स्थळ.. नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचे गाव. कोणतेही.
सभा दिनाच्या आधी दोन दिवस मोदी यांच्या खास कार्यालयातील कर्मचारी कोणालाही न सांगता सवरता सभेच्या गावात आलेले असतात. ते स्थानिकांशी बोलतात.. चहाच्या ठेल्यावर, महाविद्यालयांच्या नाक्यांवर, अन्य बडबडे.. अनेकांकडून वातावरणाचा अंदाज घेतला जातो. नक्की मुद्दे काय आहेत, वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत, कोण कोणावर नाराज आहे, छुपे विरोधक कोण..? अनेकांगांनी माहिती गोळा केली जाते. सगळीच्या सगळी मग ती गांधीनगरला मोदी यांच्या कार्यालयातल्या कक्षाला पुरवली जाते..
साधारण २०० जणांचं एक पथक या कार्यालयात कायमस्वरूपी तैनात. माहितीचं विश्लेषण करण्यासाठी. त्यात मोठय़ा संख्येने आयआयटियन्स आहेत, सांख्यिकी शास्त्रातले धुरंधर आहेत आणि या सगळय़ाला अर्थ प्राप्त करून देणारे विश्लेषक आहेत. काय काय माहिती येते त्यांच्याकडे? देशभरातल्या ८७० वर्तमानपत्रांचा आढावा.. त्यात कोणत्या वर्तमानपत्रात मोदी यांच्याविषयी काय दृष्टिकोनातून मजकूर आलाय ते.. मोदी त्या राज्यांत जाणार असतील तर तो तपशील मग वेगळय़ा विभागाकडे सुपूर्द केला जातो. कारण तिकडे गेल्यावर मोदी यांना त्यावर भाष्य करता यावं. त्याशिवाय सर्वच्या सर्व वृत्तवाहिन्यांचा आढावा. सध्या जे काही खासगी वृत्तवाहिन्यांचे बोलघेवडे चेहरे आहेत, त्यातलं कोण मोदींविषयी काय म्हणालं याचा साद्यंत तपशील.. त्यासाठी एका स्वतंत्र कंपनीची सेवा. देशभरातल्या सर्व वृत्तवाहिन्यांमध्ये दररोज मोदी यांच्यासंदर्भात काय काय आणि किती दाखवलं जातं त्याचं संकलन करणं हेच या मुंबईस्थित कंपनीचं काम.
या सगळय़ाच्या पलीकडची माहिती घेण्यासाठी एक खास संगणक प्रणाली. ती हाताळणाऱ्या संगणकतज्ज्ञांचं काम काय? तर नरेंद्र आणि मोदी हे शब्द कोणत्याही माध्यमात उच्चारले/लिहिले गेले असतील, तर त्यांचा अर्थ आणि उद्दिष्ट लावणं. ही सर्व यंत्रणा गेली सहा महिने अव्याहत सुरू. याच्या जोडीला एक वेगळं कार्यालय. ते फक्त मोदी यांच्या सभांसाठी येणाऱ्या विनंत्या हाताळणारं. तिथला कळीचा माणूस संजय भावसार. मोदी यांनी कुठे प्रचारसभा घ्यायची याचा अंतिम निर्णय ते घेणार. कोणाहीकडून सभेसाठी विनंती मोदींकडे गेली की त्यांचं उत्तर.. भाई वैसे गला तो मेरा है.. लेकिन संजयसे पुछ लो..
या सगळय़ा यंत्रणेकडनं सज्जता झाली की मग पुढचा टप्पा. तो सुरक्षा यंत्रणेचा. तीसुद्धा गुजरात सरकारचीच. प्रत्येक सभेच्या आधी एक दिवस.. किमान २४ तास.. मोदी यांचं खास सुरक्षा पथक त्या सभागावी पोहोचलेलं असतं. सभास्थानाचा संपूर्ण आढावा ते घेणार. व्यासपीठ ते प्रेक्षकांची पहिली रांग यांतील अंतर किती, आसपास किती उंच इमारती आहेत आदी सविस्तर तपशील त्यांच्याकडनं मंजूर झाल्यानंतरच मोदी यांच्या सभेला हिरवा कंदील मिळतो. खेरीज मोदी यांच्या आसपास कोण असतील, कोणते नेते, पत्रकार त्यांना भेटणार आहेत हा सर्व तपशील. त्याची स्वतंत्रपणे त्या यंत्रणेकडून खातरजमा. हे असं रोजच्या रोज चाललेलं. गेले सहा महिने.
एवढं झालं की सभेचा दिवस उजाडतो.. असंही म्हणायची सोय नाही. कारण रोजचाच दिवस सभेचा. तसा तो  
उजाडला की भल्या सकाळी मोदी यांना आजच्या सभांचा तपशील दिला जातो. त्यात एक समान सूत्र. ते म्हणजे दररोज सभा किमान पाच आणि दोन राज्यं. शेवटची सभा रात्रीचं विमान उड्डाण करायची सोय असलेल्या गावालगत. मोदींना विचारलं तर त्यांचं उत्तर : ‘अबतक तीनसो के आसपास मीटिंग्ज हुई है.. और सौ देढ सौ हो जाएगी..’
