आम्ही कोकणचा विकास घडविण्यासाठी समर्थ असून नारायण राणे यांनी त्याची काळजी करू नये, त्यांनी आता थांबावे, असा टोला विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लगावला आहे.  लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हताश झालेल्या राणे यांनी ‘कोकणचा विकास आता भाजप-शिवसेनेने करावा, आम्ही आता थांबतो,’ असे जाहीर केले होते. कोकणातील ९८६ गावांवरील पर्यावरणविषयक र्निबध हटविण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण विभागाने घेतल्यानंतर या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोकणातील विकासाच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय असल्याने तावडे यांनी त्याचे स्वागत केले आहे. त्यावेळी त्यांनी राणे यांच्या वक्तव्याचा संदर्भात टिप्पणी केली. नरेंद्र मोदी सरकारकडून कोकणातील विकासाला चालना देण्यासाठी पावले टाकली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.