जालना : जालना जिल्ह्य़ात मंगळवापर्यंत ४४ हजार ३१२ करोनाबाधित आढळून आले. यापैकी ३७ हजार ८९ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८३.७० टक्के आहे.

जिल्ह्य़ात आतापर्यंत दोन लाख ७८ हजार करोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये ४४ हजार ३१२ नमुने (१६ टक्के) करोनाबाधित निघाले. आतापर्यंतच्या आरटीपीसीआर चाचण्यांची एकूण संख्या एक लाख ५९ हजार असून त्यापैकी २२.६९ टक्के नमुने करोनाबाधित निघाले आहेत, तर एकूण एक लाख १९ हजार प्रतिजन चाचण्यांमध्ये आठ हजार ४१० (७.०६ टक्के) नमुने करोनाबाधित निघाले आहेत.

एप्रिल महिन्यात चाचण्यांची संख्या वाढलेली असून त्यामधील करोनाबाधित नमुन्यांचे प्रमाणही वाढले आहे. मंगळवारी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये करोनाबाधित नमुन्यांचे प्रमाण ४७ टक्के तर प्रतिजन चाचण्यांमधील करोनाबाधितांचे प्रमाण १२.९१ टक्के होते.

जिल्ह्य़ात आतापर्यंत ७१८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यापैकी ५२२ मृत्यू शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू असताना झाले, तर १९६ मृत्यू खासगी रुग्णालयांमध्ये झालेले आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यांत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एप्रिलमध्ये जालना शहरासह जिल्ह्य़ातील अन्य सात तालुक्यांच्या ठिकाणीही करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

सध्या जालना जिल्ह्य़ात करोनाचे सहा हजार ५०५ सक्रिय रुग्ण आहेत. चार हजार २९६ गृह अलगीकरणात तर ८१४ संस्थात्मक अलगीकरणात आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्क आणि सहवासातील आठ लाख ३१ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा शोध आतापर्यंत जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेने घेतला आहे.