तर दररोज संजय भल्यासकाळी मोदी यांना त्या त्या दिवसाच्या सभांचा तपशील देणार. लेखी. प्रत्येक सभेसाठी एकच कागद. त्यात तेथील भाषणात घ्यायलाच हवेत असे स्थानिक मुद्दे.. कोणत्या महत्त्वाच्या नावांचा उल्लेख व्हायलाच हवा ती नावं.. स्थानिक भाषेतली दोन प्रसन्न वाक्यं.. म्हणजे बंगाली, तामिळ, मराठी.. वगैरे. आणि मग मुद्दय़ांची जंत्री. हा सगळा तपशील कसा दिला जाणार त्याचाही क्रम ठरलेला. म्हणजे एके दिवशी नावं पहिली, दुसऱ्या दिवशी आणखीनच काही.. असं नाही. सगळं संपूर्ण शिस्तबद्ध. त्यातही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा की स्थानिक विषय हे स्थानिक भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित नसतात. म्हणजे भाषणातले मुद्दे संपूर्णपणे मोदींच्या कार्यालयानं तयार केलेले. प्रत्येक सभेच्या आधी मोटारीत ते मोदी यांच्या हाती दिले जाणार. त्यामुळे सभास्थानी पोहोचेपर्यंत मोदी यांच्याकडून केवळ त्याचंच वाचन, मनन. एरवी प्रथा अशी की, अशा प्रमुख नेत्याच्या मोटारीत बसण्यासाठी त्या त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांची मोठी झुंबड उडते. मोदी यांच्याबाबत तसं नाही. त्यांच्या मोटारीत फक्त त्यांचा स्वीय सचिव, सुरक्षा अधिकारी आणि एखादाच स्थानिक नेता. पण मोटारीत बोलणं काही नाही. कारण मोदींची तयारी सुरू असते. ..इतक्या जय्यत तयारीनंतर मोदी सभास्थानी पोचतात आणि मग..
‘मित्रों’.. की भाषण सुरू. प्रत्येक भाषण फक्त २० ते २४ मिनिटांचंच. मोदी व्यासपीठावर पोहोचेपर्यंत तोपर्यंतच्या वक्त्यांना निरोप गेलेला असतो, आवरा. हारतुऱ्यात दोन-पाच मिनिटे गेल्यावर मोदी भाषणाला उभे. सगळा खेळ फक्त अध्र्या तासाचा. रेंगाळणं नाही, शिळोप्याच्या गप्पा नाहीत. सभा संपली की मोदी थेट रंगमंचावरनं खाली उतरून गाडीकडे. जाताना मोटारीतली रचना तीच. सभेच्या गावात विमानतळ नसेल तर हेलिकॉप्टर. त्यातही चार ते पाच जण. ते पुढच्या गावाला रवाना होणार. ते पुढचं गाव असं निवडलेलं असतं की त्याच्या आसपास विमानळ असतोच असतो. मोदी सभास्थानी पोहोचेपर्यंत आधीच्या सभेच्या ठिकाणी त्यांना उतरवून विमान त्या गावात जाऊन सज्ज. त्या गावीही पुन्हा हाच खेळ. सभा संपल्यावर मोदींशी मोजकीच भेट फक्त विमानतळावर. आपण काही विचारायच्या आधी तेच विचारणार.. ‘माहौल कैसा है?’ स्थानिक यजमान चौकशी करतो, चहा वगैरे. त्यावर मोदींचा नकार. खासगी सचिवाकडनं पुरवलं जाणारं गरम पाणी. गरम का? तर घसा खराब आहे म्हणून. ‘आजकल ये गले की वजहसे ज्यूस भी पिता नही’. मोदी सांगतात. कोणी तरी अधिक उत्साही त्यांना अतिमहनीय कक्षात आराम करायचा का विचारतो. मोदींचं उत्तर. ‘पिछले तीन महिनोंसे ये विमानही मेरा घर है.. सोना. खाना. आराम सब उसीमे..’ मग आपण फार निवांत आहोत की काय.. असं वाटून ताडकन उठून निघतात विमानाकडे. एव्हाना ब्लॅक कॅट कमांडोंजनी विमानाभोवती कडं केलेलं असतं. मोदी त्या विमानाची छोटीशी शिडी चढून लगेच आतमध्ये.. मागे वळून पाहणं नाही. अच्छा.. टाटा नाही. विषय संपला. विमानातही ते एकटेच. सोबतील फक्त स्वीय सचिव. दिवसभरात तीन सभा झालेल्या असतात. आणखी दोन असतात. त्या दुसऱ्या राज्यातल्या. विमानात मोदींच्या हाती पुढच्या सभांचा तपशील दिला जातो.
मागे खाली उरलेले त्यांचा झपाटा पाहून अचंबित. त्याच कौतुकमिश्रीत आश्चर्याने ते धावपट्टीवरनं वेगाने निघालेल्या मोदींच्या विमानाकडे बघत असतात. विमान आकाशाकडे झेपावतं..
ओळख दाखवणारी विमानावरची ठसठशीत अक्षरं तेवढी डोळय़ात भरतात.. अदानी!