निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव म्हणतात खरा, परंतु आपल्या नेतेमंडळींची कथनी व करणी पाहिली, तर शिमग्याच्या सणापेक्षा तो फारसा काही वेगळा ठरत नाही. अहाहा, काय ती बेताल वक्तव्ये; ओहोहो, काय ती वैयक्तिक कुचाळकीची भाषा आणि अरेरे, काय ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची विटंबना!
प्रशासनावर मांड, सत्तेवर नियंत्रण आणि जिभेला लगाम ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची ओळख. मात्र बहुदा जातीने रिंगणात उतरणार नसल्यामुळे त्यांनी संयमाचा पायघोळ अंगरखा काढून टाकून बेफाम विधानांचा असा सपाटा लावला, की निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावी लागली. मात्र, स्वतःच्या जिभेला आवर घालण्याऐवजी थोरल्या साहेबांनी निवडणूक आयोगावरच दुगाण्या झाडल्या. खरं तर “अश्वत्थामा हतः, नरो वा कुंजरो वा” अशा छापाची विधाने करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकायचे आणि स्वतःचे मनसुबे सिद्ध करायचे, हा साहेबांचा हातखंडा प्रयोग. मात्र यंदा त्यांनी बोटावरची शाई पुसण्यापासून अनेक विधाने करून नवमतदारांची प्रचंड करमणूक केली तर जुन्या मतदारांना तोंडात बोट घालायला लावले.
त्यांचे पुतणे, राज्याचे ‘पाणीदार’ नेते अजित पवार यांच्यावर तर वादसरस्वती नेहमीच प्रसन्न असते. दादांच्या तोंडातून शब्द खाली पडला आणि महाराष्ट्राने अचंबित होऊन तो ऐकला नाही, असे कधी घडावयाचे नाही. त्यांना तर आधीच उल्हास वर फाल्गुन मास. आपल्या टग्या धर्माला जागून दादांनी आधी मावळ मतदारसंघात वरपांगी स्वपक्षीय पण वास्तविक विरोधक, दिवसा राष्ट्रवादी पण रात्री महाराष्ट्रवादी अशा होतकरू टग्यांना दम दिला. प्रचार केला नाही तर पदे काढून घेऊ, मते आणली नाहीत, तर गाठ माझ्याशी आहे, अशा अनेक सशर्त वाक्यांची त्यांनी मराठीत भर घातली. त्याची प्रतिक्रिया येत नाहीसे पाहून मग ‘या ठिकाणी’ बारामती मतदारसंघात तोच प्रयोग केला. आता आपण तो केलाच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एका स्पष्टवक्त्या आणि एकवचनी नेत्यावर निवडणुकीने आणलेली काय ही स्थिती?
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे असले म्हणजे वैयक्तिक टिकेची एखादी तरी पिंक पडणार, हा महाराष्ट्राच्या मतदारांचा होरा असायचा. त्यांनीही या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. कधी मैद्याचे पोते तर कधी बारामतीचा ममद्या अशी वाक्ये पेरून त्यांनी ठाकरी ब्रांड विकसित केला. त्यांच्या पश्चात या पहिल्या निवडणुकीत ही उणीव भरून काढायचा चंग जणू राज ठाकरे यांनी बांधला. मग त्यासाठी आधी सूप-वडा अशा मराठी घरगुती मेनू घेऊन निघालेले इंजिन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात यूपी-बिहारच्या लोकांना परत मारीन, अशा ओळखीच्या स्टेशनवर येऊन थांबले. तोंडाची (व इंजिनाची) वाफ दवडणे काय असते, याचा वस्तुपाठ त्यांनी राज्याला दिला.
त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीचा धडा पुरेसा लक्षात ठेऊन आपण बरे, आपले काम बरे हा खाक्या कायम ठेवला. मात्र त्यांच्या युतीतील सहकारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जिभेचा पट्टा सैल सोडण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. गेल्या निवडणुकीच्या खर्चाबाबत विधानावरून अडचणीत आलेले गोपीनाथ मुंडेच यात आघाडीवर होते, हे आणखी विशेष. ‘काँग्रेस आघाडीची आम्ही तिरडी काढणार आहोत,’ हे केवळ मासल्यादाखलचे वाक्य. गोपीनाथरावांनी संपूर्ण प्रचाराच्या काळात अशा अनेक वाक्यांची आतषबाजी केली.
आता अशा मोठ्या नेत्यांनी आपल्या जीभा सैल सोडल्यावर त्यांचे पंचहजारी-दसहजारी मनसबदार थोडेच मागे राहणार आहेत. त्यांनीही फाल्गुन मासाची आपली हौस भागून घेतली. काँग्रेसमधील अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांनी कोणावरच नाही तर मोदींवरच तोंडसुख घेतले आणि पंगतीचा मान राखला.
खरं तर निवडणुकीची वारूणीच अशी, की किरकोळातल्या किरकोळ नेत्यालाही ती चढते. मराठी भाषेतही लढाईच्या संदर्भातीलच वाक्प्रयोग जास्त असल्यामुळे अलबत्या-गलबत्या नेत्यांनाही प्रतिस्पर्ध्यांना ‘जागा दाखवून द्यायची’ असते किंवा ‘धूळ चारायची असते’. अर्धे-अधिक उमेदवार आयात केल्यानंतर नेते मतदारांना सांगतात, ‘गद्दारांना धडा शिकवा’ आणि पाच-पन्नास पक्ष बदलल्यानंतर उमेदवार मतदारांना सांगतो, ‘एकदा माझ्यावर विश्वास दाखवा’. दहा दहा वर्षे निष्क्रियपणे खूर्ची उबवणारे म्हणतात, की विकासाबाबत बोलण्याचा विरोधकांना अधिकार नाही तर तोंडदेखला विरोध करत स्वतःचे कल्याण साधणारे विरोधक म्हणतात, चांगले दिवस येणार आहेत.
राहता राहिला मतदारांचा प्रश्न – ते म्हणतात, ‘आले वारे गेले वारे, ते काय आपले सगेसोयरे?’
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)