परंपरा सांगणाऱ्या दोन बाजू…

१३ एप्रिलची रात्र आणि संपूर्ण १४ एप्रिलचा दिवस, ५ डिसेंबरची रात्र आणि ६ डिसेंबरचा संपूर्ण दिवस ज्या गीतांनी, लोकगीतांनी आणि भीमगीतांनी भारावून टाकतो, त्याचे स्मरण हे नुसतेच स्मरण नसून भूतकाळाला अभिवादन केल्यासारखे असते.

There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..

जिवाला जिवाचं दान, माझ्या भीमानं केलं

शिकून जिवाचं रान, माझ्या भीमानं केलं…

हे गाणे ऐकल्यावर या गीतांनी कोरलेले असंख्य प्रसंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडलेले आहेत, ते आठवत राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी पर्यायी चळवळ उभी केली, त्या चळवळीतून अनेक नव्या स्फूर्तीदायक गोष्टी जन्माला घातल्या गेल्या. या गोष्टींचा प्रसार आणि प्रचार या भीमगीतांमधून झालेला दिसून येतो. ही गीतं सादर करणाऱ्यांची एक फौजच १९४०-५० आणि ६०च्या दशकात अस्तित्वात आली. या फौजेला कुठल्याही प्रकारचा सरकारी आश्रय नव्हता. जे उपलब्ध होईल ते अन्न खाऊन पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे वेळेची तमा न बाळगता, अहोरात्र राज्यातील वाड्या-वस्त्या, झोपडपट्ट्यांतील गल्लीबोळ, बीडीडी चाळी कामगार विभाग अशा अनेक परिसरांतून ही गीतं धमनीतील वाहणाऱ्या रक्ताप्रमाणे वाहत राहिली. त्याचे प्रमुख श्रेय वामनदादा कर्डक, गोविंद म्हशीलकर, श्रावण यशवंते, विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, रोशन सातारकर आदी असंख्य गायकांना आणि अज्ञात असलेल्या गीतकारांना द्यावे लागते. एकूणच पुरोगामी चळवळीचा पाया असलेली ही गीतं तिच्यातील ‘शास्त्रीय’ गायकीमुळे अजरामर झालेली आहेत. भीमाच्या लेखणीचा सन्मान करणारी असंख्य गीतं वामनदादांनी लिहिली आणि गायलीसुद्धा. त्यातील प्रत्येक गाण्यामधील शब्दकळा ही जशी नैसर्गिक आहे, तशी ऐकणाऱ्यांच्या गळ्यातील ताईत होणारीसुद्धा आहेत. आंबेडकरांचा विचारव्यूह अगदी सहजपणे जनमानसामध्ये रुजविण्याचे काम वामनदादांनी केले. शिवाय गावागावांतील लोकांना पाठ होतील अशी लोकगीतं त्यांनी दिली.

संयुुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील त्यांनी लिहिलेले-‘मुंबई आमची थोरं, महाराष्ट्राची पोरं, मुंबईवरती हक्क सांगती, कोण कुठली चोरं’ किंवा ‘बंधू रे शिपाया, तू दे रे रुपाया, चोळीच्या खणाला रं होळीच्या सणाला, कधी कुठे ही झुकली नाही महाराष्ट्राची मान, महाराष्ट्राचा मर्द मराठा होता असा महान’

वामनदादा कर्डक यांच्याबरोबर म्हशीलकर, यशवंते, सातारकर आणि शिंदे यांनी जी गाणी गायली, त्यातल्या काही ओळी सतत आठवत राहतात, जसे की,‘अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा’ किंवा ‘जरी झाला बॅरिस्टर, तरी पडला ना विसर’ किंवा ‘भीमा आवडीनं खाई कांदा भाकर’ किंवा ‘अशी फौज माझी पुढं जात होती’

डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीच्या संदर्भाने येणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे भारतीय राज्यघटनेचे त्यांनी केलेले लेखन आणि बौद्ध धर्माचा स्वीकार. या महत्त्वाच्या गोष्टींना गायकांनी आणि ही गीतं लिहिणाऱ्यांनी जनमानसाच्या मध्यवर्ती, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहारात सोडून दिले. बदलासाठी जी एक यंत्रणा आवश्यक असते, त्या यंत्रणेचा भाग म्हणून त्या गायकांना आणि गीतकारांना आंबेडकरी चळवळीपासून बाजूला करणे केवळ आणि केवळ अशक्य अशी गोष्ट आहे.

डॉ. आंबेडकरांनी या गाण्यांचे महत्त्व स्वत:पुरते समजावून घेतले होते आणि लोकांनाही समजावून सांगितले होते. या गीतांमध्ये जी शुद्धता आहे, ती चळवळीचे मूल्य म्हणून जपली गेली होती. ती सहजपणे प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये शोधता येते. डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करताना प्रल्हाद शिंदे गातात- ‘अरे सागरा, भीम माझा येथे निजला शांत हो जरा’, आणखी एका गाण्यामध्ये प्रल्हाद शिंदे यांच्या गळ्यातून जे स्वर येतात, ते काळजाचा ठाव घेतात. ‘६ डिसेंबर ५६ साली वेळ कशी ती हेरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली.’

डॉ. आंबेडकरांनी धम्म स्वीकारल्यानंतरचा जो दृष्टिकोन होता, तो या गाण्यांतून अजरामर झाला आहे. ‘कणाकणाने ज्ञान वेचून प्रबुद्ध हो मानवा’, किंवा ‘अनुसरा शिकवण बुद्धाची’ हा प्रल्हाद शिंदे गायन पार्टीचा कोरस ऐकून माणूस भानावर आल्याशिवाय राहत नाही.

विठ्ठल उमप यांच्यासारख्या गायकाने ‘जय भीम’ हे शब्द उच्चारतच प्राण सोडला. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा (पान २ वर) गौरव करताना जे गाणे म्हटले आहे, त्याचे स्वर कानाजवळ गुंजत राहतात आणि आपण सहजपणे भूतकाळात जातो. ‘पाहा पाहा मंजुळा, हा माझा भीमरायाचा मळा’

चळवळीची परंपरा नेणाऱ्या अनेक गायन पार्ट्यांनी मुंबईसह राज्यभरामध्ये लोकगीतं आणि भीमगीतांची परंपरा फुलवली. त्याच्या रेकॉर्ड्स आणि कॅसेट्स फिरत राहिल्या. गोविंद म्हशीलकर, अर्जुन भोसले आणि कितीतरी अज्ञात कवी-गीतकारांनी भीमगीतं लिहिली. म्हशीलकर आणि भोसले हे बीडीडी चाळीतले शिलेदार आणि सातरस्त्याचे श्रावण यशवंते. यातील काही कवींना सिगारेटच्या पाकिटाच्या कोऱ्या भागावर गाणी रचण्याची सवय होती. सगळ्यांची गाणी लोकप्रिय झाली, पण नाव काहींचेच पुढे आले. उदा. ‘अलीकडे डोंगर, पलीकडे डोंगर मामाच्या गावाला’ हे गाणे कुणाचे, विचारले तर कुणाला सांगता येणार नाही. म्हशीलकर यांचे हे गीत, मात्र त्यांना ना प्रतिष्ठा मिळाली ना जगन्मान्यता. आयुष्याच्या अखेरीपर्यंत आर्थिक विवंचनेत असलेले ते आणि भीमगीतं, लोकगीतं लिहिणारे अनेक हात अज्ञात राहिले. आता ‘मामाच्या गावाला जाऊया’ या गाण्याचा कर्ता विचाराल, तर अनेकांना ते माहिती, कारण ते अभ्यासक्रमात असल्यामुळे पिढ्यान्पिढ्या लक्षात राहिले. याबरोबर उलट या लोककलावंतांचे झाले.

गिरणी संपाआधीपर्यंत चळवळीच्या गाण्यांची परंपरा कायम होती. ही गाणी गाणारे कलावंत राज्यभरात ओळखले जात. यशवंते, रोशन सातारकर यांची गाणी कित्येकांच्या तोंडपाठ असत. त्यांचे भावव्याकूळ शब्द ऐकून लोक रडत. त्यांच्या तबकड्या रेकॉर्ड्स आणि कॅसेट जपून ठेवत. संपानंतर गिरण्यांच्या परिसरातील मुुंबईच्या वस्त्यांमध्ये राहणारा मोठा वर्ग बाहेर फेकला गेला. गायन पार्ट्यांना ओहोटी लागली. बीडीडी चाळीमध्ये ‘आनंद यादव गायन पार्टी’ होती. सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा जोरदार रियाज चाले. अशा अनेक गायन पार्ट्यांमधून नव्या जुन्या गाण्यांना जी झळाळी आणली जात असे, ते नव्वदोत्तरीत संपायला लागले. त्यांना श्रोतावर्गच उरला नाही.

एकेकाळी ५ डिसेंबर आणि १३ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर सुरू होणारे भीमगीतांचे अद्भुत वातावरण आजच्या काळात मात्र लोप पावल्यासारखे दिसत आहे. आरतीच्या, सिनेमांच्या चालीवर आणि कव्वाली शैलीत भीमगीतं लिहिली गेली. या गायकांची, गीतकारांची परंपरा चालविणारे अनेक जण कार्यरत असले तरी परंपरेचा जो वैचारिक आणि आधुनिक स्वर पूर्वी जसा अनुभवायला मिळत होता, तसा आता मिळत नाही. त्याची जागा विचारांऐवजी व्यावसायिकतेने घेतल्यामुळे चळवळीशी जो समन्वय अभिप्रेत आहे, तो साधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.

या सर्व गीतांचे जतन गीतकार, गायक अशा अंगाने व्हायला हवे. हा सबंध महाराष्ट्राचा अनमोल ठेवा ठरेल. त्यातील काही गाणी तबकडीवर ऐकल्यावर याची खात्री आपल्याला सहजपणे होऊ शकेल. कारण एका गाण्यात पूर्ण काळ उभा करण्याची क्षमता आहे. त्या गाण्यांतील शब्द आणि गायकीच त्यांची महत्ता ठरविणारी आहे. या गीतांचे सौंदर्यशास्त्र कुणीतरी विस्तृतपणे उलगडून सांगायला हवे, असे या निमित्ताने वाटते.

ainapure62@yahoo.com

(लेखक नव्वदोत्तरीतील महत्त्वाचे कथालेखक आहेत.)