मतदानानंतर स्वपक्षाचे चिन्ह दाखवून नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची बिनशर्त माफी मागावी, असा उपरोधिक सल्ला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिला आहे. बुधवारी वडोदऱ्यात मतदानानंतर मोदी यांनी मतदान केंद्राबाहेर पडताच भाषण करीत भाजपचे निवडणूक चिन्ह मतदारांना उंचावून दाखविले होते. त्यावर निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनास मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
जेव्हा एखादी व्यक्ती रंगेहाथ पकडली जाते, तेव्हा बचावाचे सारे मार्ग बंद होतात. अशावेळी सरळ माफी मागावी, असा सल्ला देत चिदंबरम यांनी मोदींची खिल्ली उडवली. पराभवाची भीती असल्याने काँग्रेसनेच माझ्याविरोधात कारवाईचे षड्यंत्र रचले, अशी टीका मोदी यांनी केली होती. त्यावर, भाजपने काँग्रेसविरुद्ध कित्येक तक्रारी केल्या. त्यांच्या चुकांचे खापर काँग्रेसवर फोडणे हेदेखील एक षड्यंत्रच आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात देशाची आर्थिक पीछेहाट झाल्याचा भाजप नेते यशवंत सिन्हा यांचा आरोप चिदंबरम यांनी खोडून काढला.