भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीनंतर शिवसेना-भाजपमध्ये उद्भवलेला तणाव आता निवळला आहे. मात्र, त्या निमित्ताने सुरू झालेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाद आता अधिक पेटला आहे. असे असतानाही नितीन गडकरी यांनी मात्र, राज आणि उद्धव यांच्यात प्रेमाचे संबंध असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मराठी माणसाच्या हितासाठी या दोन्ही पक्षांत चांगले संबंध असावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधूंतील वाद, मुंडेंसोबतचे मतभेद, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अशा विविध प्रश्नांवर लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी उमाकांत देशपांडे यांनी नितीन गडकरी यांच्याशी केलेली ही बातचीत :

* राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात जाहीरपणे वाद सुरू आहे. शिवसेनाप्रमुख्यांच्या अखेरच्या काळातील घटनांचा उल्लेख प्रचारसभांमध्ये होत आहे. याबाबत तुमचे मत काय?
–     हा त्यांच्या परिवारातील कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत मला काही बोलायचे नाही.
*  पण राज ठाकरे यांना महायुतीसोबत घेण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता आणि उद्धव ठाकरे यांची तिखट टीका व विरोध तुम्हाला सहन करावा लागला. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही दोन पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दोन भावांमधील कलहाबाबत तुम्हाला काय वाटते?
–  राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण होणे, हे मराठी माणूस आणि राज्यातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. शिवसेना व मनसे यांच्यात चांगले संबंध निर्माण झाल्यास ते सर्वाच्या हिताचे होईल.
* तुम्ही त्यासाठी पुन्हा पुढाकार घेणार का?
– मी सध्या निवडणूक प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा सत्ताधारी आघाडीला होऊ नये, या प्रामाणिक भूमिकेतून मी मनसेलाच नाही, तर शेकाप, विनय कोरे यांना महायुतीसोबत घेण्याचा विचार मांडला होता. मात्र त्यातून चुकीचा अर्थ काढून गरसमज निर्माण झाले. त्यामुळे आता नेमके काय करायचे, याचा निर्णय दोन्ही भावांनीच घ्यायचा आहे. शिवसेनेबरोबरची युती टिकून राहावी, अशीच माझी भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयींइतकाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मला आदर आहे. ते आमचे स्फूर्ती व प्रेरणेचे केंद्र होते.
* शिवसेनेबरोबरचे संबंध ताणले गेल्याने शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात तुम्ही फारसे सहभागी होणार की नाही?
– भाजपने भाजपच्या आणि शिवसेनेने शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा, असे ठरले होते. पण मी रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांचा प्रचार करीत आहे. नरेंद्र मोदी यांनीही अडसूळ यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. दोन्ही पक्षांचे एकमेकांना चांगले सहकार्य असून नागपूरमध्येही शिवसेना कार्यकत्रे माझे काम करीत आहेत.  
* भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, मात्र एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, बहुमत न मिळाल्यास पवारांचा पाठिंबा घेणार का?
– काय करायचे, याचा निर्णय पवार यांनीच घ्यायचा आहे. तेच याबाबत सांगू शकतील. मला मात्र एनडीएला बहुमत मिळेल, याची पुरेपूर खात्री आहे. त्यामुळे अन्य पर्यायांचा किंवा कोणाची मदत घेण्याचा विचार सध्या तरी नाही.
* महायुतीला राज्यात किती जागा मिळतील?
– ३५पेक्षा अधिक जागांची मला खात्री आहे.
* उमेदवार निवडीमध्ये तुमचे आणि गोपीनाथ मुंडे यांचे मतभेद झाले. तुमच्या शिफारशी डावलून पुणे, लातूर व काही मतदारसंघांत पक्षाकडून उमेदवार दिले गेले. याबाबत तुमची भूमिका काय?
– मी केंद्रात राजकारण करीत असून महाराष्ट्रात हस्तक्षेप करीत नाही. माझे म्हणणे मी पक्षाच्या बठकीत मांडत असतो. देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे आदी प्रदेश भाजपचे नेते निर्णय घेत असतात. सल्ला देण्याचे किंवा मुद्दे मांडण्याचे काम मी करतो. त्याबाबत माझा आग्रह नसतो. त्यापकी काय स्वीकारायचे किंवा काय नाही, याचा निर्णय हे नेते घेतात.  
* सत्ता आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करू, एलबीटी रद्द करू, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल, कर्जमाफी अशा अनेक घोषणा निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात येत आहेत. त्यासाठी निधी किंवा शासकीय तिजोरीत पसा कुठून आणायचा, याबाबत सांगितले जात नाही..
– ज्यांनी या घोषणा केल्या, ते नेते अनुभवी आहेत. त्यामुळे तेच याचे उत्तर देऊ शकतील. निधी कुठून आणायचा, हे त्यांनाच माहीत असेल.