कोणतेही राष्ट्र त्या देशातील चारित्र्यसंपन्न नागरिकांवर उभे राहते, या नागरिकांच्या अनेक कर्तव्यांपैकी विवेकपूर्ण मतदान हे एक महत्त्वाचे कार्य आहे. आपल्या प्रत्येक मतातून आपण राष्ट्र घडवत-बनवत आणि बांधत असतो. पण याच मताला विवेकाचा आधार नसल्यास आपलेच राष्ट्र आपण बिघडवतो देखील. जात- पात, धर्म, पंथ, गट-तट, मित्र-नातलग, माझा-आमचा अशा कुठल्याही शिक्क्य़ांपेक्षा चांगले चारित्र्य, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि काम करण्याची धडाडी याचा विचार करत उमेदवार निवडावेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्यांच्याजवळील एकेक मावळा ते अष्टप्रधानांपर्यंतच्या प्रत्येक निवडीत याच निकषांना महत्त्व दिले. यामुळेच ते ‘स्वराज्य’ उभे करू शकले. आज प्रत्येकालाच महाराजांचे ते ‘स्वराज्य’ हवेहवेसे वाटते. पण मग ते येण्यासाठी जागे, जिवंत, सक्रिय राहत नाही. मतदानावेळी आम्ही गाफील राहतो. या गाफीलपणामुळे आमच्यावर इतिहासात अनेक वेळा गुलामीची वेळ आलेली आहे. भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन लोकांची निवड होणे, सत्ता येणे या गोष्टी अशा गाफीलपणातूनच घडतात. आपण कोण उमेदवार निवडून देतो यावर केवळ त्या उमेदवाराचेच नाहीतर आपलेही ‘राष्ट्रीय चारित्र्य’ ठरत असते. मतदानावेळी अनेक ठिकाणी दिसणारा, कानी येणारा खरेदी-विक्रीचा व्यवहार, लोकशाहीचा अनैतिक व्यापार हा तुम्हा प्रत्येकाला भ्रष्ट ठरवतो. अशा मतदानातून, क्षणिक मोहातून तुम्ही तुमच्याच वर्तमान आणि भविष्याचे नुकसान करता.
जगात जी राष्ट्रे मोठी झाली, महासत्ता बनली, त्या प्रत्येक राष्ट्रामधील नागरिकांची मतदानाप्रती असलेली निष्ठा आणि विवेक उघडपणे दिसतो. दुर्दैवाने आमच्याकडे हे दिसत नाही. म्हणून तर विन्स्टन चर्चिल सारखी व्यक्ती आम्हाला, ‘इंडिया इज नॉट अ नेशन, इट इज अ पॉप्युलेशन’ असे म्हणत हिणवते. जगाच्या बाजारात आम्हाला हे सारे खोटे ठरवायचे असेल, आम्हाला सिद्ध करायचे असेल आणि एक चारित्र्यसंपन्न राष्ट्र निर्माण करायचे असेल, तर विवेकपूर्ण मतदान खूप आवश्यक आहे. असे मतदान करा म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवरायांचे ‘स्वराज्य’ही आपसूकपणे मिळेल.