सोलापुरातील बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून ११ जणांविरुद्धच गुन्हा

सोलापूर : सोलापुरात दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या कृत्यात अकरा नव्हे तर  तब्बल सोळा जणांचा सहभाग आहे. परंतु पोलिसांनी केवळ अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा आरोप पिडितेच्या कुटुंबियांच्यावतीने शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी केला. या गुन्ह्य़ाची माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्यामुळे तपास यंत्रणेची भूमिका संशयास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

या प्रकरणी खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातंग समाजासह बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीपूर्वी खंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर त्यांनी वरील आरोप केला.

खंदारे म्हणाले, की पीडित मुलीवर अकरा जणांनी नव्हेतर सोळा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पीडित मुलीसह तिच्या कुटुंबीयांनी ही माहिती सुरुवातीलाच पोलिसांना दिली होती. परंतु त्यापैकी पाच जणांची नावे पोलिसांनी वगळली आणि केवळ अकरा जणांनाच आरोपी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याचे खंदारे यांनी सांगितले. दुसरीकडे पोलीस तपास अधिकारी प्रीति टिपरे यांच्याकडून गुन्ह्य़ाची माहिती प्रसार माध्यमांना देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे. आरोपींची नावे जाहीर केल्यास या नराधमांनी अन्य काही मुलींवरही अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारी पुढे येऊ शकतील. परंतु पोलिसांची एकूणच भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांना सांगून देखील पाच जणांना आरोपी करण्यास टाळाटाळ होत असेल, तर या नराधमांना पोलिसांकडून संरक्षण मिळत असावे, असा संशयही खंदारे यांनी व्यक्त केला.

या संदर्भात खंदारे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार सर्वच्या सर्व नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.