आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अधिक मतदारसंघ मागण्यासाठी भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. मुंबईत भाजपला पाच-सहा अधिकच्या जागा हव्या आहेत. शुक्रवारी झालेल्या मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तसा सूर लावण्यात आल्याचे समजते.
देशात भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज्यातील भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी आतापासूनच त्यांनी व्यूहरचना सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून युतीचे पूर्वीचे जागावाटपाचे सूत्र बदलून भाजपला अधिकचे मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. अशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मुंबईत अधिकच्या जागा मिळाव्यात असा आक्रमक सूर पदाधिकाऱ्यांनी लावल्याचे समजते. मागील निवडणुकीत भाजपने १३ जागा लढविल्या होत्या. या वेळी भाजपला १८ जागा मिळाव्यात अशी मागणी होत आहे. मात्र या बैठकीत अशा प्रकारची चर्चा झाली नाही, असे शेलार यांनी सांगितले. राज्य स्तरावर या विषयावर चर्चा होईल, असे त्यांनी सूचित केले.