लाल पोशाखातला हिरवा माणूस

ओळी म्हणजे नुसती टाळ्याघेऊ, आकर्षक शब्दरचना नाही, तर जगण्यातून बहरलेला हा अनुभव आहे.

कर्मकांडाचं सोवळं नेसून कुलाचार-कुलधर्माच्या पुरणपोळ्या फस्त करणाऱ्या कौटुंबिक वातावरणात रामकाका वाढले.

‘दोस्त हो कोण मी? मी कुणाचा?
भान नाही मला राहिलेले
स्वैर धुंदीत या वादळाच्या
चाललो घेऊनी ‘स्वप्न’गाणे..’
या ओळी म्हणजे नुसती टाळ्याघेऊ, आकर्षक शब्दरचना नाही, तर जगण्यातून बहरलेला हा अनुभव आहे. या शब्दांत एका कार्यकर्त्यां कलंदर कलावंताच्या प्रवासाचे सार अधोरेखित झाले आहे. या कवितेच्या ओळी आहेत राम मुकादम यांच्या. आणि शब्दांत अधोरेखित झालेले प्रवासी आहेत स्वत: राम मुकादमच! ‘कवी राम मुकादम’ यांनी ‘कलावंत राम मुकादम’ यांना इथे नेमकेपणाने शब्दांत पकडलेले आहे.
पांढरेशुभ्र रेशमी केस, भव्य कपाळ, लाल रंगाचा झब्बा-पायजमा, काखोटीला गडद रंगाची झोळी, काळ्या चष्म्यातून डोकावणारे बोलके डोळे आणि रस्त्यात सर्वाची विचारपूस करीत चालल्याप्रमाणे धावणारी निळ्या आकाशी रंगाची लुना. अशी रंगांची उधळण करीत अंबाजोगाईच्या रस्त्यावर फिरताना रामकाकांना मी सर्वप्रथम पाहिले. निवांतपणे शब्दोच्चारण करीत खर्जातल्या आवाजातले रामकाकांचे बोलणे मला ऐकताक्षणी आवडले. कवी, अभिनेता, दिग्दर्शक, गायक, संगीतकार, संगीतज्ञ, वक्ता, संपादक, संयोजक, कार्यकर्ता, संशोधक, अभ्यासक, राजकारणी, आंदोलक, स्वातंत्र्यसैनिक अशा अनेक अंगांनी परिचित असलेले बहुआयामी राम मुकादम होते सगळ्यांचे ‘रामकाका’!
कर्मकांडाचं सोवळं नेसून कुलाचार-कुलधर्माच्या पुरणपोळ्या फस्त करणाऱ्या कौटुंबिक वातावरणात रामकाका वाढले. पण ते स्वत: मात्र सदोदित ‘ओवळ्या’तच होते. बंडखोरी, विद्रोह मुळातच होता. तो जगताना ठायी ठायी प्रगटत गेला. दासोपंतांच्या दत्त-संप्रदायातली गुरूपरंपरा नाकारून रामकाकांनी मार्क्‍सला गुरुपदी बसवले. लहानपणीच्या वातावरणात गुरुचरित्राची पोथी वाचणारा हा माणूस ‘दास कॅपिटल’चा भक्त झाला.
१९४३ साली चळवळीसाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. चळवळीत झोकून दिलेलं कविमन भटकताना त्यांना अलिगढमध्ये घेऊन आलं. तिथून रामकाका काबूलला निघाले होते. पण अचानक घरसंसाराची आठवण झाल्याने ते अंबाजोगाईला परतले. रामकाकांनी संसाराप्रमाणेच अनेक क्षेत्रांत अनेक गोष्टी केल्या, पण ते रमले कशातच नाहीत. आयुष्यभर नोकरी केली नाही. यश हवंय म्हणून एखादं क्षेत्र धरून जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. मनस्वीपणाने अनेक क्षेत्रांत भटकले. पण स्थिरावले कुठंच नाहीत. गुलाल लावला म्हणून त्यांचं कपाळ कधी धार्मिक वाटलं नाही आणि दासोपंतांच्या देवघरात वावरताना त्यांचा निरीश्वरवाद धोक्यात आला नाही. शेतकरी-मजुरांसाठी आंदोलन उभारणारे रामकाका लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंबरोबर चळवळीत फिरलेले आहेत. कम्युनिस्ट पार्टीचे सक्रिय सदस्य असणारे साम्यवादी रामकाका म्हणजे कलासक्त व्यक्तिमत्त्व!
संगीत हा रामकाकांचा ध्यास. नाटकात नमनाला ते स्वत: नांदी म्हणत. प्रसंगानुरूप त्यांनी संगीतावर दिलेली अभ्यासपूर्ण भाषणं, व्याख्यानं ही त्यांच्या संगीतव्यासंगाची साक्ष आहेत. मराठवाडय़ातील संगीत क्षेत्रातील कलावंतांचे ते नुसते प्रशंसक नव्हते, तर खंबीर पाठीराखे होते. पखवाजवादक पद्मश्री कै. शंकरबापू आणेगावकर यांच्याबद्दल भरभरून बोलताना रामकाकांना मी ऐकलं आहे. तारीफ करावी ती रामकाकांनीच. बिनघोरपणा व दिलदारी भाषेतूनच उजागर व्हायची. लोकसंगीताबद्दलही त्यांना आत्मीयता होती. लोकनाटय़ातील लावण्यांवर त्यांनी स्वत: फडात जाऊन अभ्यास केला. रामकाकांनी या लावण्यांच्या चाली, संगीत याबद्दल सप्रयोग दिलेल्या माहितीबद्दल गुरुवर्य यू. म. पठाणांनी गौरवाने लिहिले आहे. साधारणपणे अभ्यासक कागदपत्रं ओलांडून फार पुढं जात नाहीत; पण तमाशात स्वत: कडी वाजवणारे रामकाका कलावंत अभ्यासक होते. कै. भास्करबुवा बखले यांच्या घरंदाज गायकीचं कै. पं. प्रल्हादबुवा जोशी यांच्याकडून रामकाकांनी रीतसर शिक्षण घेतलेलं होतं. जुन्या आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर अनेक वर्षे त्यांनी सुगम गायक म्हणून कार्यक्रम सादर केले. चळवळीच्या कलापथकात बलराज सहानी, हेमंतकुमार असे दिग्गज मागे कोरसमध्ये गात होते तेव्हा रामकाका प्रमुख गायकाची भूमिका करीत होते. त्यांनी संगीताचा उपयोग नाटकात करून घेतला तसा स्वत:मधील कार्यकर्त्यांचा उपयोग करून अनेक संगीत संमेलनांचे यशस्वी आयोजनही केले. संत एकनाथांचे समकालीन असणारे संतकवी दासोपंत यांच्याबद्दल रामकाकांच्या मनात डोळस भक्ती होती. दासोपंतांचा प्रतिभावंत कलावंत म्हणून रामकाकांनीच बहुधा प्रथम विचार केला. दासोपंतांच्या काव्यातील संगीत, ललित कला यांबद्दल रामकाकांना प्रचंड उत्सुकता होती. यासंदर्भाने अभ्यास करून त्यांनी ‘सर्वज्ञ दासोपंत इन् दि फिल्ड ऑफ क्लासिकल म्युझिक अ‍ॅण्ड फाइन आर्ट’ हा इंग्रजीतून ग्रंथही लिहिला. हेतू हा की, दासोपंत सुदूर परिचित व्हावेत. त्यासाठी त्यांनी ‘दासोपंत संशोधन मंडळ’ ही संस्थाही कार्यरत केली. त्यावेळी साम्यवादी विचारांचे रामकाका शेवटी देवघराकडे- दासोपंताकडेच वळले, अशी प्रतिक्रिया मीही ऐकली होती. खरं तर आपलं धोरण स्वच्छ व पक्कं असलं की कुणाचाही विटाळ होऊ नये. रामकाका दासोपंतांकडे वळले त्यामागे त्यांचा हेतूही स्पष्ट होता. कुलाचार-कुलधर्मात अडकलेली दासोपंतांची प्रतिमा एक ललित कलेतला प्रतिभावंत म्हणून रामकाकांना उजागर करायची होती. खाजगीत बोलतानाही दासोपंतांमधील कवी, संगीतकार व चित्रकाराबद्दल ते भरभरून बोलायचे. त्यांची पदं म्हणून दाखवायचे. रामकाकांचा खर्जातला आवाज ऐकताना त्यांच्या गायनाबद्दल मला खूप उत्सुकता वाटली होती. पण संगीतातला, नाटकातला प्रत्यक्ष सहभाग थांबल्यानंतर मी रामकाकांना भेटलो होतो. ‘मुस्लीम राजवटीतच संगीताची खरी भरभराट झाली!’ हा रामकाकांचा विचार काहीजणांना आवडायचा नाही. पण इतिहास असो की वर्तमान- त्याकडे स्वच्छ नजरेने पाहिलं पाहिजे, हा त्यांचा स्वभाव होता.
१९४३ साली कम्युनिसट पक्षाचे कार्डहोल्डर झालेल्या रामकाकांना कॉ. एस. के. वैशंपायन, कॉ. राजबहाद्दूर गौड यांचे मार्गदर्शन लाभले होते. हुतात्मा कॉ. वसंत राक्षसभुवनकर यांच्यासमवेत त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले होते. १९४३ ते १९८७ अशी ४४ वर्षे त्यांनी पार्टीसाठी काम केलं. पण ते कर्मठ कम्युनिस्ट कधीच नव्हते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा सत्याग्रह, मराठवाडा विकास आंदोलन, नामांतर आंदोलन, शेतकरी-शेतमजूर आंदोलन अशा अनेक आंदोलनांत रामकाकांचा पुढाकार होता. प्रसंगी त्यांना तुरुंगवासही झाला. ‘इप्टा’ ही कम्युनिस्ट पार्टीची सांस्कृतिक संघटना. इथेही रामकाका अग्रेसर होते. बलराज सहानी, प्रेम धवन, शैलेंद्र यांच्यासोबत नाटय़क्षेत्रात ते कार्यरत होते. अंबाजोगाईसारख्या गावात त्या काळात कम्युनिस्ट पार्टीसारख्या पक्षाचे दोनमजली कार्यालय उभारण्यामागे रामकाकांची मेहनत आणि निष्ठा होती.
नाटय़क्षेत्रातील रामकाकांची कामगिरी लखलखित आहे. राष्ट्रीय तमाशात भूमिका करणाऱ्या रामकाकांनी ‘कलाकेंद्र’ व ‘कलासंगम’ या नाटय़संस्थांद्वारे तब्बल २५ वर्षे वेगवेगळे नाटय़प्रयोग सादर केले. राज्य नाटय़स्पर्धेत अंबाजोगाईचे नाव ठळक करण्यामागे रामकाकांचे रंगभूमीवरील दर्जेदार सातत्य हेच होते. अशी बहुआयामी कारकीर्द असल्यामुळे रामकाकांना सन्माननीय पदं मिळत गेली. पण त्यामुळे त्यांच्या लुनाचा वेग वाढला नाही आणि कमीही झाला नाही. त्यांच्या झब्बा-पायजम्याचा साम्यवादी लाल रंग बदलून पुढारीछाप पांढरा झाला नाही. (फक्त कधी एखाद्या संगीत मैफलीत फरची टोपी मात्र रामकाका घालायचे.) पु. ल. देशपांडेंच्या जागेवर संगीत नाटक अकादमीचे सदस्यत्व रामकाकांना मिळाले. अकादमीच्या बैठकीत एका सदस्याने ‘भास्कर चंदावरकर कोण?’ असा प्रश्न केला. संगीतकार भास्कर चंदावरकर माहीत नसणे ही गोष्ट रामकाका सहन नाही करू शकले. त्या बैठकीतच त्यांनी अंबाजोगाई स्टाईलने त्या घोर अज्ञानी सदस्याचा समाचार घेतला. त्याला ‘हाबाडा’ दाखवला. बाकी संगीत संमेलनाचे अध्यक्षपद, प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्यत्व अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं, पण त्यांच्यातील कार्यकर्ता कधी हरवला नाही.
रामकाकांमधला कवी त्यांच्या खास कवितावाचनाने सर्वाच्या लक्षात राहिला. त्यांचा ‘बेहोश चालताना’ हा कवितासंग्रह तसा उशिराच आला.
‘माझ्याच प्राक्तनाला वैशाखऊन आले
जेथे विसावलो मी तेथे तूफान झाले’
ही गझल रामकाका त्यांच्या खर्जातल्या आवाजात हमखास पेश करायचे. १९८६-८७ च्या काळात कॉलेजात असताना गझलसारखं काहीतरी लिहायचा मी प्रयत्न केलेला होता. तो रामकाकांच्या गझल ऐकण्याचा माझ्यावरचा परिणाम होता, हे नंतर लक्षात आलं. रामकाकांच्या कवितेतला विद्रोह सोबत एक स्वप्नगाणं घेऊन अवतरतो. नव्याने लिहिणाऱ्याकडे रामकाकांचं विशेष लक्ष असे. आम्हा पोरांना ते आवर्जून कविता वाचायला सांगायचे. प्रोत्साहन द्यायचे. आमच्या नाटय़प्रयोगांना आवर्जून उपस्थित राहून शाब्बासकी द्यायचे. त्यामुळंही रामकाकांशी एक अतूट स्नेह जुळला होता. त्यांची दाद देण्याची पद्धत अनोखी होती. प्रसंगी काही गायकांना त्यांनी सुनावलंही आहे. पुढील शिक्षणासाठी मी औरंगाबादला विद्यापीठात गेलो. तिथं काही कार्यक्रमाच्या निमित्ताने रामकाका यायचे. मी त्यांना मुद्दाम भेटायचो. मग ते स्वत:सोबत रिक्षातून मला फिरवायचे. कवी श्री. दि. इनामदार, शायर बशर नवाज, डॉ. यू. म. पठाण, गायक राजा काळे, नाथराव नेरळकर गुरुजी अशांच्या घरी फेरी व्हायची. अंबाजोगाईला गेलो की रामकाकांना भेटल्याशिवाय येत नसे. पण गेल्या काही वर्षांत रामकाकांनी अंथरूण धरलं होतं. पहिल्यासारखं त्यांचं बोलणं नव्हतं. त्यांचा आवाज, त्यांचं बोलणं ही तर त्यांची ओळख होती. पण आता त्यांनी भरभरून बोलणं सोडलं होतं. खुंटीला टांगून ठेवलेल्या वाद्यासारखी अवस्था होती. खुणेनं चौकशी करायचे. नजरेतलं शून्य जाणवायचं. शेवटी (८ डिसेंबर २००७) रामकाका गेले म्हणून संध्याकाळी मित्राचा फोन आला. अंत्यविधीला पोहचू शकणार नव्हतो म्हणून दुसरे दिवशी भेटायला गेलो. तेव्हा बोलताना रामकाकांच्या मुलाने- अश्विनकुमारने (जो रंगकर्मी मित्र आहे.) काकांबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्यात या शेवटच्या दिवसांत पडल्या पडल्या रामकाका अमिताभचे सिनेमे फार पाहायचे अशी माहिती कळली. निरिच्छ झालेल्या रामकाकांना शेवटी अमिताभचे सिनेमे आवडावेत, या घटनेपाशी मी थबकलो. या घटनेसारखीच रामकाकांबद्दल एक गोष्ट माझ्या लक्षात राहिलेली होती. ती म्हणजे रामकाकांना असलेला पुरणाबद्दलचा राग. घरात जर पुरणाच्या पोळ्या केल्या तर रामकाकांना आवडायचं नाही. पुरणाला ते ‘लिदाऽऽऽड’ (घोडय़ाची विष्ठा) म्हणायचे. पुरणाबद्दलचा राग व या वास्तववादी माणसाला अमिताभचे रोमँटिक सिनेमे आवडणे यामध्ये मी एक आंतरिक सूत्र शोधतो. पुरण हा पदार्थ म्हणून न आवडणे यापेक्षाही पुरणाच्या मागे जो कुलाचार-कुलधर्माचा कर्मकांडी संदर्भ आहे, तो मला महत्त्वाचा वाटतो. उपासना पद्धती म्हणून आजही दासोपंतप्रणीत दत्तसंप्रदायातील काही लोकांचा जोर कुलाचार-कुलधर्माच्या पुरणावरच आहे. या कर्मकांडाचं प्रतीक बनलेल्या पुरणावर रामकाकांचा राग असणं त्यामुळे स्वाभाविक ठरतं.
कशासाठीच उत्सुक नसलेले रामकाका अंथरुणावर पडून अमिताभचे सिनेमे पाहत राहतात, ही घटनाही तपासली पाहिजे. अमिताभ बच्चन हा अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढणारा ‘अँग्री यंग मॅन’ होता. हे पडद्यावरचं स्वप्नरंजन असलं तरी दीड-दोन दशकं अमिताभ नावाच्या नायकाने हिंदी पडदा व्यापलेला होता. अमिताभ खलपुरुषाविरुद्ध पडद्यावर पेटून उठायचा तेव्हा थेटरात टाळ्या-शिट्टय़ा आपण ऐकल्या आहेत. खुर्चीत बसलेलं सर्वसामान्य पब्लिक जागच्या जागी प्रफुल्लित व्हायचं. तसाच अंथरुणावर पडल्या पडल्या अमिताभचा विद्रोह रामकाकांच्या मनाला प्रफुल्लित करीत असेल का? रामकाकांच्या थकलेल्या शरीराला हा अन्यायाविरुद्ध टक्कर देणारा नायक मानसिक आनंद देत असेल का? कदाचित असंच घडत असावं. कारण शरीराने थकलेल्या रामकाकांचं मन कवी-कार्यकर्त्यांचं होतं. ते मन गलितगात्र होणं कधीच शक्य नव्हतं. सामाजिक , राजकीय किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची कुणी नोंद घ्यावी अशी त्यांची इच्छा नव्हती आणि हेतूही नव्हता. त्यामुळे तक्रारही नव्हती. जगण्याच्या धडपडीत बधिर होणे आणि मनस्वी जगताना बेहोश होणे, यातला फरक ज्यांना कळलाय त्यांना रामकाका सहज कळू शकतात.

दासू वैद्य
dasoovaidya@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on ram mukadam