|| कुलवंतसिंग कोहली

परवा मी लोणावळ्याला मोटारीने चाललो होतो. कार भराभरा मार्गक्रमण करत होती. मला लोणावळ्याचा परिसर नेहमीच मोहवतो. पावसाळ्यात तर हिरवेगार पातळ नेसलेल्या सुस्नात सुंदरीप्रमाणे भासणारे डोंगर, त्यावर पांढऱ्याशुभ्र मौक्तिकमाळांसारखे सजणारे झरे आणि आईच्या कुशीत लपलेल्या बाळासारखे ‘कूऽऽक’ करत मधेच डोकावणारे टुमदार बंगले पाहत प्रवास करायला मला फार आवडतं. निसर्गाच्या कुशीत जाऊन आरामखुर्चीत पडलं की बिजीच्या (आई) मांडीवर असल्याचा भास होतो. कोणीच अवतीभवती नसतं. फक्त आपण आणि आपलं मन. स्वतत मग्न व्हायचं. आणि शांतही!

Multiple local Derailment, Prompt Speed Limit Enforcement, Harbor Line Commuters Face Delays, Harbor Line, local travlers, csmt, central railway, Mumbai local, Mumbai local Derailment, Speed Limit Enforcement on local, Mumbai news,
हार्बर मार्ग विस्कळीत एका मागे एक लोकल उभ्या
mumbai, Sea Coast Road,
मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल
Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू

तर- माझी कार लोणावळ्याच्या दिशेनं जाताना सारखी सिग्नलला थांबत होती. मी बाहेर पाहत होतो. पूर्वी गाडी सायन सर्कलला वळसा घालून जायची. आता ती हवेतून (म्हणजे पुलावरून!) जाते. गर्दी टाळायला केलेला उपाय नवी गर्दी निर्माण करतो. चेंबूर नाक्यावरून जरा पुढे गेलो अन् उजवीकडे दिसला- आर. के. स्टुडिओ! त्या रस्त्यावर आता कितीतरी मार्गिका झाल्यात. परंतु मार्गिका मोडून रिक्षा, मोटारसायकली, कार धावत असतात. सर्व ट्रॅफिक कोलमडतं आणि आपण अडकून पडतो. मीही त्या दिवशी असाच अडकलो. बाहेर पाहत बसलो. एक आठवण मनात जागी झाली अन् गालावर हसू फुटलं. चालकानं विचारलं, ‘‘पापाजी, का हसताय? इथून कधी पुढे जाईन असं झालंय मला.’’

माझ्या मनात एक गमतीदार आठवण जागी झाली होती. १९४८ मध्ये राजजींनी (राज कपूर) ‘आर. के. स्टुडिओ’ स्थापन केला तेव्हा हा रस्ता किती चिंचोळा होता! जेमतेम एक कार जाऊ शकायची. दुसरी कार समोरून आली की एकीला रस्त्यावरून खाली उतरून बाजूला थांबावं लागे. रात्री इथे चिटपाखरूही नसे. त्यामुळे आर.के.तलं चित्रीकरण दिवसाच असायचं. संध्याकाळी इथे शुकशुकाट असायचा. बऱ्याच वेळा चोऱ्यामाऱ्याही व्हायच्या. एकदा एका चित्रीकरणासाठी पोहोचायला ज्येष्ठ अभिनेत्री लीला चिटणीस यांना उशीर झाला होता. त्यांनी आर. के.तच थांबायचं ठरवलं होतं. त्यांचा गाडीचालक इतक्या उशिरा गाडी न्यायला राजी नव्हता. परंतु बाई मोठय़ा धाडसी! त्या म्हणाल्या, ‘‘बघू, काय होतं ते.. चल जाऊ या!’’ गाडी निघाली. चिंचोळ्या रस्त्यावर काळोख झालेला. गाडी धावत होती आणि चोरांनी वाटेत दगड टाकून अचानक गाडी अडवली. लीलाजी गाडीतून उतरल्या. परंतु त्यांना चोर थोडेच ओळखतात? चोर त्यांच्यावर हल्ला करणार तोच मागून एका गाडीचा प्रकाश पडला. चोर बावचळले. मागची गाडी तोपर्यंत तिथं येऊन पोहोचली. त्यातून एक दणकट माणूस उतरला आणि तो लीलाजींच्या मदतीला धावला. तो एक मिलिटरीमन होता. चोर पळून गेले. त्यापाठोपाठ माझी गाडी होती. मी लोणावळ्याला जायला थोडा उशिराच निघालो होतो. घडल्या घटनेबद्दल मी त्यांच्याकडे विचारपूस केली आणि मग आमच्या गाडय़ा सोबतच निघाल्या. लीलाजी आर. के. स्टुडिओत गेल्या, मिलिटरीमन देवनारला आणि मी लोणावळ्याच्या दिशेने! हे सगळं आठवून मी स्वतशी हसलो होतो.

ही झाली तेव्हाची मुंबई! पण आजची मुंबई कशी आहे?

आजची मुंबई बरीचशी बकाल झालीय. गर्दी, गर्दी आणि फक्त गर्दी. कोणालाही थांबायला वेळ नाही. जो-तो स्वत:त मग्न. प्रत्येकालाच पुढं जायचंय. मात्र, त्या पुढे जाण्यात मुंबईचं काय होईल, याचा विचार नाही. माझ्या बालपणीच्या आठवणींतली मुंबई मस्तीखोर होती; पण नखरेल नव्हती. तिच्यासोबत मी खेळत असे. मी तारुण्यात शिरताना ती तरुण होताना मला दिसली. पण ती मादक झाली नव्हती. आज मी वार्धक्यात आलोय. मी कमरेत वाकलो नाहीये. पण ती मात्र कोलमडून पडताना दिसतेय. वाईट वाटतंय. या कोलमडण्यात माझाही सहभाग आहे का, याचा विचार करून मनात भीतीही दाटते. आपण तिला सांभाळायला हवं. परंतु ही जाणीव व्हायला तिच्यावर संकटं कोसळण्याची आपण वाट बघतो. आपण तिच्यावर प्रेम करायला हवं. सगळंच तिच्याकडून घेण्यापेक्षा तिला काही द्यायलाही हवं. मग ती तुमच्यावर प्रेम करेल.

‘प्रीतम’मध्ये कधी कधी ख्यातनाम लेखक पु. ल. देशपांडे येत असत. ते म्हणायचे, ‘‘आपल्या या मुंबईत दोनच ऋतू.. उन्हाळा आणि पावसाळा!’’ उन्हाळ्यात कचकून घाम येतो आणि पावसाळ्यात धुमाकूळ पाऊस पडतो. गेली सात दशकं मी हे अनुभवतो आहे. पूर्वीही खूप पाऊस पडायचा. आताही पडतो. पूर्वीही मुंबई तुंबायची. आताही तुंबते! परंतु पूर्वी पाण्याचा निचरा वेगानं व्हायचा. आता तसं होत नाही. त्याची कारणं आपल्या सर्वानाच ठाऊक आहेत. कसं वागायचं, याची कोणती नियमावलीच आपण बनवलेली नाही. आणि बनवली असेल तर ती पाळली नाही. आपण मुंबईनगरीची लेकरं तिच्यावरच अन्याय करत असतो. मग एखाद्या दिवशी निसर्गच तिच्या वतीनं आपल्यावर प्रकोप धरतो आणि काहीतरी अघटित घडतं.

..त्या दिवशीही असंच झालं होतं. सकाळपासून तुफान पाऊस पडत होता. पण मुंबईचं जीवन नेहमीसारखंच सुरू होतं. बस सुरू होत्या. ट्रेन धावत होती. टॅक्सी चालत होत्या. अकरा वाजेतो मुंबई वेगानं धावत होती. मी, माझी मुलं, माझा स्टाफ आपापल्या कामांत गुंतलो होतो. माझं कार्यालय ‘मिडटाऊन प्रीतम’च्या बेसमेंटमध्ये आहे. तिथं एकदा गेलं की बाहेर काय चाललंय, याचा पत्ताही लागत नाही.

तर त्या २६ जुल २००५ च्या दुपारी १२ च्या सुमारास पावसानं असं काही रौद्र रूप धारण केलं, की विचारता सोय नाही. हळूहळू लोकल बंद पडत गेल्या. रस्त्यावरची वाहनं आधी ससा, मग कासव आणि नंतर मुंगीच्या गतीनं चालू लागली. अन् एका क्षणी ती थांबलीच. थोडय़ा थोडय़ा वेळाने माझे कर्मचारी येऊन सांगत होते, की असं असं बाहेर सुरू आहे! मुंबईत हे  वर्षांतून एकदा तरी घडतंच. त्यामुळे मी नेहमीसारखं काम करत राहिलो. काही वेळानं मला इंटरकॉमवर निरोप आला, की रामानंद सागर यांचे चिरंजीव प्रेम सागर आले आहेत. सोबत त्यांच्या पत्नीही आहेत. मी माझ्या कार्यालयातून बाहेर आलो आणि पाहतो तो काय, तुफान पाऊस पडत होता! रस्त्यावर माणसं घरी जायच्या गडबडीत. मी प्रेम आणि त्याच्या पत्नीचं स्वागत केलं. त्यानं मला सांगितलं की, ‘‘ट्रेन बंद आहेत, रस्ते बंद आहेत. पापाजींना फोन केला, की आम्ही दादरमध्ये अडकलो आहोत. ते म्हणाले, ‘प्रीतम’मध्ये राहा. शेवटी आम्ही तुमच्याकडे आसरा घ्यायचं ठरवलं.’’

‘‘अरे, तुमचंच हॉटेल आहे. राहा आज. मग पाहू,’’ असं मी त्या दोघांना सांगितलं. त्यांची सोय केली. मग मी दरवाजात आलो. बाहेर पाहिलं तेव्हा लक्षात आलं- मुंबईची काय स्थिती आहे ती! आमच्या काचेच्या दाराबाहेर काही स्त्रिया धो-धो पावसात कशाबशा उभ्या होत्या. मी त्यांना आत यायची विनंती केली. बिचकत- बाचकत त्या आत आल्या. त्यांच्यापाठोपाठ काही पुरुषही आले. सगळे लोक कामावरून घरी परतत होते. पण पावसाने अडकून पडले होते.

आमच्या स्टाफला मी विनंती केली की, ‘‘काही टॉवेल्स आणा आणि भिजलेल्या स्त्रियांना द्या.’’ त्या कुडकुडत होत्या. त्यांनी केस पुसले. थोडंसं स्वत:ला आवरलं. मनाला सावरलं. ज्यांचे मोबाइल फोन बंद झाले होते त्यांनी विचारलं, ‘‘आम्ही फोन करू का घरी?’’ टोनी व गोगी दोघेही तिथंच होते. त्यांनी परवानगी दिली. त्यांनी मग भराभरा फोन केले आणि घरी कळवलं- ‘‘आम्ही ‘प्रीतम’मध्ये आहोत. पाऊस ओसरला की येऊ.’’ २०-२५ जण तरी असावेत. चारचा सुमार झाला. आम्ही सर्वाना चहा-कॉफी पाजली. सर्वासाठी सँडविच बनवली.

पाऊस कोसळतच होता. त्याची भयानकता क्षणाक्षणाला वाढत होती. वाहतूक ठप्प झालेली. जनजीवन विस्कळीत झालेलं. कित्येक दशकांनंतर माझ्या कानावर अरबी समुद्राच्या लाटांचा भीषण आवाज ऐकू आला. इतर वेळी हवीहवीशी वाटणारी ती गाज आज नकोशी वाटत होती.

जसजशी संध्याकाळ होत गेली तसतशी ‘प्रीतम’च्या बाहेर माणसांची गर्दी वाढत होती. आमचे कर्मचारी त्यांना आत घेत होते. त्यांना पाणी देत होते. स्टाफ कमी होता, परंतु अशा अडचणीच्या क्षणी माणसांत कामाचं अफाट बळ येतं. आमच्या स्टाफमध्ये तसं बळ आलेलं. त्यातच दिवे गेले. जनरेटर चालू करण्याचा प्रश्नच नव्हता. ‘प्रीतम’च्या पायऱ्या पाण्यात बुडाल्या आणि माझ्या बेसमेंटमधील कार्यालयात पाणी शिरू लागलं. हे कार्यालय म्हणजे ‘प्रीतम’ची जान होतं. तिथं सर्व रेकॉर्ड होतं. जुनी छायाचित्रं होती. संगणक होते. दुर्मीळ चित्रं होती. पाणी भसाभसा आत शिरत होतं. ते काढायचा आम्ही प्रयत्न केला, परंतु ते अशक्यच होतं. त्यात पावसात अडकलेले मुंबईकर आत येत होते. आम्हीही त्यांना आत घेत होतो. माणूस महत्त्वाचा की कागद महत्त्वाचा, असा प्रश्न आमच्यासमोर उभा होता. वाहे गुरूंनी बुद्धी दिली- माणूस वाचवायचा! एकेक येत गेला. असं करता करता किती माणसं आत आली ठाऊक नाही. खालचा संपूर्ण मजला माणसांनी खचाखच भरला होता. स्वागतकक्षातील काप्रेट भिजलं होतं. मी माझ्या पत्नीला मदतीसाठी बोलावलं. ती सुनांसह खाली आली. तिनं स्त्रीसुलभ जागरूकता दाखवून सोबत मेणबत्त्या आणल्या होत्या. ती आल्यावर माझ्या स्त्री-कर्मचारीवर्गात एक वेगळचं बळ आलं आणि अडकलेल्या मुंबईकर स्त्रियांनाही आधार मिळाला.

