भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी करून सत्तास्थापनेच्या हालचाली करण्याच्या संभाव्य विदुषकी चाळ्यांना सूज्ञ मतदारांनीच चाप लावला आहे. तिसऱ्या आघाडीतील तृणमूल आणि अण्णाद्रमुक यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाला डोके वर काढण्याची संधी त्या त्या राज्यातील मतदारांनी दिली नाही. बिहारमध्ये लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला अवघ्या तीनच जागांवर समाधान मानावे लागले आह,े तर दलित मतपेटीच्या बळावर गमजा मारणाऱ्या मायावतींच्या बसपला उत्तर प्रदेशात भोपळाही फोडता आलेला नाही. उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षालाही मतदारांनी दूर सारले आहे. भाकप-माकप या डाव्या पक्षांना ११ जागांवर विजय मिळवता आला असला तरी त्यांचे हे यश मर्यादितच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या नितीशकुमारांच्या जेडीयूला बिहारमध्ये अवघ्या दोनच जागा प्राप्त करता आल्या. निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीला जवळ करून यूपीए-३ची स्थापना करण्याचे संकेत देणाऱ्या काँग्रेसचे तर मतदारांनी दातच घशात घातले आहे. त्यामुळे सोळाव्या लोकसभेत तिसऱ्या आघाडीचे स्थान एका कोपऱ्यापुरताच मर्यादित असेल, यात शंका नाही.

तब्बल १५ वर्ष बिहारमध्ये सत्ता गाजवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाची दारुण अवस्था झाली आहे. राजदचे अध्यक्ष व यूपीए-१ मधील माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना त्यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा पराभवही टाळता आलेला नाही. राबडीदेवी यांना सारण मतदारसंघात भाजपच्या राजीवप्रताप रूडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला तर कन्या मिसा भारती पाटलीपुत्र मतदारसंघात भाजपचे राम कृपाल यादव यांच्याकडून पराभूत झाल्या.
१२०७९२
मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघात राहुल ब्रिगेडचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे जयभान सिंग यांचा १२०७९२ मतांनी पराभव केला.  शिंदे यांना ५१७०३६ मते मिळाली.

प्रसारमाध्यमांच्या एका मोठय़ा गटाने आमच्याविरोधात मोहीम उघडल्यानंतरही आमच्या पक्षाने घवघवीत यश मिळवले. या यशाचे श्रेय मी सर्वसामान्य मतदारांना देते. देशात आर्थिक, राजकीय स्थैर्य असावे तसेच सर्व जाती-धर्मामध्ये बंधुभाव नांदावा, असे आम्हाला वाटते.
– ममता बॅनर्जी, प. बंगालच्या मुख्यमंत्री
देशात मोदी यांची लाट होती, हे मान्य करावे लागेल. मात्र, काँग्रेस पक्षाने यापूर्वीही वाईट दिवस पाहिले असून या अपयशावर मात करत आमचा पक्ष नव्याने उसळी मारेल, याचा मला विश्वास आहे.
जयराम रमेश, केंद्रीय मंत्री

०१ भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मिळालेल्या जागा.
०२संयुक्त जनता दलास (जेडीयू) मिळालेल्या जागा.
२.८ मेघालयात
२.८ टक्के मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.
१.१ देशभरात
१.१ टक्के मतदारांचा ‘नोटा’वर शिक्का मारला.

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी आझमगडमध्ये भाजपचे रमाकांत यादव यांचा पराभव केला. तर मैनपुरी मतदारसंघातून मुलायम यांनी भाजपचे उमेदवार शत्रुघ्नसिंह चौहान यांना सुमारे दोन लाख मतांनी पराभूत केले.

मुलायमसिंह यांच्या स्नुषा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनी कनौजमध्ये भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक यांचा २१ हजार ३४० मतांनी पराभव केला. डिम्पल यांचे मताधिक्य घटले आहे, हे विशेष.

प. बंगालमध्ये तृणमूलचे  सुगता बोस  यांनी  जाधवपूर मतदारसंघात माकपचे सुजन चक्रवर्ती यांचा पराभव केला. बंगालवर तीन दशके राज्य करणाऱ्या कम्युनिस्टांना बंगाली जनतेने नाकारले आहे, हेच या निकालांनी पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह  बागपत मतदारसंघातून पराभूत झाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजप उमेदवार सत्यपाल सिंह यांनी त्यांना पराभूत केले. अजित सिंह जाट मतांवर निवडून येत. मात्र या वेळी ही मते पूर्णपणे भाजपकडे वळली.

केंद्रीय मंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला हे श्रीनगर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. पीडीपीचे उमेदवार तारिक हमीद कारा यांनी त्यांचा ४२ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. फारुख अब्दुल्ला १९८० मध्ये राजकारणात सक्रिय झाले होते.

टूजी घोटाळा प्रकरणी तुरुंगवास भोगलेले माजी केंद्रीय मंत्री व द्रमुकचे खासदार ए. राजा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अण्णाद्रमुकचे उमेदवार सी.गोपालकृष्णन  यांच्याकडून राजा यांना निलगिरी मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले.