महाराष्ट्रात गारपिटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राज्यात येण्यास वेळ मिळत नाही. राहुल गांधी शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी ‘रोड शो’ करीत फिरत आहेत, देशाचे कृषीमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मते मागण्यासाठी लाज वाटत नाही, हे षंढ आणि नालायक नेते शेतकऱ्यांना मदत करू शकणार नाहीत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली.
शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी येथील सायन्सकोर मैदानावर आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बैल आणि गाडी या शब्दांची फोड करताना गारपीटग्रस्त भागात मुख्यमंत्री बैलगाडीतून फिरत आहेत, पण यात बैल कोण आणि मुख्यमंत्री कोण, हे समजण्याइतके राज्यातील मतदार नक्कीच सूज्ञ आहेत, अशी शाब्दिक कोटी केली. या सभेला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करताना सरकारवर टीका केली. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याचा आरोप केला. केंद्रात आमचे सरकार आले, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.