मतदार याद्यांमधून नाव गायब झाल्यामुळे मुंबईत लाखो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी पालिका कर्मचाऱ्यांवर त्याचा ठपका बसू नये यासाठी कामगार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांना नाहक गोवण्यात आले तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
मतदार यादी तयार करण्यासाठी घरोघरी फिरून यादी तयार करण्याचे काम सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले होते. त्यामध्ये पालिका कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. आपल्या कार्यालयातील दैनंदिन कामे बाजूला सारून या सर्व कर्मचाऱ्यांनी घरोघरी फिरून मतदारांची माहिती गोळा केली.
विभक्त कुटुंबातील पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. अशा वेळी त्यांच्या घरातील नोकर मंडळींकडून योग्य ती माहिती दिली जात नाही. मोठय़ा निवासी संकुलात प्रवेश मिळविणे अवघड असते. झोपडपट्टय़ांमध्येही अज्ञान आणि निरक्षर नागरिकांकडून योग्य ती माहिती दिली जात नाही. अशा अनेक समस्यांना तोंड देत या कर्मचाऱ्यांनी मतदारांची माहिती गोळा करण्याचे काम केले.
हे काम पालिका आणि अन्य कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी केले असले तरी त्याकडे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचेही बारकाईने लक्ष द्यायला हवे होते. मतदार याद्यांमध्ये घोळ होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचीच जबाबदारी होती, असे पत्र म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांना पाठविले आहे. तसेच म्युनिसिपल मजदूर युनियननेही निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पालिका कर्मचाऱ्यांवर ठपका ठेऊ नये अशी विनंती केली आहे.
आता मतदार यादीतील घोळ झाल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्याचे घाटत आहे. तसे झाले तर पालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी राहील आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी दिला आहे.