आम्ही सगळे एकमेकांशी बोलत होतो. हसतखेळत मनावर आलेला असह्य़ ताण कमी करायचा प्रयत्न करत होतो. ती सव्वादोनशे-अडीचशे माणसं एकदिलानं आमच्याकडे आश्रयाला आली होती. त्यातले काहीजण कर्जत, डोंबिवली, विरार, वसईकडले होते. भीषण पावसामुळं ते ‘प्रीतम’मध्ये आले होते. पवित्र ‘गुरू ग्रंथसाहेबा’च्या शिकवणीप्रमाणे ‘सेवा हाच खरा धर्म’! आम्ही त्याचं पालन करत होतो. ही सगळी मंडळी पावसामुळे ‘प्रीतम’मध्ये आली होती. आम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न एकच होता : ढगफुटीमुळे आलेलं हे संकट! त्याला सामोरे जाताना सर्वानीच एकमेकांना साथ दिली.

पण रात्र झाली तरी परिस्थितीत फरक पडेना. पाऊस थांबेचना. मग वडीलकीच्या नात्यानं मी सर्वाना म्हटलं, ‘‘आता कोणीही बाहेर जायचं नाही. इथंच थांबायचं.’’ किचनमधल्या स्टाफला निरोप पाठवला- ‘सर्वासाठी जेवण तयार करा.’ माझ्या घरची माणसंही त्यांना मदत करायला गेली. काही वेळातच जेवण तयार झालं. ‘प्रीतम’च्या पद्धतीचं जेवण आमच्या किचनमध्ये तयार झालं. आम्ही लाऊंजमध्ये ते मांडलं. त्या दिवशी ‘प्रीतम’मध्ये खोली घेऊन राहणारे, पावसात अडकलेले असे सर्वच जण जे काही जेवण तयार झालं होतं त्याकरता जमले. आम्ही- म्हणजे मी, माझं कुटुंब व माझा स्टाफ अशा सर्वानी सर्व पर्जन्यग्रस्तांना आपुलकीनं जेवण वाढलं. आम्हीही तिथंच जेवलो. जेवढी म्हणून अंथरुणं-पांघरुणं आमच्याकडे होती, ती सर्वाना दिली. मग कंबरभर पाण्यातून आम्ही प्रीतम ढाबा माग्रे घरी गेलो. मुलं ‘प्रीतम’मध्येच थांबली.

दुसऱ्या दिवशी सकाळी परिस्थिती थोडीशी सुधारल्यावर माणसं हळूहळू आपापल्या घरी गेली. ट्रेनने जाणारे ट्रेन सुरू झाल्यावर गेले. मुंबईकरांच्या कृतज्ञ स्वभावाप्रमाणे काहींनी आम्हाला पसे देऊ केले. परंतु आम्ही ते घेतले नाहीत. कसे घेणार? या सर्व सज्जनांना परमेश्वरानेच आमच्याकडून सेवा करून घेण्यासाठी पाठवलं होतं आणि आम्हाला त्यांच्या सेवेची संधी दिली होती. आणि हेच महत्त्वाचं होतं. इतर वेळी सदासर्वकाळ व्यवसाय असतोच. परंतु संकटात जो दुसऱ्याला लुटतो तो खरा ‘मुंबईकर’ नव्हेच. आम्ही त्यांना एवढीच विनंती केली, की जेव्हा देवाची प्रार्थना कराल तेव्हा आमच्यासाठीही करा. आम्हाला तेवढं पुरेसं आहे.

दोन-तीन दिवसांनी एका इंग्रजी दैनिकात आमच्या तिघांचं- मी, टोनी व गोगी- छायाचित्र देऊन याविषयीची बातमी छापली गेली. तिचं शीर्षक काहीसं असं होतं- ‘सुलतान ऑफ फूड!’ (नेमके शब्द लक्षात नाहीत.) त्या दैनिकाचे एक बातमीदार त्या दिवशी ‘प्रीतम’मध्ये अडकले होते. त्यांनीच ती बातमी दिली होती. आम्हाला हे माहितीही नव्हतं. माहीत असायचं कारणही नव्हतं. आम्हाला एवढंच माहिती होतं, की माणसानं माणसाच्या उपयोगी पडण्यातच माणूसपणाचं सार्थक आहे. आपला मुंबईकर याबाबतीत खरा ‘माणूस’ आहे! आणि मी मुंबईकरच आहे!!

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर